. *कविता*
. (संस्कारापूर्वी)
प्रसव कविता
गंभीर प्रवाही
नको पावसाळी
गढुळाचा पूर
विचार ठासून
भरायला हवा
डोक्यात पुरता
घोळायला हवा
येईल उकळी
तेव्हाच लेखणी
लिहावी वाचावी
पुन्हा. पुन्हा..पुन्हा...
अशी एक वेळ
असेल अंतिम
पूर्ण समाधान
शांत चित्त मन
एकरूप व्हावे
तिच्याशी एवढे
विसर पडावा
अखिल विश्वाचा
ताक ढवळून
माये हाती लोणी
तशी व्हावी वाणी
आणिक लेखणी
सुरेख रचना
छंद,रस थोडे
अलंकारी जोडे
अल्पशब्द काव्य
अशीही कविता
लिहावी सुंदर
वाचकाचे मन
सुखावीत.
मनात भरता
द्यावी मुक्त दाद
पोकळ स्तुतीला
भाळू नये
. *काव्यभोग*
. (संस्कारानंतर)
प्रसव कविता
गंभीर प्रवाही
नको पावसाळी
डोही पूर
विचार ठासून
भरायला हवा
पुरा घोळवावा
डोक्यामध्ये
येईल उकळी
तेव्हाच लिहावी
आपण वाचावी
पुन्हा. पुन्हा..
अशी एक वेळ
असेल अंतिम
पूर्ण समाधान
शांत चित्त
तिच्याशी एवढे
एकरूप व्हावे
विसरून जावे
विश्वालाही
ताक ढवळून
माये हाती लोणी
तशी यावी गाणी
ओठावर
सुरेख रचना
छंद,रसयुक्त
अलंकारी साथ
अल्पाक्षरी
अशीही कविता
साहित्याचे धन
वाचकाचे मन
सुखावतेे.
मनात भरता
द्यावी मुक्त दाद
स्तुतीसाठी वाद
घालू नये
अंतरी बाहेर
कविताच श्वास
*चंदन* सुवास
वाटीतसे.
© *चंदन*
No comments:
Post a Comment