🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
*इन दिनों...*
*हल्ली...*
अलीकडे अनेक माध्यमातून कविता वाचता/ऐकताना खूप समाधान वाटण्यासारख्या छान रचना भेटतात. एका बाजूला एकसे बढकर एक विधा निर्माण होत आहेत;
पण काही मात्र...
मनात रुतलेल्या विषयावर चिंतन-मनन तर मुळीच नाही. शिवाय रचनेच्या दृष्टीनेही अधुरेपण जाणवते. कधी एकदा लोकांसमोर टाकेन, वाहवा मिळवीन याची घाई झालेली असते. पुनर्विचार-पुनर्लेखन-पुनर्बांधणी या प्रक्रिया त्यांत कुठेही आढळत नाहीत.
मुक्तछंदातही एक ताल असतो, लय असते, गीत असते, संगीत असते.
ते उत्कटतेनेच प्रकटायला हवे. याचेही भान नसते. कविता हा आत्मशोध असतो. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कमीतकमी शब्दांत तीतून व्यक्त व्हायचे असते हेही लोक विसरतात.
शरीराची समतोल वाढ आणि सूज यात फरक असतो. तो समजून घ्यायला हवा.
कवीला ऱ्हस्व, दीर्घ याचे स्वातंत्र्य असते याचा गैरफायदा घेत अशुद्ध लेखनाचे बंबार्डींग चालू करतात. *( हे स्वातंत्र्य छंदोबद्ध काव्यात लगावलीत रचनेच्या अचूकतेसाठी असते हे सोयीस्कर विसरतात.)*
काही लोक म्हणतात शब्दांपेक्षा भावना महत्वाच्या. त्या तर आहेतच पण मातृभाषेत लिहिताना तिचे शुद्धलेखन आणि प्रमाणलेखन पाहणे ही नैतिक जबाबदारी नाही का? (अयोग्य रीतीने केलेला स्वयंपाक खाणाऱ्याचे स्वास्थ्य बिघडते हे त्यांच्या गावी नसते.)
कपड्यांतून शरीराचे सौंदर्य खुलते तसे मनातील भावभावनांचे सु-दर्शन साहित्यातून होते. जसा काॅलर मळकटलेला, बटन तुटलेला, मळकट बाह्यांचा सदरा वापरणारा विद्रूप दिसतो तसे या कवितांमुळे वैचारिक दारिद्र्याचे पितळ कळकटून जाते हे कळत नाही; कळले तरी वळत नाही. प्रसिद्धी आणि स्तुतीच्या मोहापायी असा आत्मघाती पर्याय अविचाराने निवडतात.
*थोडा संयम, धीर धरून या सर्वांनी आपले काव्य समृद्ध केले तर काव्यजगतास किती बहार येईल!*
अशा कोणाही नवसाहित्यिकाला नाउमेद करणे हा या लेखाचा उद्देश नाही. त्यांनी अंतर्मुख होऊन उत्कृष्ट निर्मिती करावी ही अपेक्षा आहे.
(वाढणारच आहात ताटात तर थोडी काळजी घ्या. वाढणारा आणि आस्वाद घेणारा दोघांना समाधान वाटले पाहिजे. तू मला लाइक दे, मी तुला देतो; ही कंपूवृत्ती सोडून बृहत दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे.)
शुभेच्छा आणि क्षमायाचना !
*इन दिनों... या चाँद परछाई* यांच्या नवकाव्यावरील लेखाचा सारांश
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
No comments:
Post a Comment