Tuesday, 26 June 2018

अखेरची कविता

.     *अखेरची कविता*

ती कविता वाचते
हा माझाही
गोड गैरसमज होता

एकदा भेटल्यावर
विचारलंच तिला
ती म्हणाली
"कविता वाचून
पोट नाही भरत
कवीचंही
आणि कळतही नाही
कवीचा खरा भाव
वाचकाला
कविता म्हणजे
असतात शब्दांचे बुडबुडे
कधीकधी
उथळ पाण्याचा खळखळाट
जिथं तयार होतात
तिथल्याच पृष्ठभागावर
येऊन फुटतात.
पोरं शब्दावर,चेहऱ्यावर,
कातडीच्या रंगावर 
भाळतात
मुलींनी आत डोकावून
भावनांचा कल्लोळ
धुंडाळायला हवा
असं आई म्हणते."

मी म्हणालो
"खरंय...
पण काठावर उभे राहून
पाण्याचा तळाचा अंत
कसा कळणार ?
डुबकी तर मारायला हवी
एखादी !"

जाता जाता
ती म्हणाली
"तेव्हापासून तर शोधतेय
नितळ पाण्याचा झरा

ज्यात बुडी न मारताही
तळकल्लोळ सहज दिसेल."

तेव्हापासून मीही
उरलासुरला गढूळपणा
टाकायच्या प्रयत्नात

माझा बाप म्हणातो
"अक्षर अक्षर पारखून घे,
शब्द शब्द तोलून लिही
जेव्हा तुझ्या कवितेचा सुगंध पोहोचेल अंतकरणापर्यंत
तेव्हा थांबेल तुझा शोध."

मला अजून बाप
नाही कळला
तू तर कोसो दूर

आता मी करतोय प्रयत्न
कविता लिहायचा
अंतकरणाच्या तळाशी

तिथूनही तू दिसशील
तो क्षण साक्षी असेल
माझ्या नितळ भावनांचा
आणि अखेरची कविता
कवटाळून
सुरू होईल प्रवास
निशब्द!

.                  *रमेश*

No comments:

Post a Comment