ब्यारा
बाराव्याला काल दिवसभर
घरादारात पै-पाहुण्यांची
वर्दळ होती
रात्री आयाबायांनी
जाग्रण करून
गोडाचंही आटोपलं
आज बेंदूर
सकाळी उरलं-सुरलं
तिनं पोरांना वाढलं
आपणही खाल्लं
दुपार आणि संध्याकाळच्या
जेवणाचं प्रश्नचिन्ह
तिच्या डोक्यात
थैमान घालंत होतं
तिला आठवलं
बेंदराच्या दिवशी
नवरा विळादोरी घेऊन
भल्या पहाटे रानात जायचा
पिंपळाच्या डहाळ्यांचा गच्च भारा घेऊन यायचा
दर्भाच्या वळून ठेवलेल्या दोरीचे तुकडे आणि
तोरणासाठी पिंपळाच्या फांद्या घेऊन
भाऊबंदकीत वाटून आलेल्या कुळवाड्यांच्या वीसपंचवीस घरांत टाकायचा
येताना गोड खडुगळी, तिखट चकल्या, पोळ्या भरलेली पिशवी आणि गच्च भरलेलं धान्याचं पोतं सोबत असायचं
आज बेंदूर
ती उठली, विळादोरी घेऊन बाहेर पडली
पिंपळपाने,प्लास्टिकची दोरी घरोघरी वाटली
प्रश्नचिन्हाच्या उत्तरासाठी
दारोदार मागत गेली ब्यारा
नव्या पिढीच्या स्वप्नांसाठी
. *रमेश*
No comments:
Post a Comment