Thursday, 28 June 2018

कवितेच्या गावी

रोज नवी वाट इथे रोज नवे घाट इथे
आहे गच्च भरलेले कवितेचे ताट इथे

नाना रंगात अवीट शब्द सूर मैफलीत
भावशुद्ध मनातले आज कैक थाट इथे

विसरूनी अहंकार मी माझेपण सर्वदा
मैत्रीचे बंध अतूट जोडलेले दाट इथे

विसाव्यास सावलीत क्षणभर तरी थांब
तहानेस गारगार अमृतमय माठ इथे

एकटा न तू कधीही कथा-व्यथा सार्वत्रिक
वाचताच नयनांचे ओलावती काठ इथे

सुख दु:ख विसराया जोड नवी नाती दोन
ओथंबल्या हृदयांची पडते रे गाठ इथे

ये खुशाल बिनधास्त लाजू नको,भिऊ नको
तुझ्याच दोन शब्दांची पाहतात वाट इथे

No comments:

Post a Comment