Wednesday, 11 July 2018

अनेक रूपे

     *अनेक रूपे*

पाऊस प्रात:काळी
अंकुर पोसण्याला
शेतात राबणाऱ्या
दु:खास सोसण्याला

पाऊस भरदुपारी
रोपास गोड पान्हा
घेईल आवडीने
बांधावरील तान्हा

पाऊस सांजवेळी
अवघ्या चराचराला
घेऊन जात असतो
शिणल्या जिवा घराला

पाऊस भयाण रात्री
येतो स्मशानवैरी
अंधारल्या दिशांनी
होतो कधी अघोरी

पाऊस हा अवेळी
आघात सोसण्याचा
आश्वस्त पावलांनी
आधार पोसण्याचा।।

   *रमेश कुरलीकर*

No comments:

Post a Comment