Monday, 9 July 2018

भयाण रातीला

भयाण रातीला

पांढऱ्या दातांच्या
काळ्याशा बाहुल्या
अंधाऱ्या रात्रीत
कण्हत चालल्या

भीषण शांतता
अोसाड दरीत
घुबडे गटाने
चीत्कार करीत

वेताळ घुंगूर
काठीला बांधून
समंध बंधुशी
संधान सांधून

चालली एकटी
किर्रर्रर्र झाडीत
डोईच्या केसांना
मोकळे सोडीत

गुहेच्या तोंडाशी
पाकोळ्या घुमत
वडाच्या पारंबी
पिंगळे जमत

चितेच्या उजेडी
हडळीसारखी
निळावंती वाचे
मध्येच डुरकी

झुलते पालखी
अमावस्ये रात्री
बंगाली बाबूची
गोठलेली गात्रे

अक्राळविक्राळ
रूपात थांबल्या
सातीही अप्सरा
झाडाला झोंबल्या

वडाच्या पारंब्या
हळूच हलल्या
कातर कंठाने
कानात बोलल्या

उलटे लटके
पिंपळ पानात
एकटे वाघूळ
केतकी बनात

घरी परताया
उशीर झालेल्या
शंखिनी डंकिनी
गुमान चालल्या

पहाट सरली
तांबडे फुटले
घोळके बायांचे
पुजून चालले

शाळेच्या पोरींनी
स्वप्नात पाहिले
शेंदरी दगड
डोहात फेकले.

.           रमेश

No comments:

Post a Comment