Wednesday, 11 July 2018

मक्ता

.            *मक्ता*

भाषेचा इतिहास फारच जुना. जी साधने उपलब्ध आहेत त्यावरून तो पूर्ण कळत नाही. मात्र अभिव्यक्ती आणि परस्पर संवादासाठी मानवाने नेत्रसंकेत, इशारा, आवाज, हावभाव, देहबोली, हालचाली अशा विविध टप्प्यांतून संवाद साधत आजच्या भाषा व त्यानंतर लिपींचा शोध लागला असावा.
ज्या काळात भाषेचा विकास झाला व स्वतंत्र साहित्यिक रचना निर्माण होऊ लागल्या त्या वेळी  अधिक काळ भाषा फक्त बोलण्याचेच साधन होते.लेखनाची साधने कमी होती. यावेळी मौखिक परंपरेने साहित्य जतन केले जाई.(म्हणूनच तुकोबांचे अभंग व रचना पाण्यात बुडविल्यानंतरही उपलब्ध होऊ शकल्या.) (छपाई) मुद्रणकलेचा उगम व विकास नसल्यामुळे साहजिकच
जे काही जतन करायचे ते मौखिक. पुढे थोड्या प्रमाणात हस्तलिखिताद्वारे प्रसार होऊ लागला. ही लेखनसामग्री मोजक्या लोकांकडेच असायची. सामान्य लोक मौखिक परंपरेवरच आधरून होते.
अशा त्या काळात राजेरजवाडे, शाहमौलवी, संतमहंत यांना आवडलेल्या साहित्यिकाच्या रचना ते मागवत असत. या रचना पाठ करून पोहचवल्या जात. त्या रचना अमुक एका शायर/संताच्याच आहेत हे ओळखता यावे यासाठी शायर/संत आपले नाव रचनेच्या शेवटच्या चरणात असे चपखल बसवत की, ते काढून काव्यचौर्य करताच येत नसे व रचना मूळ साहित्यिकाची असल्याची खात्री पटत असे. असे नाव लिहिलेला चरण/शेर म्हणजेच *मक्ता*. असलेला चरण/शेर.
*मक्ता* ही संज्ञा विशेषतः गझल या काव्यप्रकारात रूढ पावलेली आहे. शायर गझलच्या शेवटच्या शेर मध्ये आपले नाव गुंफता असे. तसेच संतकवी, शायर, शाहीर, लोकगीतकार, कवी त्या काळी असा मक्ता आवर्जून लिहीत असत. यामुळे चौर्यकर्मास आळा बसत असे. छापील पत्राच्या किंवा प्रमाणपत्राच्या शेवटी जशी स्वाक्षरी असते. किंवा खलित्यावर जशी मुद्रा किंवा दस्तूर उमटवला जाई तशीच. या *मक्ता* मुळे अस्सलपणाची खात्री होत असे. चपखलपणे मक्ता लिहिणे एक कला आहे. तो त्यालाच लिहिता येतो ज्याची कवितेतील छंदावर आणि शब्दांवर हुकूमत आहे.
मक्तामुळे ते साहित्य आपलं असल्याचा दावा  करण्याचा हक्क आपणास मिळतो.
आजकाल लेखनात आणि मुद्रणतंत्रात प्रचंड क्रांती झाली आहे. लेखक ,कवी ,शायर कागदासह डिजीटल तंत्राने फ्लाॅपी, डिस्क, सीडी, डिव्हीडी, पेनड्राइव्ह, दूरध्वनी, भ्रमणध्वनी अशा पूर्ण ओळख पटवणाऱ्या  माध्यमातून साहित्याची देवाणघेवाण करतात.
तसेच साहित्याच्या लेखनमाध्यमावर अगोदर किंवा शेवटी प्रत्यक्ष नाव लिहून पाठवू शकतात.
असे असतानाही आजकाल काही कवी कवितेत *मक्ता* लिहितात.
मक्त्यासोबतच आधुनिक प्रणालीमध्ये अशी व्यवस्था निर्माण करायला हवी की एकादी कविता मूळ कवीने पोस्ट केली तर त्यामध्ये इतरांना काही ही बदल न करता यावा.यामुळे चौर्यकर्म थांबेल.
"आजही मक्त्याची गरज तितकीच आहे जितकी तुकोबारायांच्या काळात होती.आजच्या आधुनिक सामग्री मुळे तर चौर्यकर्म अधिक प्रखर आणि मोठ्या प्रमाणात होत आहे...खासकरून त्यांच्यासाठी जे पडद्याआडचे नवलेखक नवकवी गझलकार आहेत."(शायर,शेरखान पठाण)
असे काही जाणकारांचे मत आहे.
ते योग्य की अयोग्य सांगता येत नाही. पण यानिमित्ताने *मक्ता* बद्दल विचार मांडता आला.
धन्यवाद !
.       *चंद्रकांत निकाडे*

No comments:

Post a Comment