Friday, 26 October 2018

गझल अपवाद ९

काही अपवाद!
हे अपवाद तितकेच महत्वाचे आहेत. यांचा वापर करण्याची वेळ गज़लकारांवर अनेक वेळा येते.
अपवाद क्रमांक १ -
क्ष हे एक अपवादात्मक अक्षर आहे. खरे तर ते एक लघू अक्षर आहे, कारण त्याचा स्वर ’अ’ हा आहे. तसेच, ते आपल्या लिपीत जोडाक्षर नसून मूळ अक्षर आहे.
हे अक्षर जर ’क्षमा’ या शब्दात आले तर त्याची मात्रा एकच राहते. मात्र ते अक्षर जर ’अक्षर’ या शब्दात आले तर ’अक्षर’ मधील ’अ’ च्या मात्रा दोन होतात, कारण क्ष मधील अर्धा क हा ’अ’ या अक्षराबरोबर उच्चारला जातो तर श हा एकटाच राहतो. म्हणजे, मुळात ’क्ष’ हे जोडाक्षर नसूनही ते जोडाक्षराप्रमाणे वागले.
त्याचप्रमाणे ’ज्ञ’ हे अक्षर जोडाक्षर नसूनही ’अज्ञ’, ’अनभिज्ञ’ अशा शब्दांमधे आले की अनुक्रमे ’अ’ व ’भि’ च्या मात्रा दोन करते. कारण त्यातील ’द’ चा उच्चार आधीच्या अक्षरात मिसळतो. उरलेल्या ’न्य’ च्या मात्रा दोन नाहीत, एकच आहे. कारण ते मुळात जोडाक्षर नाही. ’अज्ञान’ या शब्दात ’अ’ च्या मात्रा दोन व ’ज्ञा’च्या ही मात्रा दोन कारण ’ज्ञा’मधे ’आ’ हा स्वर आहे जो गुरू आहे.
तेव्हा, अशी अक्षरे मुळात जोडाक्षरे नसूनही शब्दात मधे आली व त्यांच्या आधीचे अक्षर लघू असले तर त्याला गुरू करून टाकतात.
अपवाद क्रमांक २ -
काहीकाही वेळा जोडाक्षर पुढे असूनही मागच्या लघू अक्षराच्या दोन मात्रा होत नाहीत.
’पुन्हा’ हा असा एक शब्द! यात ’न्हा’ हे जोडाक्षर असूनही ’पु’ च्या उच्चारात त्यातील ’न’ मिसळत नाही. ’पुन्हा’चा उच्चार ’पुन - हा’ असा न होता ’पु-न्हा’ असाच होतो. मात्रा नेहमीच उच्चारावरच ठरतात.
’कट्यार’ हा असाच आणखीन एक शब्द! यात ’ट्या’ चा ’अर्धा ट’ ’क’शी लग्न करत नाही. ’कट्यारचा’ उच्चार ’क-ट्या-र’ असाच असून ’कट-या-र’ असा होत नाही.
काही वेळा पहिले जोडाक्षरच येते. अशा वेळी त्या अक्षराचा स्वर जर ’अ, उ, इ’ यापैकी असेल तर त्याची मात्रा एक व त्याचा स्वर गुरू असेल तर मात्रा दोन होतात. जसे स्वत: मधील स्व एका मात्रेचा, प्रकार मधील प्र एका मात्रेचा, त्रास मधील त्रा दोन मात्रांचा, प्रेषित मधील प्रे दोन मात्रांचा!

No comments:

Post a Comment