त्यापुर्वी:
१. गज़लेच्या प्रत्येक ओळीच्या मात्रा समानच असायला हव्यात.
२. मात्रा कशा मोजायच्या ते आपण पाहिले.
३. अक्षरगणवृत्तात गज़ल लिहिली तर आपोआपच प्रत्येक ओळीतील मात्रा समान येतातच.
४. मात्रावृत्तात लिहिण्यासाठी प्रत्येक ओळीच्या मात्रा मोजणे किंवा लयीवर पकड घेणे आवश्यक आहे.
५. गज़ल अक्षरछंदात लिहिली जात नाही. म्हणजे, अक्षरांची संख्या समान असावी हे गज़लेत आवश्यक नाही.
वृत्ते:
आधी सांगीतल्याप्रमाणे वर्षानुवर्षे कवी अनेक वृत्ते सातत्याने उपयोजत आले आहेत.
वृत्त म्हणजे लघू व गुरू अक्षरांनी ठराविक क्रमाने एखाद्या ओळीत येणे!
आपण लघू अक्षरासाठी ’ल’ हे अक्षर तर गुरू अक्षरासाठी ’गा’ हे अक्षर घेऊ. हे ’सोपीकरण’ व इतर अनेक ’सोपीकरणे’ भटसाहेबांनी आधीच केलेली आहेतच. फ़क्त त्यांच्या प्रकाशित साहित्यात सर्व माहिती एकाच ठिकाणी नसल्यामुळे ती एका ठिकाणी उपलब्ध करणे हा या सर्व लेखमालिकांच्या उद्देशांपैकी एक उद्देश आहे.
सर्वप्रथम आपण गज़लकारांकडून वारंवार वापरले जाणारे व अतिशय सोपे असे आनंदकंद वृत्त तपासू:
वर म्हंटलेच आहे की लघू अक्षरासाठी ल तर गुरू अक्षरासाठी गा हे अक्षर आपण गृहीत धरणार आहोत.
आनंदकंद मधे ल व गा या अक्षरांचा क्रम खालीलप्रमाणे येतो. (क्रमाखाली अनुक्रमे अक्षरांच्या मात्रा व एक उदाहरणादाखल ओळही लिहिलेली आहे.)
गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २ २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा
का ही त री च तू ही हो ते स पा व सा ने =
(काहीतरीच तूही होतेस पावसाने)
या वृत्तामधे जेथे टिंबे दाखवली आहेत त्या टिंबाच्या आधीचा गा व नंतरचा गा हे एका शब्दातील दोन गुरू अक्षरे असू शकत नाहीत. याला यती असे म्हणतात. यती म्हणजे जेथे पॊज घ्यायचा ती जागा! म्हणजे, ही ओळ अशी रचता येणार नाही:
का ही त री च तू ’हो... ’णा’ रे स पा व सा ने
कारण या ओळीत ’होणारेस’ या शब्दातील ’हो’ यतीच्या एकीकडे तर ’णा’ दुसरीकडे आला.
(अर्थात, गज़लेत ’होणार आहेस’ चे ’होणारेस’ असे लिहिले जातच नाही. हे फ़क्त उदाहरण दिले आहे.)
आता मूळ ओळीकडे जर पाहिले तर ’काहीतरीच तूही होतेस पावसाने’ या ओळीतील सर्व अक्षरे ही ’आनंदकंद’ या वृत्तामधे जो लघू - गुरू अक्षरांचा क्रम असतो त्याच क्रमाने आली आहेत. ती अक्षरे ’आनंदकंद’ क्रमानेच आल्यामुळे आपोआप अशा सर्व ओळींच्या मात्रांची संख्या चोवीसच होणार.
आपल्याला सुचलेली एखादी कवीकल्पना आपण जेव्हा तोंडातल्या तोंडात म्हणून पाहतो तेव्हाच आपल्याला थोडासा ठेक्याचा, लयीचा, अक्षरांच्या क्रमाचा मनातल्या मनात अभ्यास करायचा असतो. ( हे सुरुवातीच्या बाबतीतील मत आहे.)
आता आपल्यासमोर एक वृत्त उलगडले गेले आहे. त्याच वृत्तातील काही इतर उदाहरणे पाहू:
भलताच त्रास होतो.... या छान वागण्याचा
१ १ २ १ २ १ २ २.... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा!
No comments:
Post a Comment