गझलतंत्र पाहण्याआधी मात्रा आणि वृत्ते याबाबत लिहीत आहे.
मात्रा व विविध वृत्ते
गजल हे एक वृत्तबद्धच काव्य आहे. त्यात बेशिस्तपणे लिहिणे अमान्य आहे. गजलेतील प्रत्येक शेरातील प्रत्येक ओळीच्या मात्रा समानच असतात. गजल गणवृत्तात अथवा मात्रावृत्तात रचली जाते.
वृत्ताचे तीन प्रकार पडतात.
१. प्रत्येक ओळीतील शब्दांच्या एकूण मात्रा जर समान भरत असतील तर ते लिखाण वृत्तबद्ध आहे. - मात्रावृत्त!
२. प्रत्येक ओळीतील लघू व गुरू अक्षरांचा क्रम समान आहे ते वृत्तबद्ध लिखाण आहे. - गणवृत्त!
३. प्रत्येक ओळीतील अक्षरांची संख्या जर समान असेल तर ते अक्षरछंदातील लिखाण आहे. -अक्षरछंद!
गज़ल अक्षरछंदात लिहिली जात नाही.
जेव्हा आपण गज़लेच्या प्रत्येक ओळीत लघू व गुरू अक्षरे ठराविक क्रमानेच लिहितो तेव्हा आपोआपच प्रत्येक ओळीच्या मात्रा समान भरतातच. याला अक्षरगणवृत्त किंवा नुसते गणवृत्त असे म्हणतात. अशा वृत्ताचा वापर केल्यास मात्रा मोजत बसाव्या लागतच नाहीत. परंतू काही वेळा गज़ल अक्षरगणवृत्तात न लिहूनही तिच्या प्रत्येक ओळीच्या मात्रा समान भरतात. म्हणजे, लघू व गुरू अक्षरांचा क्रम ओळीओळीत वेगवेगळा घेऊनही प्रत्येक ओळीच्या मात्रा समान असू शकतात. त्याला मात्रावृत्त असे म्हणतात.
वृत्तात लिखाण करणे हा फ़क्त सरावाचाच भाग आहे. वृत्ताची भीती बाळगण्यासारखे काहीही नाही. अगदी मात्रावृत्तात जरी गज़ल रचली तरीही सुरुवातीलाच जरा मात्रा मोजाव्या वगैरे लागतात. हे फ़क्त ’लय’ डोक्यात बसेपर्यंतच करावे लागते. एकदा ओळीची लय पक्की झाली, जी सरावाने होतेच, की मात्रावृत्तात अगदी आत्मविश्वासाने गज़ल लिहिता येईल.
एकंदर:
१. गज़लेतील प्रत्येक ओळीच्या मात्रा समान आल्याच पाहिजेत.
२. गज़ल कधीही अक्षरछंदात लिहिली जात नाही. गज़लेतील ओळीतील अक्षरांची संख्या महत्वाची नाही.
३. अक्षरगणवृत्तात गज़ल लिहिल्यास आपोआप सर्व ओळीतील मात्र समान येतातच.
४. मात्रावृत्तात गज़ल लिहिल्यास अक्षरांचा क्रम जरी ओळी-ओळीत वेगवेगळा आला तरी मात्रांची संख्या समानच असायला हवी.
गज़ल कधीही वृत्ताबाहेर (गणवृत्ताबाहेर किंवा मात्रावृत्ताबाहेर ) लिहिली जाऊ शकत नाही. असमान मात्रा असलेल्या ओळी किंवा अक्षरगणवृत्तातील लघू - गुरू अक्षरांचा क्रम न पाळणारी गज़ल ही ’गज़ल’ नसते.
मात्रा -
वृत्ताची माहिती होण्यासाठी मात्रा कशा मोजता येतील ते बघणे जरूरीचे आहे.
मात्रा म्हणजे - कोणताही शब्द / अक्षर उच्चारण्यास लागणारा काळ!
हा काळ मोजण्यासाठी एक मात्रा, दोन मात्रा असा मोजला जातो.
मराठी भाषेत तीन मात्रांचे अक्षर नसते. तसेच, दीड, अडीच मात्रांचे वगैरेही अक्षर नसते.
अक्षर एक तर एक मात्रेचे किंवा दोन मात्रांचेच असू शकते.
उघड आहे, मात्रा म्हणजे एखादी ओळ उच्चारण्यास लागणारा काळ असल्यामुळे व गज़लेतील प्रत्येक ओळ समान मात्रांचीच असल्यामुळे गज़लेच्या सर्व ओळी समान कालावधीतच उच्चारून होतात. यामुळेच प्रत्येक गज़ल ही ’गेय’ होतेच! संगीतकारासाठी गज़लेला चाल लावून ती गीतस्वरुपात प्रसिद्ध करणे अगदी सहज शक्य होते ते यामुळेच.
सुरुवातील, ’प्रत्येक शब्दाच्या / अक्षराच्या मात्रा किती’ हे मोजूनच माणूस एखादी ओळ रचणार यात काहीही गैर नाही. मात्र, वृत्ताप्रमाणेच, मात्रा ही पण एक सरावाने पकडीत येणारी गोष्ट आहे. सरावानंतर मात्रा मोजत बसाव्या लागत नाहीत.
मात्रा कशा मोजायच्या हे मात्र अनेक उदाहरणांसहित पहावे लागेल. कारण हा गज़लतंत्रातील, ’मतला-रदीफ़-काफ़िया-अलामत’ यानंतरचा सर्वात महत्वाचा भाग आहे.
खाली अनेक अक्षरांच्या, ओळीच्या मात्रा मोजून दाखवलेल्या आहेत.
मराठीतील सर्व अक्षरे एक किंवा दोन मात्रांचीच असू शकतात. अधले मधले आकडे किंवा दोनहून अधिक मात्रा मराठीत नाहीत.
मराठी भाषेतील एकंदर स्वर खालीलप्रमाणे आहेत.
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अ:
यातील फ़क्त अ, इ व उ हे तीनच स्वर एका मात्रेच आहेत. याचा अर्थ असा की ज्या अक्षरांमधे हे स्वर असतील ती अक्षरे सुट्टी असल्यास त्यांची मात्रा एकच होईल. एक मात्रेच्या अक्षरांना लघू अक्षर म्हणतात. या विधानातील ’सुट्टी असल्यास’ या शब्दप्रयोगाचा अर्थ पुढे दिलेलाच आहे.
तसेच, आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ: या प्रत्येक स्वराच्या मात्रा दोन होतात. याचा अर्थ असा की मराठीतील ज्या अक्षरांमधे हे स्वर असतील त्यांच्या मात्रा दोन होणारच! दोन मात्रांच्या अक्षरांना गुरू अक्षर असे म्हणतात.
No comments:
Post a Comment