गजलेचा इतिहास
प्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की गझल हा काव्यप्रकार पूर्णतः उत्स्फुर्तपणे सुचणे जवळपास अशक्य आहे. इतर कविता, विशेषतः आज लिहिल्या जाणार्या मुक्तछंदातील कविता एखाद्याला वरपासून खालपर्यंत सलग लिहिणे शक्यही होईल. गझलेतील मात्र एखादी ओळ, एखादा शेर, एखादी कल्पना, असे सुचू शकते. त्यावरून व त्यानंतर इतर काही विचार गुंफले जाऊ शकतात. गझलेतील प्रत्येक शेर एक वेगळी कविता असल्याने, एकाच तंत्रात पाच विविध विचार कवीला एकत्रितरीत्या सुचणे जवळपास अशक्य असते.
याचमुळे गझल हा कृत्रिम काव्यप्रकार आहे अशी टीकाही होते आणि त्या कृत्रिमतेतही रंगीनता, सुलभता, सच्चाई आणि मनाला भिडणारा आशय मांडताही येतो. अशा प्रकारे, मूळ कल्पना काही टक्के आणि उरलेले टक्के 'कारागिरी' असे गझलेचे स्वरूप दिसते.
असे स्वरूप असलेली गझल करणे हे मुळीच कमीपणाचे लक्षण नाही. त्यात अपराधी मानण्यासारखे, आम्हाला शब्द ठोकावे लागतात असे म्हणण्यासारखे काहीही नाही. हा काव्यप्रकारच तसा आहे.
गझलेचा इतिहास मात्र खूपच जुना आणि क्लिष्ट आहे.
अरबांनी इराणवर केलेल्या हल्यानंतर 'स्थानिक फार्सी' भाषेऐवजी 'अरबी' बोलली जावी असा हुकूम काढला. इराण या तुलनेने दुर्बल असलेल्या देशातील साहित्य संस्कृती मात्र अरबांपेक्षा श्रेष्ठ होती असे म्हणतात. अरबी संस्कृतीत 'कसीदा' नावाचे काव्य रचले जायचे. सरदार, सुलतात, शहा अशा लोकांची जाहीर स्तुती करणारे काव्य असे त्याचे स्वरूप होते. हे काव्य रचून सादर केल्याबद्दल बिदागी मिळायची. हे काव्य गायच्य आधी 'तशबीब' म्हणून काही ओळी गायल्या जायच्या त्या गझल तंत्रात असायच्या.
हा तशबीब प्रकार इराण्यांनी स्वतळ्च्या संस्कृतीत स्वीकारला कारण तो मधुर होता व तो त्यांना आवडलाही.
काही जाणकारांच्या मते 'हाच' गझलेचा जन्म होता.
आश्चर्य करण्याजोगी बाब म्हणजे अरबांच्या सत्तापिपासेत असलेली सामाजिक स्थिती आणि त्यातच फुलणारी गझल!
इराण, अफगाणिस्तान मार्गे भारतात पोचलेल्या मुघलांनी शतकानुशतके राज्य केले. मुघलांची शासनव्यवस्था आपण सगळे जाणतोच!
कोणत्याही समाजाची स्थिती, संस्कृती व प्रगतीशीलता ही त्यातील स्त्रियांच्या स्थानावरून ठरायला हरकत नाही.
मुघल समाजात अर्थातच बुरखा ही स्त्रियांचे स्थान दाखवणारी वस्तू होती.
दिल्लीतील तो काळ हा मानवतेवर लागलेला कलंकच म्हणावा लागेल. नादिरशहा आणि अब्दाली या दोघांनी आणि अनेकदा मराठ्यांनी दिल्लीला 'उजाड' बनवले. अमानवी वृत्तीचे इतके प्रचंड प्रदर्शन अभूतपुर्वच म्हणावे लागेल. आज जो राजा / सुलतान आहे तो उद्या रस्त्यावर फरफटत आणला जात आहे. त्याचे डोळे फोडले जात आहेत. हाल हाल करून त्याला सर्वांसमक्ष मारले जात आहे. त्याचा जनानखाना विटंबिला जात आहे. आणि त्याचे राज्य लुटले जात आहे. हे करणारा दुसर्याच दिवशी स्वतःही अशाच परिस्थितीला सामोरा जात आहे. त्याला मारणारा कुणीतरी तिसराच निघत आहे.
आहे त्या परिस्थितीत घरदार सोडून पळणे, बायकांनी पुरुषाचा वेश धारण करून पळणे, सर्वत्र आगी लागलेल्या, सर्व काही उद्ध्वस्त झालेले, प्रेतांचा खच, कुणीही कुणालाही केवळ अन्नासाठी लुटत आहे अशी अत्यंत भयाण परिस्थिती दिल्लीत होती.
या काळात तेथे असलेली वस्ती आणि संस्कृतीही आजच्यासारखी नव्हतीच!
अत्यंत अरुंद गल्या, अस्वच्छ कारभार, त्यातच मशिदी, बुरख्याशिवाय स्त्री न दिसणे, अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थिती, व्यसनाधीनता, स्त्रीचा सहवास अशक्य असल्यामुळे किवा मूळ संस्कृतीतच ते मान्य असल्यामुळे समलिंगी संभोग अत्यंत मोठ्या प्रमाणावर असणे, सततची हिंसा, कशाचीही खात्री राहिलेली नसणे, गरीबी हे सर्व तेथील स्वभावविशेष होते.
मानवी मनाला स्थैर्य आणि सुरक्षितता अत्यावश्यक वाटतात. त्यामुळे या अशा परिस्थितीतही मिळतील ते चार बरे क्षण खूप असायचे. आवडत्या स्त्रीच्या चेहर्यावरून क्षणभरासाठी नकाब सरकणे, नजरानजर होणे, त्या नजरानजरेतूनच लाखो संदेश एकमेकांना पोचवले जाणे, व्यक्तीकरणासाठी इतर कोणतेही माध्यम उपलब्ध नसतानाही केवळ छतावर येऊन एकदा 'दीदार' व्हावा यासाठीची धडपड ही आयुष्यभर त्या अव्यक्त प्रेमाची तीव्रता बोचरी बनवत जाणारे आणि त्यातूनच हेलावणारे काव्य निर्माण करणारे घटक होते.
इराण व अफगाणिस्तान मार्गे येथे आलेल्या सैन्याबरोबर अनेक विद्वान, कवी, तत्ववेत्तेही आलेले होते. त्यांच्या येथील सैन्यात भारतीय सैनिक होते. दोन वेगळ्या भाषांमध्ये संभाषण अवघड असल्यामुळे नवीन भाषेची निर्मीती झाली. उर्दू! उर्दूचा अर्थ सैनिकांची छावणी असा आहे. उर्दूला आधी रेख्ता म्हणत!
केवळ चिखलातूनच कमळे उगवावीत तसे फार्सी आणि आता उर्दू कवींनी रचलेली शायरी ही त्याही परिस्थितीत दिल्लीची जान बनली.
Friday, 26 October 2018
गझल २
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment