गेली दोन-तीन वर्षे
श्रद्धा-अश्रद्धा-अंधश्रद्धा आणि विज्ञान याविषयांतर्गत घटना प्रसंगानुरूप चिकित्सक लिहितो आहे.
बरेचसे विज्ञान,तर्क,अनुमान,आणि व्यवहारतील गमतीजमती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न चालू आहे.
अर्थातच अशा घटना ऐकल्यानंतर त्यास अनुसरणारे आणि हिणवणारे असे दोनच वर्ग समाजात सापडतात. आपण त्या दोघांच्याही थोडे पुढे जाऊन विचार करावा.
पोलीस खात्यात काम करणारे, मुंबई स्थित, पण मूळचे पूर्व महाराष्ट्रातील आर बी देशमुख हे एक सत्वशील, आध्यात्मिक, साहित्यिक-रसिक, अधिकारी मित्र.
अधून-मधून त्यांचं लेखन वाचावयास पाठवितात.
खूप छान लिहितात.
परवा त्यांचा एक लेख वाचला, 'खोटे बोलण्याची कला'
या लेखात 'शनिवारी गोड तेल घरी आणू नये' अशा आशयाचं एक वाक्य वाचनात आलं. बहुधा त्यांच्या सौभाग्यवतींच्या अनुभव समृद्धतेतूनच ते आलं असावं.
झालं. आम्हाला असं काही सापडण्याचा अवकाश. चिकित्सा सुरू. पण थातूरमातूर काही न लिहिता; मुळापर्यत जाऊन विचार करण्याची सवय ठेवलीय. त्या संदर्भात खुलासा आणि विचार:
विज्ञानयुगात आज अनेक क्षेत्रात नवनव्या संशोधनाने आणि शोधांनी मानवी श्रम, वेळ आणि आर्थिक बचत साधली आहे. त्यामानाने पूर्वी विज्ञानाचा अभ्यास नसतानाही, केवळ अनुभूतींतून अनेक चांगल्या गोष्टी शकून-अपशकुनाच्या माध्यमातून सर्वश्रुत झाल्या होत्या असे आढळते.
शनिवार हा आठवड्यातला शेवटचा दिवस. रविवार सुटीचा किंवा विश्रांतीचा/बाजारचा दिवस. त्यादिवशी गावातील व्यवहार बंद.सर्वजण गावाजवळच्या मोठ्या शहरात खरेदीसाठी जात.संसारासाठी लागणाऱ्या चीजवस्तू खरेदी करण्यासाठी. व्यापारीही आठवडाभर विक्रीसाठी लागणाऱ्या वस्तूंची याचदिवशी खरेदी करत. आजही अशीच प्रथा आहे.
पूर्वीचा काळ म्हणजे मानवी श्रमाचा.
तेल काढण्यासाठी बैलघाणी किंवा लकडीघाणा यांचाच वापर. ग्राहकाला ताजा व चांगला माल मिळावा या उद्देशाने व्यापारी आठवडाभर खप होईल व पुरेल इतकाच माल खरेदी करत. तेली हा आलुतेदारही आठवड्यात अपेक्षित खप होईल इतकेच उत्पादन घेई. तेव्हा रिफाइन्ड किंवा फिल्टर या प्रक्रिया होत नव्हत्या. त्यामुळे दिसण्यापेक्षा असण्याला जास्त महत्व.
खरंतर भाग्यवान लोक. त्यांना कच्च्या घाणीचे तेल आपोआपच खायला मिळे. कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय बनविलेलं.
आमच्या लहानपणी गोडंतेल विकत आणल्याचं आठवत नाही. घरच्या शेतातून आलेल्या भुईमूग, तीळ, कोरटे, करडे आणि वेगवेळ्या निमित्ताने फोडलेल्या नारळांतील खोबरे यापासून घाण्यावर काढून आणलेलं तेलच नित्यनेमाने घरात वापरले जाई.
तेलबिया कोणत्याही असोत.घाणा काढून (तेल गाळून) आल्यावर पणजी (आजीची आई) सर्व तेल एका डब्यात भरून थोडं पाणी त्यात टाकत असे. 'ती असं का करते?' या कुतुहलाने विचारलेल्या प्रश्नाचं तिने दिलेलं उत्तर- 'पाणी टाकलं की तेलात तरंगत असलेला पेंडीचा अंश जड होऊन खाली बसतो. वर चांगलं तेल राहतं.'
ही तेल शुद्धीकरणाची भौतिक पद्धत.
तर *आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी तेल व्यापारी/तेली यांच्याकडे शेवट उरलेलं तेल असणार. त्यात पेंडीचा थोडा-फार गाळ/अंश असणार तो येऊ नये. म्हणून शनिवारी गोडंतेल घरी आणू नये.* असा प्रघात रूढ झाला असावा.
शास्त्र आणि व्यवहाराचा साधलेला सुरेख मेळ असंच त्याला म्हणावं लागेल.
*nikade64@gmail.com*
*shikshanyatra.blogspot.com*
*chandrakantnikade.blogspot.com*
No comments:
Post a Comment