. *साजणा रे*
ये असा तू सांज-सकाळी
विरह किती साहू
साजणा थकले डोळे ओठही सुकले
अंत नको पाहू
चैत्रपालवी फुटू लागली फांदी फांदीवर
पानांचे कोवळे धुमारे
लाली टोकावर
सांग कोणत्या रागामधुनी
गीत तुला आळवू ॥१॥
आतुरतेने वाट पाहते
रोज चराचर तुझी
का ठेवीशी अंतर झाली
इतकी ऊंची खुजी
निर्वाणीचे सूर ऐकता
वेळ नको लावू ॥२॥
आतुरता दाटली वाटते
धरतीच्या भेगांत
आकाशाचे आभाळ व्हावे सर यावी वेगात
पावसा ! ऐक एकदा हाक प्रियेची दूर नको जाऊ ॥३॥
*© रमेश कुरलीकर*
No comments:
Post a Comment