वात्रटिका हा एक विनोदी काव्य प्रकार आहे.वात्रटिकांना हास्यकविता, उपरोधिका,व्यंग्यकविता, भाष्यकविता, विडंबन, उपहासिका अशी नावेसुद्धा वापरलेली जातात.
स्वरूप
चारोळ्या,आठोळ्या हे दोन मुख्य प्रकार वापरले जातात. वात्रटिका हा काव्य प्रकार पश्चिमी ‘लिम् रिक’ या पद्यप्रकाराचा समकक्ष आहे.वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकमेव आणि अंतिम कार्य नव्हे.साधारणत: चार-पाच ओळींत चमकदार, विनोदी कल्पना अथवा चुटका वात्रटिकेत गुंफलेला असतो. आशयाच्या अथवा कल्पनाविस्ताराच्या दृष्टीने कधीकधी सहा ते आठ ओळींचीही वात्रटिका असते.साधारणतः लिम् रिकच्या पहिल्या ओळीत मुख्य पात्र व पार्श्वभूमी, दुसऱ्या ओळीत कृती, तिसऱ्या व चौथ्या ओळींत कृतिविस्तार आणि पाचव्या ओळीत ‘तार्किक विक्षिप्तपणा’ येतो.
इतिहास
भारतीय लोकसाहित्य,संतसाहित्य, कथाकाव्ये यातही याची बीजे आढळून येतात. मराठीमध्ये ‘वात्रटिका’ या काव्यप्रकाराचे मूळ साधारणपणे १९५४ च्या आसपास सदानंद रेगे यांनी लिहिलेल्या ‘किंचित काव्य’ या प्रकारात आढळते.पण हा काव्यप्रकार मुख्यत्वे प्रतिष्ठित केला, तो मंगेश पाडगावकर यांनी. त्यांचा वात्रटिका हा संग्रह १९६४ मध्ये प्रसिद्ध झाला. सामान्यपणे त्यांच्या वात्रटिकांची सुरुवात –‘एक होती/आहे…’ या वाक्यांशाने होते व व्यक्ती वा स्थळ या नावाने पहिल्या ओळीचा शेवट होतो. मंगेश पाडगावकरांनी काका, कावळा, कोकिळा, गवई, निजाम, न्हावी, पंडित, पावटा, पुढारी, पोपट, बाई, बाटली, बेदाणा, ब्रह्मचारी, पुजारी, मुका, शेटजी, शायर, अशा असंख्य विषयांवर वात्रटिका रचल्या. नमुन्यादाखल पाडगावकरांची ‘नाते’ ही वात्रटिका पाहता येईल :
‘एक आहे पाववाला
तो माझा गाववाला
एक म्हातारी विकते भाजी
ती माझ्या एका दोस्ताची आजी
आणि एक आहे समोर देखणी बाई
ती मात्र अजून माझी कोणी नाही’
कमीत कमी शब्द,नवशब्द निर्मिती, गंमतीशीर यमके, विक्षिप्त व वैचित्र्यपूर्ण अशी कल्पनाचमत्कृती, अतिशयोक्ती, विडंबन, मिस्किलपणा, थट्टेखोरपणा, मर्मांवर बोट ठेवण्याची वृत्ती, दांभिकतेवर प्रहार, अधूनमधून द्वयर्थी वाक्यरचना ही त्यांच्या वात्रटिकांची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. फ. मुं. शिंदे, रामदास फुटाणे,अशोक नायगावकर,रामदास कामत,भारत सातपुते,संजय वरकड, हेरंब कुलकर्णी,सुरेश शिंदे, साहेबराव ठाणगे, प्रशांत मोरे, तुकाराम धांडे, संजीवनी तडेगावकर, जयराम खेडकर, इंद्रजीत घुले, शिवाजी सातपुते, प्रकाश घोडके इ. कवींनी वात्रटिका हा प्रकार विशेषत्वाने हाताळला आहे.
लिम्रिक
या काव्यप्रकाराचे मूळ अज्ञात असले, तरी एम्.रसेल, एस्.जे. यांनी ‘लीअरिक’ हा शब्द एडवर्ड लीअरच्या नावावरून तयार केला.त्यावरून लिम्रिक आले असावे. हा काव्यप्रकार आयरिश सैनिकांनी आणला, अशीही एक उपपत्ती आहे. हा मूळ जुना फ्रेंच काव्यप्रकार असावा.तो आयरिश सैनिकांनी फ्रेंच युद्धावरून परतताना १७०० च्या दरम्यान आर्यलंडमध्ये आणला. फ्रेंच व आयरिश सैनिक लिम्रिक म्हणताना एकत्र येत. त्यातून त्यांच्या वराकीत अनेक लिम्रिक काव्यरचना जन्माला आल्या. लिम्रिक हे आयर्लंडच्या पश्चिम किनाऱ्यावरचे एक प्रमुख बंदर.या बंदरावरून लिम्रिक नाव आले, अशी एक उपपत्ती आहे. लँगफर्ड रीडने या शहरावरच एक लिम्रिक लिहिले :
१७१९मध्ये प्रसिद्ध झालेल्या मदर गूसेस मेलडीज् फॉर चिल्ड्रेन या शिशुगीतसंग्रहात लिम्रिकचा उगम पाहावयास मिळतो.त्यानंतर द हिस्टरी ऑफ सिक्स्टीन वंडरफुल ओल्ड विमेन (१८२१) व ॲनक्डोट्स अॅन्ड ॲडव्हेंचर्स ऑफ फिफ्टीन जंटलमेन (१८२२) यांमध्ये लिम्रिक आढळतो.हा काव्यप्रकार कवी व चित्रकार एडवर्ड लीअरने (१८१२-८८) अधिक लोकप्रिय केला. त्याची काव्यरचना व चित्रसजावट असलेला द बुक ऑफ नॉनसेंस (१८४६) हा प्रसिद्ध लिम्रिक-संग्रह होय. तसेच त्याचा मोअर नॉनसेन्स पिक्चर्स, ऱ्हाइम्स, बॉटनी एट्सेट्रा (१८७२) हा संग्रहही लक्षणीय आहे.बडबडगीत वा निरर्थिका (नॉन्सेन्स ऱ्हाइम) हा काव्यप्रकार वात्रटिकेला स्वभावतः खूप जवळचा असा आहे.
सादरीकरण
वात्रटिकांचा जगभराच्या अनेक भाषांमध्ये संचार दिसतो. परिणामी त्या जागतिक संस्कृतीचाच एक भाग बनलेल्या आहेत.वात्रटिका जरी लिखित रूपात अवतरत असल्या, तरी त्यांचे तालबद्ध ठेक्यात जाहीर वाचन होऊ शकते. त्यांचे मूळ रूप हे मौखिक आहे.
सामान्यपणे लिम्रिक ही पार्टीमध्ये म्हटली जाते. त्यात पाहुण्यांना काव्यरचना करण्यास व गाण्यास आव्हान दिले जाई. प्रत्येक कडव्यानंतर, ‘कम अप टू लिम्रिक’ ही ओळ समूहस्वरात म्हटली जाई. विसाव्या शतकाच्या प्रारंभी लिम्रिकच्या जाहीर स्पर्धा होऊ लागल्या. बुद्धीची चमक अधिक दाखविणारी शेवटची ओळ लिहिणाराला मोठे बक्षीस मिळे. लिम्रिक हे उपहासाचे साधन असल्याने महत्त्वाच्या व्यक्ती, संस्था, राजकारण आणि स्त्रीपुरुषसंबंध यांच्यावर कवींनी शरसंधान केले. इंग्रजीमध्ये रोसेटी, स्विनबर्न, रस्किन, वॉल्टर द ला मेअर, टी. एस्. एलियट, डब्ल्यू. एच्. ऑडन यांसारखे कवी या प्रकाराकडे आकृष्ट झाले.
No comments:
Post a Comment