*प्रिया चालली कुठे?*
नक्षत्रांचे गजरे माळूनी
प्रिया चालली कुठे?
तिला पाहता सजता-धजता
तीळतीळ काळीज तुटे॥धृ॥
मी वाटेवर तिच्या थांबलो
ठाऊक तिजला नाही
शतजन्मीच्या आणा-भाका
विसरून केली घाई
आठवणींची माळ हिणवते
हृदया पाझर फुटे ॥१॥
उदास जगणे येईल नशिबी
कसे मना आवरू
कोण या क्षणी आधाराला
ध्यास कुणाचा धरू
धीर मनाचा आता माझ्या
उरलासुरला सुटे ॥२॥
*© रमेश*
No comments:
Post a Comment