Tuesday, 21 May 2019

विडंबन

*विडंबन*

एखादी प्रसिद्ध साहित्यकृती वा साहित्यप्रकार वा रुपबंध याच्या भाषिक, घाटात्मक अगर वाङ्‌मयीन संकेतांचे अनुकरण, तसेच एखाद्या प्रसिद्ध साहित्यिकाच्या भाषिक अगर तांत्रिक लकबीचे अनुकरण विडंबन या प्रकारात केले जाते. हे विडंबन सहेतुक व बहुशःविनोद उपहास अगर व्यंजना या अभिव्यक्तीच्या अंगांनी साधलेले असते. विडंबनाचे सम्यक आकलन ते ज्या मूळ साहित्यकृतीचे अनुकरण करते, ती चांगली अवगत असणाऱ्यालाच होते. या अर्थाने विडंबन हा परपुष्ट लेखनप्रकार आहे. मूळ साहित्यकृती (जिला ‘विडंबित’ म्हणता येईल) बहुधा गंभीर आशय व्यक्त करणारी असते. तसेच काही विशिष्ट अलंकार, संकेत अगर शैलीच्या लकबींचा त्यात अतिरेक दिसून येतो. विडंबिताच्या सौंदर्यात्मक व नीतिमूल्यात्मक गृहीतकांना आव्हान देणे, त्यांचा प्रतिवाद करणे, अगर विडंबनाद्वारे मूळ साहित्यकृतीतील काव्यदोष वा साहित्यदोष अतिशयोक्त स्वरूपात मांडून वाचकाती तत्संबद्ध अभिरुची सजग करणे, हे विडंबनाचे काही प्रमुख हेतू होत. गंभीर आशय व्यक्त करणारे विडंबित (उदा., महाकाव्य, ऐतिहासिक नाटक, वीरकथा इ.) याच्या विडंबनाचे प्रामुख्याने तीन प्रकार दिसून येतात. वर्ण्य विषय व शैली यांत हेतुतः विसंगती आणून-(१) गंभीर वर्ण्य विषय व क्षुल्लक शैली यांची सांगड घातली जाते, याउलट (२) क्षुल्लक विषय गंभीर शैली यांची सांगड आणि (३) गंभीर व क्षुल्लक शैलींची हेतुतः केलेली सरमिसळ हा तिसरा व प्रत्यक्षात अधिक विपुलतेने आढळणारा प्रकार म्हणता येईल. कारण पहिले दोन प्रकार अधिक विस्ताराने हाताळणे अवघड असते.

*विडंबन म्हणजे गंभीर वर्ण्य विषयाची, तसेच आदरणीय साहित्यिक अगर साहित्यकृती यांची टवाळी असा सर्वसाधारण समज आहे. पण टवाळी अगर निरागस विनोद म्हटला तरी या गोष्टी साधणे हा विडंबनाचा एकमेव हेतू नाही. हास्य हा पुष्कळशा यशस्वी विडंबनांत प्रारंभबिंदू असतो. पण याद्वारे विडंबनकाराला साध्य करावयाची असते ती जीवनाची समीक्षा.*

विडंबित ज्या कालखंडाचे व समाजाचे प्रतिनिधित्व करते त्यांना आणि विडंबनकार ज्या कालखंड-समाजाचा घटक आहे त्यांना तुलनात्मक दृष्ट्या एकत्र आणून दोन सौंदर्यात्मक व नीतिमूल्यात्मक संकल्पना-व्यवस्थांचा तौलनिक वेढ घेणे आणि त्यातील एक (पुष्कळदा विडंबितामध्ये प्रतिबिंबित झालेली) संकल्पना-व्यवस्था मानदंडरूप मानून विडंबनकाराच्या कालखंडाची व समाजाची समीक्षा करणे, ही विडंबनाची प्रमुख प्रेरणा आहे. विडंबनकार हा एका विशिष्ट अर्थाने उपरोधकार असतो. उपरोधकार हा मूलतः नीतिनिष्ठ असतो. जीवनातील अमंगल, असुंदर व दुरितमय यांच्यावर तो शाब्दिक हल्ला चढवतो. या लक्ष्यांच्या गांभीर्यानुसार छटा बदलणारा विनोद हे उपरोधकाराचे शस्त्र असते. विडंबनकाराचे लक्ष्य हे व्यापक दृष्ट्या सामाजिक अमंगल-असुंदर न राहता साहित्यातील त्यांच्या आविष्कारापुरते सीमित होते. जीवनातील सत्य, शिव व सुंदर साहित्यात प्रतिबिंबित व्हावे अशी अपेक्षा असते; पण प्रत्यक्षात त्यांना विरोधी अशा प्रवृत्तीसुद्धा साहित्यात घुसू शकतात. त्यांपासून साहित्याचे संरक्षण व्हावे अशी विडंबनकारची तीव्र प्रेरणा असते. त्या अर्थाने समाजाच्या अभिरुचीचा तो रक्षक आहे. सारासारविचार व औचित्यविवेक हे विडंबनाच्या केंद्रस्थानी असतात.
विडंबनाला समानार्थक असा पाश्चात्य वाङ्‌मयातील ‘पॅरीड’ हा कालौधात विकसित झालेला लोकप्रिय लेखनप्रकार असून तो वाङ्‌मयप्रकार व लेखनतंत्र अशा दोन्ही स्वरूपांत आढळतो. ‘पॅरडी’ या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ-‘च्याबरोबर गाइले जाणारे गीत’. गंभीर आशय-शैलीतील काव्य-नाटक प्रकारांच्या बरोबरीनेच, त्या प्रकारामुळे निर्माण होणाऱ्या भावनिक ताणाचे विसर्जन करणारे, जीवनाच्या उदात्त-गंभीर-करूण दर्शनाच्या जोडीने त्यातील विसंगत, अनुदात्त अगर विदूषकी अंगांकडे रसिकांचे लक्ष वेधून एक बृहद व सम्यक साहित्यानुभव देणे, पॅरडीच्या मूळ अर्थातच स्पष्ट होते. एका बाजूने गंभीर वाङ्‌मयात सातत्याने होत असलेल्या, वर्ण्य विषय व शैली या दोन्हींच्या गंभीर पातळीवर संचारामुळे अनुभवास येणारा एकसुरीपणा टाळणे हे कार्य टाळणे हे कार्य पाश्चात्त्य विडंबन करीत आले, तर दुसऱ्या बाजूला विडंबनकाराच्या समाजाची जीवनमुल्ये व नीतिसौंदर्यविषयक गृहितके यांना पूर्वसूरींच्या आदर्शवादी वाङ्‌मयातील मानदंडाद्वारे आव्हान देणे, हे महत्त्वाचे कार्यही या साहित्यप्रकाराने केले.

*सौजन्य:विकासपिडीया*

No comments:

Post a Comment