*जीवनातला अनमोल क्षण*
आईसाहेबांच्या हातात शब्दांची कहाणी हे पुस्तक पाहिल्यापासून मनात एक उत्सुकता निर्माण झाली होती. 'कधी एकदा हे पुस्तक आपल्या हातात पडेल !'असं वाटत होतं.
हा योग जुळून आला. सन्मित्र सदानंद पवार यांच्या कन्येला कदम सरांना भेटायचे होते. कालची वेळ ठरली आणि प्रवासाला सुरुवात झाली सोबत प्रकाश पाटीलसर, प्रकाश ठाणेकरसर, संजय कळकेसर आणि सदानंद पोवार, सुकन्या पोवार व आकांक्षा ठाणेकर.
_आजवर जेव्हा-जेव्हा कदम सरांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा-तेव्हा मा गायकवाड साहेब यांच्यासोबतच गेलो. त्यांच्यामुळेच सदानंद कदम यांच्यासारखा बहुपेडी व्यक्तिमत्व असलेला,सडेतोड-परखड बोलणारा, Friend Philosopher and Guide याहून आणखी काहीतरी असणारा जे शब्दांत सांगता येत नाही असा मित्र मिळाला.मात्र यावेळी गायकवाड साहेब त्यांच्या पूर्वनियोजित व्याख्यानांमुळे सोबत येऊ शकले नाहीत. ही एक रुखरुख लागून राहिली होती._
ही चार गावची मंडळी एकत्र यायला नाही म्हटलं तरी तासाभराचा वेळ गेलाच. आम्ही काहीजण मुख्याध्यापक संघात जमलो होतो तेथून गाडीने नॅशनल हायवेच्या सांगली फाट्यावर आलो. सदानंद व सुकन्या वाट पाहत उभे होते. त्यांना घेऊन प्रवास सुरु झाला.
नियोजित वेळेत तासाभराचा उशीर झाला होता. त्यातला काही वेळ वाचवता यावा यासाठी मुख्य रस्त्याने गाडी न घेता आमचे कुशल सारथी प्रकाश पाटील यांनी इमान धामणी मार्गे गाडी घेतली. जेमतेम शंभर फुटी रोडपर्यंत आलो असेन तोवर कदम सरांचा कॉल आला "कुठे आहात ? लवकर या. तुमचे मित्र वाट पाहत आहेत."
एवढेच त्यांनी सांगितले. मनाची उत्सुकता अधिकच ताणली गेली. कोण असतील ? कुठचे असतील ? ओळखीच्या अनेक जणांची स्मृती चित्रं मनचक्षूसमोर तरळून गेली. पक्का अंदाज काही बांधता येत नव्हता. गाडी गतीने पुढे सरकत होती. क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून कुपवाड रोडला वळत असतानाच लक्षात आलं या रोडवरच्या एका उड्डाणपुलाचं गेली दोन वर्ष काम चालू आहे ते पूर्ण झालेले नाही. परत दुसऱ्या मार्गे गाडी वळवली. सरांच्या घरासमोरील अंगणात गेलो. सर नेहमीच्या सुहास्य मुद्रेने स्वागताला सज्ज होते. त्यांच्या बंगल्यासमोर सदाबहार असा एक कांचन वृक्ष आहे. माझ्या पाहण्यातील अनेक कांचन वृक्ष ठराविक मोसमातच फुललेले बघायला मिळतात. मात्र या कांचन वृक्षाला बारमाही फुले असतात आणि जेव्हा-जेव्हा सरांकडे जाणं होतं तेव्हा-तेव्हा मला त्या फुलांच्या नाजूक गुलाबी-जांभळ्या रंगाच्या पाकळ्या खाण्याचा विकार जडला आहे. (या पाकळ्या हे मुळव्याधीवरचं हुकमी औषध आहे.) गाडी थांबल्याबरोबर सर्व जण आत घरात जात असतानाच मी त्या वृक्षराजाकडे मोर्चा वळवला. हाताला येतील अशा फांदीवरच्या दोन-चार फुलांच्या त्या गुलाबी-जांभळ्या रंगाच्या नाजूक पाकळ्या हळूच काढून घेतल्या आणि त्यांचा आस्वाद घेत घेत घरात प्रवेश केला.
एक जुने मित्र, ज्यांची ज्येष्ठ कथाकार आप्पासाहेब खोत यांच्या सोबतीने दिल्ली येथील त्यांचा आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला जाताना ओळख झाली होती आणि ओळखीचे पक्क्या मैत्रीत रूपांतर झाले होते ते नागनाथ अण्णांचे निकटवर्तीय व कदम सरांचेही परममित्र आहेत असे सदाशिव खोतसर घरातून धावतच बाहेर आले. "डॉक्टर (सन १९८४ मध्ये टायफाईड झाला तेव्हा मी शेवटचं इंजेक्शन घेतल्याचे आठवते. तेव्हापासून माझी आई आणि आजी यांनी सांगितलेल्या काष्ठौषधींचा वापर करत आलो आहे. दिल्लीला जाताना नेहमी प्रवासात गरज भासणाऱ्या काष्ठौषधींच्या काही मात्रा बरोबर होत्या. त्या पाहूनच सदाशिव खोत सर यांनी हे नामाभिधान दिलं होतं.) या केव्हापासून वाट पाहतोय." असे म्हणून कडाडून आपल्या बाहूत सामावून घेतले. विचारपूस करण्यात, एकमेकांची ख्यालीखुशाली विचारण्यात काही वेळ गेला आणि कदम सरांचा निरोप घेऊन ते निघाले. आम्ही कदम सरांच्या अभ्यासालयात पोहोचलो.
आकांक्षा आणि सुकन्या यांच्या एमपीएससी व यूपीएससीच्या अभ्यासाबाबत कदम सरांनी तासभर मार्गदर्शन केले.
माझं मात्र त्या गप्पांकडे आणि मार्गदर्शनाकडे बिलकुल लक्ष नव्हतं कारण *शब्दांची कहाणी* हे पुस्तक मनात रुंजी घालत होतं. ही उत्सुकता संपली. कदम सरांनी आपल्या टेबलावरील कहाणीच्या तीन प्रती उचलल्या. एक माझ्यासाठी, दुसरी निवृत्त शिक्षण सहाय्यक संचालक गायकवाड साहेब यांच्यासाठी आणि तिसरी प्रकाश पाटील यांच्यासाठी असेल असे वाटत असतानाच सर "गांधी बाबांनी (प्रकाश पाटील) आल्याबरोबरच आपली प्रत हस्तगत केली आहे. ही प्रत तुम्ही बाबांना पोहोचवायची आहे." असे म्हणाले.(कदम सर कोल्हापूरचे इतिहास संशोधक आदरणीय जयसिंगराव पवार यांना बाबा म्हणतात हे माहीत होतं.) आणि मला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या कारण हे पुस्तक देण्याच्या निमित्ताने एका जेष्ठ संशोधकाला-जो वयाच्या शहात्तरीत आजही बारा-बारा तास आपल्या अभ्यासाच्या टेबलवर संशोधनाचं काम करत असतो- भेटायला मिळणार होतं.
इतक्यात वहिनींनी नाश्ता तयार असल्याचा निरोप मुलाकडून पाठवला. (आम्हाला खूप ऐकायचं होतं पण या भेटीत मुलींच्या मार्गदर्शनासाठी वेळ दिल्यामुळे सरांचे आगामी दोन संकल्प याव्यतिरिक्त मुलींना मार्गदर्शन करत असतानाही आम्हाला ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या.)
खाली येऊन नाश्ता-चहा घेतला आणि गाडीत बसल्यानंतर गतवर्षी आपल्या कर्तव्याला उत्तम रीतीने सांभाळत मायबोलीची सेवा म्हणून लिहिलेला, भाषा आणि संस्कृतीच्या अभ्यासातील/इतिहासातील दस्त ऐवज, एक चिरंतन ठेवा न्याहाळत न्याहाळत परतीचा प्रवास सुरू झाला.
No comments:
Post a Comment