होऊ नका इतके नाजूक
की मंद वाऱ्याच्या झुळुकेनेही सुकत जातील पाकळ्या
खरे तर तुम्ही केशरांतून दंश करायला शिकलं पाहिजे
आणि पाकळीच्या कोनाकोनातून विखुरले पाहिजेत अणकुचीदार काटे
झाडांनी आणि फांद्यांनी
कळीच्या अवस्थेतच
त्यांना द्यायला हवे प्रशिक्षण
भिरभिरत येणाऱ्या उनाड
पाखरांचे थवे परतवण्याचे
किंवा
बळ एकवटून
त्यांचेच पंख छाटण्याचे
अथवा श्वास गुदमरतील इतके विषारीे फुत्कार सोडण्याचे
आणि सावध राहायला
पहारेकऱ्यांपासून
हल्ली कुंपनानेच
शेत खाण्याचीही उदाहरणे
वाढत चालली आहेत
कुणी वीट सोडून
अथवा
सुदर्शन घेऊन येईल धावत
हाक देताच
हा भाबडा आशावाद बाळगण्याचे दिवस संपले आहेत
डोळ्यांत अंगार फुलवून
होरपळले पाहिजेत वासनेचे शिकारी
सबल होऊन...
समर्थ होऊन...
विवेकाच्या उंबरठ्यावर
*© रमेश*
No comments:
Post a Comment