*दहावीचा निकाल आणि N शिक्क्याचे पेढे*
आज-काल दहावीच्या निकालाचे गुणपत्रक घ्यायचे एवढे आकर्षण मुलांमध्ये दिसत नाही जितके आम्ही SSC ची परीक्षा झाल्यानंतर गुणपत्रक घ्यायला उतावीळ असायचो. त्याचे कारण गुणपत्रक मिळण्यापूर्वी जाहीर होत असलेला ऑनलाईन निकाल.
आज मला आमच्या शाळेचे दिवस आणि निकालाचा दिवस आठवतो. विद्यामंदिर पोहाळे या शाळेतून सातवी उत्तीर्ण होणारे आम्ही सतरा विद्यार्थी-विद्यार्थिनी होतो. गावात फक्त सातवीपर्यंत शाळा पुढे शिक्षणासाठी निगवे-वडणगे येथील श्री ज्योतिर्लिंग हायस्कूल या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायला लागायचा.
गावापासून पाच किलोमीटर अंतरावर हे हायस्कूल होते. गावापासून तिथंवर जायला रस्ता म्हणजे एक पाणंद होती. दोन ओढे जे नेहमी चिखलाने भरलेले असायचे ते पार करून आणि दोन्ही बाजूने शेतकऱ्यांनी कुंपण दाबल्यामुळे अरुंद झालेल्या वाटेनेच जायला लागायचे. एक दोन मुले सायकलने येत पण त्यांना कुशिरे मार्गे शाळेला यावे लागायचे म्हणजे अंतर वाढल्यामुळे दोन्ही प्रवास जवळजवळ बरोबरच व्हायचे. इतर कोणत्याही वाहनांची सोय नव्हती त्यामुळे सातवीनंतर सर्रास मुलींचं शिक्षण थांबायचं.
आमच्या वर्गातल्या चार भगिनी त्याला अपवाद नव्हत्या. मुलींच्या घरातले लोक टपूनच बसलेले असायचे. कधी एकदा परीक्षा होते आणि डोक्यावरचे ओझे खांद्यावर घेतो; म्हणजे मुलींचे लग्न करून मोकळे होतो याची त्यांना घाई झालेली असायची.
त्यावेळच्या रिवाजानुसार त्यांचीही लग्न झाली. बिचाऱ्या आपापल्या संसारात रमून गेल्या. उरलेल्या १३ पैकी एका वर्ग मित्राने कोल्हापूरला प्रवेश घेतला. बाकी आम्ही बाराजण ज्योतिर्लिंग हायस्कूल येथे जाण्याचे नक्की झाले. प्रवेश घेतला शाळा सुरू झाल्या.आम्हाला आठवी ब च्या तुकडीत एकत्रित प्रवेश मिळाला. नवी शाळा, नवे शिक्षक यामुळे थोडेसे गोंधळून गेलो. त्यात भर म्हणजे इयत्ता आठवीच्या वर्गात आम्हाला ABCD ची ओळख झाली.आठवी ब या तुकडीला इंग्रजी शिकवण्यासाठी तेव्हा श्री आय जी शेख सर होते. तर अ तुकडीला कागलचे श्री गुरव नावाचे सर होते.
पहिल्या सत्रात अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे बहुतेक वेळा आठवीचा जोड वर्ग असायचा. यावेळी इंग्लिश रीडर या पुस्तकाचे अध्यापन केले जायचे पण सगळेच आमच्या डोक्यावरून जात होते. जुलै महिन्यात झालेल्या पहिल्या चाचणीत आम्ही बहुतेक सर्व नव्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात भोपळेच मिळवले. ही आमची अडचण शेख सरांनी ओळखली होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा स्वतंत्र वर्ग भरत असायचा तेव्हा शेख सर इंग्रजीच्या व्याकरण-लेखनाचा धुमडा पाडत असत. इंग्रजी भाषेतील दोन्ही लिप्या, kinds of words, articles, prepositions, change the voice, degree, WH questions, question tag, negative-positive sentences
यांची परिपूर्ण तयारी त्यांनी करून घेतली.
केवळ चार महिन्यांत सरांनी आम्हास वर्गातील इतर मुलांच्या बरोबरीत नेऊन ठेवले. आम्हाला
इंग्रजी भाषेतील वाक्यरचना, काळ, उपपदे, Prepositions, तरतमभाव, WH Question, Question Tag, Change the Voice हे प्रकार अचूक जमू लागले. इतकेच नाही तर सरांनी इंग्रजी नवशिक्या मुलांसाठी लिहिलेल्या *Essential Elements of English Grammar*. या तुफान विद्यार्थीप्रिय पुस्तकाच्या लेखनकार्यात मदत करता आली. जुलैमध्ये झालेल्या पहिल्या चाचणीत नापास झालेले आम्ही विद्यार्थी चाचणी दोनमध्ये उत्तीर्ण तर झालोच; पण त्यानंतरच्या संर्व परीक्षांत व दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत स्थानिक मुलांची बरोबरी केली.
सहामाही परीक्षेच्या वेळेचा आणखी एक किस्सा आठवतो. आठवीसाठी आमच्या वर्गाला एस बी जाधव नावाचे शिक्षक गणित, भूमिती हे दोन्ही विषय शिकवायचे. भूमितीच्या पेपर वेळी अचानक जाधव सर वर्गात आले आणि माझा परीक्षा नंबर पुकारला. त्यांच्या हातात गणिताचे पेपर होते. मी घाबरत घाबरत उभा राहिलो. सरांनी माझ्याकडे बघितले आणि जोरात म्हणाले, "अरे तुझं काय डोकं फिरलय का!" मी पुरताच घाबरलो. पेपर मध्ये भयंकर चुका झाल्या असतील असे वाटू लागले तेवढ्यात सर पुढे म्हणाले, "गणितात ७५ पैकी ७५ गुण !" आणि मग सगळा वर्ग चकित होऊन माझ्याकडे बघू लागला. सरांनी पाठ थोपटली. तेव्हा कुठे मनातली भीती दूर पळाली.
मला तेव्हा लागलेली इंग्रजीची गोडी आजवर कायम आहे. सरांच्या प्रेरणेनेच पुढे बीए व यासाठी आपण इंग्रजी हाच विषय निवडायचा हा मी निश्चय केला होता आणि तो पूर्णही झाला. दहावीच्या परीक्षेत प्रकाश जाधव हा जठारवाडीचा वर्गमित्र ५२९ गुण मिळवून वर्गात पहिला आला. ५२७ गुण मिळवून माझा दुसरा क्रमांक होता.
आमच्या वर्गाचा उत्तम निकाल लागण्यात मुख्याध्यापक मा.ए.बी.शिरगुपेसर(भूगोल) ,जी.आर.नदाफसर(विज्ञान),एस.एस.साळुंखेसर(गणित), एस.एस.चव्हाणसर(हिंदी),सौ.पी.एम.फुले-पैठणकरमॅडम(इतिहास) यांचेही मार्गदर्शन मोलाचे होते.
निकालानंतर पास झालेल्या मुलांनी पेढे वाटले. एकदा पुढील प्रवेशासाठी कोल्हापूरला जात असताना रस्त्यातच सर भेटले. ते म्हणाले,"चंदू, अभिनंदन, पेढे कुठे आहेत. दुसरा नंबर आहे ना तुझा !"
मला खूपच लाज आणि खंतही वाटली. मीही घरी गेल्यानंतर आईला पेढे वाटण्यासारखे बोललो; पण ते शक्य नव्हतेच. तरीही आई म्हणाली,"बघू."
संध्याकाळी आईने घरच्या म्हैशीचे दूध गवळ्याला न चालता त्याचे पेढे करायचे ठरवले. खवा तयार करण्यासाठी दूध आटवायला चुलीवर ठेवलं. दुकानातून थोडी साखरही आणली. तासभर दूध आटवल्यावर त्यात साखर घातली. आठ-दहा पेढे होतील इतका खवा तयार झाला. पेढे आणखी थोडे जास्त व्हावेत म्हणून आईने त्यात थोडे हरभरा डाळीचे पीठ घातले. झाले पेढे तयार. सुकायला ताटात मांडून ठेवले. मी जुन्या छत्रीचा N अक्षराचा आकडा तयार करून प्रत्येक पेढ्यावर उमटवला.
तेव्हा माझा स्वभाव अतिलाजाळू होता. गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला आणल्यानंतर शाळेमध्ये जायची भीड होत नव्हती. पेढे द्यायला जायलाही संकोच वाटत होता. म्हणून दहा-बारा पेढे वर्तमान पत्र्याच्या कागदात बांधून ते शाळेला जाणाऱ्या एका मुलाकडे देऊन सरांकडे पाठविले.
इच्छा, गुणवत्ता, क्षमता आणि संधी असूनही पुढे सायन्स किंवा डिप्लोमाला प्रवेश घेता आला नाही. सहज जमेल म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्याच व आमच्या हायस्कूलजवळ असणाऱ्या प्रताप ज्युनिअर काॅलेजमध्ये प्रवेश घेतला.(हे ज्युनिअर काॅलेज म्हणजे डी.एड.-डिप्लोमा इन इज्युकेशन- अर्थात प्राथमिक शिक्षकांच्या कोर्स आहे हेही चार महिन्यांनंतर समजले.) त्यामुळे हायस्कूलमधील शिक्षकांना टाळूनच काॅलेजला जात होतो. एकदा माझे आवडते शिक्षक व आमचे नववीचे वर्गशिक्षक नदाफसर यांची समोरासमोर भेट झाली. मी खूपच ओशाळलो. सर उपहासाने म्हणाले, "डी.एड.ला जायचं होतं तर इतका अभ्यास कशाला केलास ?"
मी निरूत्तर झालो.(७५% गुण होते. मी सायन्सला अॅडमिशन घ्यावे अशी त्यांची इच्छा होती.)
असेच एकदा शेखसर भेटले. ते म्हणाले,"चंदू, तुझे N शिक्क्याचे पेढे मिळाले." मला हायसे वाटले.
Monday, 8 July 2019
N शिक्क्याचे पेढे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment