Wednesday, 18 March 2020

लेक

दोन्हीकडे मायबाप मध्ये पाट खांबापुढे
अजूनही माहेरात तिजसाठी मांडलेला
गाय हंबरते तेव्हा माय उचकीने दाटे
गळा घाली मिठी भाऊ खेळताना भांडलेला

भावजय देते पाणी लगे लिंबलोण करी
सखी शेजारणी तीही मीठ-मिरची ओवाळी
मनी पायाशी लाडीक करी चाळा घासे अंग
मोत्या दारातून येता-जाता ताईस न्याहाळी 

कान फडकून बैल मारी दाव्याला हिसके
पाहे वळून-वळून म्हैस खाता ओला चारा
वासरांना कोण घाई सोडी पान्हा फिरे मागे
चाफ्यावरून जाताना डोकावून जाई वारा 

लेक घराची लक्षूमी हळदी-कुंकू लेते जेव्हा
आयनाही चूर होई हसे आपल्या गालात
लोणी दाटून एकोटे भांड्यातून फिरे गोळा 
नाही भान गं मायेला रवी घुसले तालात

मळा सळसळे सारा स्वागताला केळी-डोले
ज्वारी, भात, भुईमूग पानापानांत तजेला 
ऊस, मक्याच्या तुऱ्यांना झोंबे वारा अवखळ  साद घाली धावेवर तिला पारंबीचा झुला

आला मुराळी होऊन दीर धाकला दुपारी
त्यांच्या डोळ्यांत वाचून भाव स्वारीचे ती घेई
चार दिसांची पाहुणी लेक निघे सासरला
फुटे उंबऱ्या हुंदका सारे घर मौन लेई
_______*रमेश*

No comments:

Post a Comment