असाच येईल फोटो कधी तर
तुझा नि माझा अन् त्याचाही
एक दिवस ठरलेला आहे
मृत्यूपासून सुटका नाही
फुले उधळुनी अश्रू ढाळतील
सुतक फेडतील गोडे जेवून
लटकत राहतील हार फुलांचे
पुन्हा वर्षभर जळमटं लेवून
क्षणभंगुर जग आपण सारे
कुठले वैभव कुठली नाती
शाश्वत येथे काहीच नाही
दगडांचीही होते माती
उगा कशाला कुरवाळीत मग
बसशी मानवा सुखस्वप्नांना
असता ठाऊक तुलाही सारा
या वस्त्राचा ताणा-बाणा
चुकले नाही सूर्यालाही
मरण रात्रीच्या अंधाराचे
भैरवीतही कोमल मृदुमय
सूर गुंफले गंधाराचे
तरी गायला हवे मित्रहो
गाणे जोवर श्वास निरंतर
जोडून हृदया हृदय कधीतर
मनामनातील मिटवू अंतर
©. रमेश
No comments:
Post a Comment