. *मधमाशांचे पोळे*
छोट्याच्या घराजवळ काटेशेवरीचं एक भलेमोठे झाड होतं. त्याची एक फांदी खिडकीजवळ आली होती. हिवाळ्यात कधीतरी त्या फांदीवर मधमाशांनी भलंमोठं पोळं तयार केलं होतं. त्यावेळी झाडाला भरपूर पानं असल्याने ते दिसत नव्हते, मात्र चैत्र महिन्यात झाडांची सर्व पानं गळून गेल्यामुळे ते घरातून स्पष्ट दिसत होतं.
त्या पोळ्यातील मधमाशा खिडकीतून आत येऊन घरातील कोणाचा तरी चावा घेतील, आपल्याला जखमी करतील अशी भीती वाटल्यामुळे छोट्याच्या काकांनी खिडकीच्या काचा पूर्ण बंद करून घेतल्या होत्या. तरीही छोट्या वरचेवर खिडकीतून बाहेर कुतूहलाने पाहात उभा राहात होता. त्या माशांची संख्या किती असेल ? त्या काय खात असतील ? माशा म्हणजे माद्या, मग नराला काय म्हणत असतील ? हे व असे अनेक प्रश्न त्यांच्या बाल मनात निर्माण होत होते. शेवटी छोट्याने आपला अभ्यास आटोपून दादा खोलीबाहेर आल्याबरोबर त्याला गाठलेच.
"ए! दादा, मधाचं पोळ रानात असतं ना ?"
"हो, रानात असतं."
त्या झाडावरच्या पोळ्याकडे बोट दाखवत छोट्याने विचारले,"मग हे पोळं इथं का आलं असेल आपल्या खिडकीच्या बाहेरील झाडावर ?"
"त्याला आवडलं असेल आपलं झाड म्हणून आलं असेल." एवढं उत्तर देऊन त्यानं छोट्याला टाळलं. "आपण उद्या सकाळी बोलूयात, त्या पोळ्याबद्दल."
दादालाही फारशी माहिती नव्हती. म्हणूनच छोट्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायचे त्याने टाळले.
छोट्याने दुसऱ्या दिवशी सकाळी आपला मोर्चा काकांकडे वळविला. "काका, ते पोळ...
काका,"हो ते जंगली पोळं आहे आणि त्याच्या माशा डंख मारतात. तो डंक विषारी असतो. त्यामुळे माणसाचा मृत्यूदेखील होतो."
छोट्याला पोळ्याबद्दल अधिक माहिती हवी होती. त्यांने अधिक माहिती सांगण्याबद्दल काकांना विनंती केली. तेव्हाच निसर्गमित्र म्हणून परिचित असलेले काकांचे दिनकर दादा नावाचे मित्र आले. ते सांगू लागले," मधमाशांच्या पोळ्याचे अनेक प्रकार आहेत. अगदी छोटं म्हणजे आपल्या हाताच्या मुठीएवढं असतं. त्याला अंडा पोळं म्हणतात. शेतात कधीकधी पावट्याच्या/वरण्याच्या वेलीला खूप फुले असतात तेव्हा त्या वेलीवर असं पोळं मी बघितलं आहे, त्यापेक्षा मोठं पोळं लिंब, करंजी, कारवी अशा झाडावर बघायला मिळतं. सहजासहजी कोणास दिसणार नाही अशा आडोशाच्या फांदीवर मधमाशा पोळं तयार करतात. पोळं म्हणजे मधमाशांचं घरच असतं. मधमाशांची वसाहत असते.
"अगदी फांदीजवळ मधमाशा षटकोनी आकाराचे अनेक कप्पे तयार करतात. या भागाला आम्ही मधाचा कांदा असे म्हणतो. त्याचा आकार लंबगोल असतो. याच कप्प्यामध्ये मधमाशा फुलांमधून जमा केलेला मध साठवून ठेवतात व त्या कप्प्यांचे तोंड बंद करतात."
"पण या मधमाशा कप्पे कशापासून तयार करतात ? आणि हा मध कशासाठी जमा करतात?"
"अरे ! आपल्या शरीरात अन्नाचे पचन झाल्यानंतर काही टाकाऊ पदार्थ असतात तसे मधमाशांच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ म्हणजेच मेण; पण या टाकाऊ पदार्थाचा उपयोग त्या आपलं घरकुल बांधण्यासाठी करतात. मध, पाणी आणि परागकण हेच मधमाशांचं अन्न असतं. राणीमाशी आकाराने मोठी व थोडीशी बोजड असते. तिला पोळ्याबाहेर जाता येत नाही. तिच्यासाठी व आपल्या पिलांसाठी खायला म्हणून हा मध त्यांनी जमा केलेला असतो.
"काहीवेळा अशी अनेक घरं एकत्र बघायला मिळतात. झाडाच्या ढोलीत, दगडांच्या कपारीत एकत्र असणाऱ्या पोळ्यांना सातेरी पोळे म्हणतात. तर या पोळ्यांत मधाचे सात कांदे असतात. आपल्या घराजवळच्या झाडावर आहे ते जंगली पोळं. त्याला आग्या मोहळ असंही म्हणतात."
काका पोळ्यांबद्दल माहिती सांगत होते त्याच वेळी दादा आला त्याने अजून अधिक माहिती सांगायला सुरुवात केली. "मधमाशी हा कीटक आहे त्याच्या जीवनाच्या चार अवस्था असतात अंडी, अळी, कोश व मधमाशी. वाळवंटीकरणामुळे वृक्ष नाहीसे झाले, पोळे बांधण्यासाठी आवश्यक झाडे नाहीशी झाल्याने आता आपल्याला गावातील झाडांवरही मधमाशांनी पोळं तयार केलेलं बघायला मिळतं."
काका मधेच म्हणाले,"मधमाशांचेही राणीमाशी, कामकरी माशी, नरमाशी व सैनिक माशी असे चार प्रकार असतात. एकाच पोळ्यात हे चारही प्रकार बघायला मिळतात. मात्र प्रत्येक पोळ्यात एकच राणीमाशी असते. क्वचितच अधिक राणीमाशा असतात. राणी ही मादी असते. फक्त तीच अंडी देण्याचे काम करते. कांद्याच्या खाली वर्तुळाकार आकारात छोट्या-छोट्या षटकोनी कप्प्यांचा पोळी नावाचा मोठा भाग असतो. या कप्प्यांमध्ये राणीने दिलेली अंडी माशा आणून ठेवतात. ठराविक काळानंतर या अंड्यामधून मधमाशांच्या अळ्या बाहेर पडतात. खरंतर या अळ्यांना खाण्यासाठीच मध जमा करून ठेवलेला असतो."
लगेच दादाने आपल्या मोबाईलमध्ये शोधलेली अधिक माहिती सांगायला सुरुवात केली,"मधमाशी हा मध गोळा करणारा एक कीटक आहे. बी गटामध्ये वीस हजाराहून अधिक कीटक आहेत. यातील काहीं मध साठवतात. ’हनी बी’ (Honey Bee) या नावाने ओळखणाऱ्या गटामध्ये गांधील माशी, आणि कुंभारीण माश्या मोडतात. पण यातील फक्त मधमाशाच बारा महिने, समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात.
"मिक्रॅपिस, मेगापिस, एपिस,
एपिस मॅलिफेरा, आफ्रिकन मधमाशी असे मधमाशांचे प्रकार आहेत.
अपिनी जमातीतील एपिस या प्रजातीमध्ये सात जातीच्या मधमाशा असून एकूण चव्वेचाळीस उपजाती आहेत. पण फक्त एपिस (Apis genus) या प्रजातीमधील माशांना शास्त्रीयदृष्ट्या मधमाशा म्हणून ओळखले जाते. त्या खूप चावतात.
एपिस फ्लोरिया आणि एपिस अँड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाश्यांच्या जाती एपिस प्रजातीच्या मिक्रॅपिस या उपप्रजातीमधील आहेत. या मधमाशा लहान उघडे पोळे झुडुपावर तयार करतात. त्यांची नांगी लहान आकाराची असून माणसाला चावल्यास त्याच्या त्वचेमध्ये फार खोलवर जात नाही. त्यांचे पोळे संरक्षणाची फार काळजी न करता हाताळता येते."
काकानीही माहितीत भर घातली. " या नैसर्गिक माशांनी पोळ्यात जमा केलेला मध आपण काढून घेतो. त्याचबरोबर मानवाने मधमाश्यांच्या पेट्या तयार करून मध जमा करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याला मधुमक्षिका पालन असे म्हणतात.
"मधमाशांच्या एका वसाहतीमध्ये एक राणी माशी, ऋतुमानाप्रमाणे थोडे नर आणि सतत बदलता राहणारा कामकरी माशांचा समूह अशी पोळ्याची रचना असते. जातीप्रमाणे पोळ्यात राणी, नर, सैनिक आणि कामकरी माशांची संख्या बदलते. पण या श्रेणीमध्ये सहसा बदल होत नाही. सामान्यपणे सर्व पोळ्यांमध्ये राणी माशी अंडी देण्याचे काम करते. कामकरी माशा राणीमाशीने घातलेली अंडी येण्यापासून बनवलेल्या कोठड्यामध्ये ठेवतात. कोठड्या बनविण्याचे व मध जमा करण्याचे काम कामकरी माशांचे असते. सैनिक माशांवर पोळ्याच्या संरक्षणाची जबाबदारी असते. एका कप्प्यात एकच अंडे ठेवले जाते. राणी माशी शुक्रगाहिकेमधील शुक्रजंतूपासून अंडे फलित करू शकते. कामकरी माशा आणि राणी माशी फलित अंड्यांपासून तर नर व सैनिक अफलित अंड्यांमधून निपजतात. नर एकगुणित गुणसूत्राचे, तर राणी आणि कामकरी माशा द्विगुणित गुणसूत्रांच्या असतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्यांना कामकरी माशा प्रारंभी रॉयल जेली खायला घालतात. नंतरच्या काळात अळ्यांना फक्त मध आणि परागकण खायला घातले जातात. अनेकवेळा कात टाकल्यानंतर अळी स्वतःभोवती कोश तयार करते. ज्या अळीला फक्त रॉयल जेलीच्या खाद्यावर ठेवलेले असते त्या अळीच्या कोशापासून राणी माशी तयार होते.
कामकरी माशांच्या कार्याच्या विभागणीचा विस्तृत अभ्यास झालेला आहे. नव्या कामकरी माशा पोळे स्वच्छ ठेवण्याचे आणि अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्यांना खायला घालण्याचे काम करतात. नव्या कामकरी माशांच्या शरीरात असलेल्या ग्रंथींनी रॉयल जेली बनविण्याचे काम थांबविल्यानंतर त्या पोळ्यामधील नव्या कोठड्या बांधण्यास मेण तयार करतात. कामकरी माशांचे वय जसे अधिक होईल तसे त्यांचे काम बदलत जाते. मेण बनविण्याचे काम जमेनासे झाल्यावर त्या मध गोळा करणे आणि परागकण आणणे, पोळ्याचे रक्षण करणे अशी कामे करतात. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या मध आणि पराग गोळा करण्याच्या कामाव्यतिरिक्त काही काम करीत नाहीत.
छोट्याने दादाला शंका विचारली, "या मधमाशा एकमेकेशी कशा बोलतात ?"
"ती एक गंमतच आहे. कामकरी माशा अन्न म्हणजे मध, पाणी आणि परागकण गोळा करतात. ठरावीक प्रकारच्या “वॅगल डान्स”च्या सहाय्याने त्या परस्परांना अन्न व पाणी कोठल्या दिशेला आणि किती लांब आहे हे सांगतात. अन्न पोळ्याच्या जवळ असेल तर वर्तुळाकार डान्स आणि लांबवर असेल तर वॅगल डान्स अशी त्यांची संदेशवहनाची पद्धत आहे. मधमाशांच्या “डान्स लॅग्वेज” च्या अभ्यासासाठी कार्ल व्हॉन फ्रिश्च या ऑस्ट्रियामधील संशोधकास १९७३ साली फिजिऑलॉजी आणि मेडिसीनमधील नोबेल पुरस्कार देण्यात आला. एपिस मेलिफेरा या मधमाशीवर त्याने हा अभ्यास केला होता.
"अन्न गोळा करून आणलेल्या माशांकडून ते पोळ्यात नेण्यासाठी नव्याने कामाला लागलेल्या माशांसाठी वेगळ्या पद्धतीचे “थरथराट नृत्य”, ट्रेम्बल डान्स केला जातो.
नवी राणी मधमाशी पोळ्यापासून दूरवर उड्डाण करून अनेक नर माशांशी मैथुन करून आपल्या शुक्रकोशिकेमध्ये शुक्रजंतू साठवून ठेवते. मिथुनानंतर नर माशीचा मृत्यू होतो. साठवलेल्या शुक्रजंतूपासून फलित अंडे घालायचे की अफलित हे राणी माशी कसे ठरविते याचा अभ्यास झालेला नाही. मात्र पोळ्यात आणखी एखादी राणी माशी तयार करण्याचे काम कामकरी माशा ठरवतात."
"ते कसे काय ठरविता येते त्यांना ?"
"जेव्हा भरपूर अन्न उपलब्ध असते तेव्हा आणखी एखादी वसाहत तयार करावी असे त्यांना वाटले की त्या नेहमीपेक्षा मोठ्या आकाराचा षटकोनी कप्पा तयार करतात. त्यात ठेवलेल्या अंड्यातून बाहेर आलेल्या अळीला फक्त राॅयल जेली खायला घालतात. अशा अळीच्या कोश अवस्थेनंतर त्यातून राणी माशीचा जन्म होतो."
"व्वा ! किती गंमत आहे."
"मधमाशा या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माशा आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह म्हणून अस्तित्वात असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माशा आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माश्यांनी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्या आल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माशांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटकसृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही.
"मधमाशांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या कामकरी माशा राणी माशी येण्याआधीच पोळे बांधून तयार ठेवतात."
"काका, तुम्ही छान माहिती दिली. पण तुम्हाला ही माहिती कोणी सांगितली ?"
"थोडी माहिती आपल्या गावातील मध गोळा करणाऱ्या माझ्या ओळखीच्या लोकांकडून समजली. बरीचशी माहिती मी पुस्तकांतून वाचली आहे."
"आणि दादा, तू तर काकांपेक्षा जास्त माहिती सांगितलीस !"
"अरे, तू काल विचारलंस तेव्हा मला काहीच माहिती नव्हती. म्हणून मी तुला माहिती देण्याचं टाळलं होतं. संध्याकाळी अभ्यास झाल्यावर मी माझ्या फोनमध्ये नेटवरून माहिती वाचली आणि आता सांगितली."
"काका, या माशा माणसांवर हल्ला करून डंख का मारतात ?"
"पोळ्यात त्यांनी कष्टाने जमा केलेला मध आणि मेहनतीने तयार केलेले मेण जेव्हा कुणीतरी पळवून नेत आहे हे त्यांना समजते तेव्हा त्यांना आपला शत्रू समजून तो शत्रू डंखाच्या भीतीने पोळ्यापासून दूर जावा व पोळ्याचे संरक्षण व्हावे या हेतूने हल्ला करतात व डंख मारतात. डंख मारल्यानंतर या माशीची नांगी तुटून त्या प्राण्याच्या शरीरातच राहते. त्या नांगीला काटा हे दुसरे नाव आहे. पुन्हा अशी नांगी तयार होईपर्यंत त्या माशीला डंख मारता येत नाही. एका माशीला अशी बारा वेळा नांगी येते. त्यानंतर मात्र सैनिकी कामातून ती निवृत्त होते व कामकरी माशी होते.
"कधीकधी काही प्राणी मध, मेण, पोळ्यातील अंडी, अळ्या व कोश खाण्यासाठी येतात. हे पशू-पक्षी केसाळ असल्याने मधमाशांचा डंख त्यांच्या त्वचेपर्यंत पोहचत नाही. तेव्हा सैनिक माशा अधिक आक्रमक होतात. त्यावेळी जवळपास दिसणाऱ्या प्राण्यांवर हल्ला करतात. माणूस दिसला तर त्यांच्यावरही हल्ला करतात."
"म्हणून तुम्ही खिडकीच्या काचा घट्ट बंद करून घेतल्या आहेत ! काका, मघाशी तुम्ही मधुमक्षिका पालन असे काही म्हणालात ते मला नीटसं कळलं नाही."
"मध व मेण जमा करण्यासाठी जंगलात भटकण्यापेक्षा आपल्या शेतातच त्याचं उत्पादन घ्यावं या हेतूने हा व्यवसाय केला जातो. त्यासाठी पत्रा व लाकडी फळ्यांपासून दोन-दोन कप्पे असलेल्या पेट्या तयार करतात. त्यात इतर पोळ्यातील एखादी राणीमाशी आणून ठेवतात. तिच्या पाठोपाठ इतर माशा पेटीत येतात आणि वसाहतीसाठी सुरक्षित जागा मिळाल्यामुळे पोळे तयार करतात. या पेटीचे वैशिष्ट्य म्हणजे माशांची संख्या पुरेशी झाल्यावर खालच्या कप्प्यात राणी माशीला बंदिस्त केलं जातं. तेव्हा कामकरी माशा वरच्या कप्प्यात असलेल्या स्टीलच्या तारा गुंफलेल्या फ्रेमवर मेणाचे षटकोनी कप्पे तयार करून तेथे मध साठवतात.
"या पेटीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राणीमाशी, अंडी, अळ्या, कोश असणारा खालचा कप्पा सुरक्षित ठेवून वरच्या कप्प्यातील मध असलेल्या फ्रेम वरच्यावर अलगद बाहेर काढता येतात. या फ्रेम हातानेच फिरविण्याची व्यवस्था असलेल्या डब्यात फिरवल्या असता फ्रेमवरील मेणाचे षटकोनी कप्पे न मोडता डब्यात मध जमा होतो. या फ्रेम पुन्हा पेटीत ठेवलेल्या जातात."
"नुकतीच मी नेटवर वाचलेली नवीन माहिती तुला सांगतो." असे म्हणत दादाने सुरुवात केली, "जोपर्यंत निसर्गात मध असणारी फुले भरपूर असतात तोवर जंगलातील, रानातील आणि मधुमक्षिका पालन व्यवसाय केंद्रातील माश्या तो जमा करतात. जेव्हा मधुमक्षिका पालन केंद्रातील माशांना असा मध असणारी फुले आढळत नाहीत तेव्हा ती.यांच्यसाठी पेटीजवळच बशीमध्ये साखरेचा पाक तयार करून ठेवतात. तो पाक खाऊन त्याच्यापासून शरिरात तयार झालेला मध या पेटीतील कप्प्यामध्ये साठवतात. या मधाला आर्टिफिशियल मध म्हणतात."
"होय, आमच्या शाळेच्या वाटेवर अशा पेट्या असलेले मधुमक्षिका पालन केंद्र आम्ही बाहेरून पाहतो. तिथं तर या माशांना पिण्यासाठी पाणी भरलेल्या वाटल्या पेटीच्या चारही पायाखाली ठेवतात."
दिनकर काका लगेच म्हणाले, " नाही बाळा. त्या वाट्या पाणी पिण्यासाठी नसतात."
"मग कशासाठी असतात ?"
"माणूस आणि काही प्राणी मध व मेण मिळवण्यासाठी पोळे काढतात. मधुमक्षिका पालनाच्या ठिकाणी पेटीतील पोळ्यात शिरून मुंग्या मध फस्त करतात. त्यां मुंग्यांना पेटीत जाताना अडथळा म्हणून त्या पाण्याच्या वाट्या ठेवतात."
"काका, या पोळ्यांचा आणखी कुणी शत्रू आहे ?"
"आहेत तर ! लहान पोपटासारखा असणारा वेडा राघू माशांनाच खाऊन टाकतो. म्हणूनच त्याला हनी बी इटर म्हणतात."
दादा, काका आणि दिनकर दादा यांनी मधमाशा व पोळे याबद्दल सांगितलेली माहिती ऐकून थक्क झालेला छोट्या खिडकीजवळ जाऊन काचेतून झाडावरील पोळ्याकडे एकटक पाहात राहिला.
© चंद्रकांत निकाडे
Tuesday, 14 April 2020
मधमाशांचे पोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment