Sunday, 19 April 2020

कलिंगडाचा पेठा

कलिंगडाचा पेठा
         या उकाड्याच्या दिवसांत सर्वांना आवडणारे एक फळ म्हणजे कलिंगड. गडद हिरव्या पाठीची, पोपटी रंगाची,पोपटी हिरव्या पट्ट्याची, पिवळट झाक असलेली अशा विविध रंगात व आकारात बाजारात कलिंगडे मिळतात, पूर्वीसारखी आकाराने मोठी कलिंगड मात्र अभावानेच बघायला मिळतात.
         दुपारच्या वेळी थंडगार गोड कलिंगडाची फोक खाण्यात खूप मजा आहे. हल्ली शहरातील बाजारातही अशा कापलेल्या कलिंगडाच्या बर्फात ठेवलेल्या थंडगार तुकड्यांची प्लेट मिळते. त्यासोबतच अननस पपई मिक्स करून किंवा स्वतंत्र दिले जाते. बारीक मिठाचा शिडकावा केल्यामुळे त्याची चव आणि थंडी अजूनच जाणवते. कोल्हापूर मध्ये पार्वती मल्टीप्लेक्सच्या पूर्वेस बागल चौकाच्या अलीकडे असणाऱ्या तिकटीवर असे अनेक सिझनल स्टॉल उभारलेले असतात.
         सन २००३/०४ मध्ये मुंबईला व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्थेत समुपदेशक पदविका पूर्ण करत होतो. तंत्रशिक्षण विभाग वरळी या संस्थेशी संलग्न असणाऱ्या या संस्थेचे कार्यालय मेट्रो सिनेमासमोर असणाऱ्या एल्फिन्स्टन काॅलेजच्या आवारात होते. कार्पोरेशन बँक, आॅब्लेस कामा हॉस्पिटल, पोलीस मुख्यालय, मुंबई महानगरपालिका अशा ओळीने इमारती होत्या. समोर आझाद मैदानाच्या कोपऱ्यात छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनच्या भुयारी मार्गाच्या पश्चिमेकडील तोंडावर असा एक फ्रुट सॅलड विक्रेता उन्हाळ्यात हमखास असायचा. आम्ही मित्रमंडळी  दररोज दुपारी जेवणानंतर शतपावली करत तिथंपर्यंत येऊन फ्रुट सॅलडची प्लेट खाऊन जात असू. त्यावेळी अवघ्या पाच रुपयांमध्ये ही प्लेट मिळायची. यामध्ये अननस, कलिंगड, पपई, याचबरोबर केळी, द्राक्षे, काकडी, डाळिंब, चिकू, अशी फळेही असायची. सॅलड खाणे किंवा मेट्रो सिनेमासमोर असणाऱ्या गाडीवर आले-लिंबू, बर्फाचे तुकडे घातलेला ताज्या ऊसाचा थंडगार रस पिणे नित्याचेच होते. या ठिकाणी असणाऱ्या केंद्रात झुणका-भाकर खाण्याचा अलभ्य लाभही त्यावेळी घडला होता.
         महत्त्वाचा मुद्दा हा की अशा फ्रूट सॅलड विक्रेत्यांकडे सर्वात अधिक पडणारा निरुपयोगी कचरा म्हणजे कलिंगडाच्या साली. त्यामानाने इतर फळांच्या साली कमी प्रमाणात असतात. शहरातील काही लोक या साली शेळ्या-मेंढ्या किंवा गाई-गुरांना खाऊ म्हणून नेतात असे ऐकले होते. वरवर जरी टाकाऊ दिसत असल्या तरी या सालींच्यापासून काहीतरी उपपदार्थ बनवता येतील असा विषय डोक्यात होताच. त्या नंतरच्या काळात मित्रांच्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी दिल्लीला गेल्यानंतर चार-पाच वेळा आग्रा दर्शन झाले. आग्र्याला गेल्यानंतर तेथे प्रसिद्ध असणारी पेठा ही मिठाई बनवणारे कारखानेही पाहिले होते.
         पेठा कोहळ्याच्या गरापासून बनवला जातो. कोहळा, भोपळा, टरबूज, कलिंगड ही फळे एकाच वर्गातली. त्यामुळे कलिंगडची साल व लाल भोपळा यापासून पेठा बनवता येईल असे वाटत होते.
         सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात शहरातील व्यापारपेठ बंद असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी कलिंगडा सारखा आपला माल गावोगावी फिरून प्रत्यक्ष विकण्यास सुरुवात केली आहे. कालच दुपारी मुलांनी घरात कलिंगड घेतली होती. कलिंगड कापल्यानंतर अर्थातच तीस ते पस्तीस टक्के भाग पांढऱ्या गराच्या सालीचा राहिला होता. लॉक डाऊनच्या काळातील या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करावा असे वाटले.
         मग झाली सुरुवात. हा पेठा बनवायचा कसा ? हा प्रश्न होता यासाठी युट्युब वरील पेठा रेसिपी मदतीला धावून आली. झाले, कलिंगडाचे लहान-लहान तुकडे करून घेतले. रात्रभर चुन्याच्या पाण्यामध्ये भिजत घातले. आज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने दोन-तीनदा धुऊन घेतले. या कलिंगडाच्या फोडी स्टीलच्या चमचाचा भाऊ असणाऱ्या काट्याने टोचून घेतल्या. जेवढ्या फोडी होत्या त्यांच्या समप्रमाणात तेवढीच साखर पातेल्यात घेऊन साखर बुडेल इतके पाणी घातले व पाक तयार करून घेतला. या पाकामध्ये कलिंगडाच्या पांढरा गराचे तुकडे टाकले. आठ-दहा मिनिटांमध्ये त्या पाकामध्ये हे तुकडे मुरायला लागले,अर्धपारदर्शक बनले. यावेळी थोडासा फूड कलर व वेलदोडे त्याच्यामध्ये घातले आणि मिश्रण अर्धा तास थंड करत ठेवले. 
         पुन्हा एकदा हे मिश्रण गॅसवर ठेवून पाकाचा थर फोडींभोवती चिकटून सुकण्याइतका झाल्यावर चाळणीत ओतून अतिरिक्त पाक निथळण्यासाठी ठेवला.
         दुपारी कलिंगडाचा पेठा बघून तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. झाडावर पिकलेला पहिला आंबा खाण्याचा हक्क आणि मान जसा खारुताईला, तसा घरातील गोड पदार्थ खाण्याचा हक्क लहान मुलांचा. "पप्पा चाॅकी... आणि एक... आणि एक." करत तिने चार-पाच तुकडे फस्त केले. मीही एक छोटासा तुकडा चाखला. डायबेटिस नसता तर फोटो काढायला आणि इतरांना चाखायला उरला असता की नाही कुणास ठाऊक.
    ।। इति कलिंगड पेठा पुराण संपूर्णम् ।।

No comments:

Post a Comment