_(मासिक ऋग्वेदचे संपादक सुभाष दादा विभुते यांच्या आग्रहास्तव मी माझं बालपण मांडलं. त्यांनी ते आठ भागांत क्रमश: प्रकाशित केलं. त्यानंतर ते लेखन *प्राजक्ताची फुले* या नावाने हृदय प्रकाशन मार्फत बालकादंबरीच्या रूपात प्रकाशित झालं. आता या लाॅकडाऊनच्या काळात दीपकदादा जगदाळे यांच्या आवाहनानुसार ते आपल्यासाठी देत आहे._)
. *प्राजक्ताची फुले*
*_नाव नोंदणी_*
आमच्या गावात तेव्हा अंगणवाडी नव्हती आणि बालवाडीही नव्हती. सहा-सात वर्षांचे घोडे होईस्तोवर सर्वजण गल्लीबोळातून मनसोक्त उंडारत असत. चावडीजवळच्या पिंपर्णीच्या झाडावर सूरपारंबीचा, झाडाखाली विटीदांडू, लगोरी, जिबलीचा, पारावर काचा-कवड्यांचा खेळ खेळत असत. आमच्या खेळामुळं पिंपर्णीच्या झाडाच्या बुंध्याची पांढरी कात सोलटून निघत असे. त्यामुळं ते खोड हिरवं दिसू लागत असे. कधी कधी घाणेरीच्या पानांचा विडा करून त्यात या सालीचा कात टाकून विडा चघळून तोंड रंगवून घेत असू.
दुपारचं ऊन डोक्यावर येईपर्यंत आणि कधी कधी खरपूस भूक लागेपर्यंत किंवा आईची हाक ऐकू येईपर्यंत आमचा सवंगड्यांचा तळ तिथंच ठोकलेला असायचा.
दुपारी कधी गावविहिरी जवळच्या छोट्याशा डोहामध्ये डुंबणं व्हायचं, तर कधी आई-आजीबरोबर शेतावर जाणं. तिथंही पाटातल्या पाण्यात खेळणं, चिखल मातीपासून चूल, भांडी, बैल, घोडा, हत्ती
असे प्राणी बनवणं; ज्वारीच्या ताटातील भेंडापासून बैलगाडी, भिरभिरे, बंदूक अशा वस्तू तयार करणं चालू असायचं.
पांढरा सदरा, खाकी चड्डी घातलेली मुलं आणि पांढरा पोलका, निळा परकर घातलेल्या मुली शाळेला चालल्या की मी त्यांच्याकडं कुतुहलानं पाहात उभा
राहात असे. दप्तराची पिशवी हातात घेऊन किंवा खांद्याला लावून एकमेकांशी कुजबुजत ती जात असत. तर कधी आजीबरोबर शेताकडे जाताना वाटेत शाळेजवळ मुद्दाम थांबून मी त्यांच्या सुरेल आवाजातील कविता किंवा पाढे ऐकत घुटमळत असे. मला त्यांचं
खूप कौतुक वाटायचं. आपल्याला या मुलांसारखा गणवेश घालायला मिळेल का? त्यांच्यासारखं शाळेत जायला मिळेल का? नवनवीन गाणी, कविता, पाढे म्हणता येतील का ? असे प्रश्न माझ्या मनात वारंवार रुंजी घालत असत. एकदा तर मी घरातल्या आडीतला एक पिकलेला राघू आंबा गुपचूप शेजारच्या मुलाला देऊन त्याची दगडी पाटी बघायला घेतली होती. त्या पाटीचा थंडगार स्पर्श माझ्या मनाला मोहून टाकत होता.
आपण शाळेला जावे ही भावना मनात वरचेवर डोकावत असायची. तसे आईला मी बोलून दाखवले.
आई म्हणाली, "आजीला सांग.''
आजी म्हणाली, "बघू पाडव्याला.'
त्याच वर्षी दिवाळीला आजोळी गेलो होतो. दिवाळी झाल्यानंतर चार-पाच दिवसानंतर आजोबा मामाला म्हणाले, "आक्का गावाला जाईल दोन दिवसांत. बाजारला जाऊन कापडं घेऊन या जावा."
मामांनी आईला साडीचोळीचा रंग विचारला.
आई म्हणाली, "हिरवा सोडून कोणताही आण. तुला आवडंल त्यो."
मला मात्र मामांनी काहीच विचारलं नाही, म्हणून मी थोडासा हिरमुसलो. मामांनी आपली सायकल बाहेर काढली. सायकल पुसली. पिशवी, पैसे घेतले आणि माझ्याकडे बघत ते आईला म्हणाले, "याचं माप माझ्या लक्षात राहायचं नाही आणि दुकानदाराला कळायचं नाही. येऊ दे सोबत.''
मामा आपल्यासोबत बाजारला घेऊन जाणार या आनंदाची उकळी मला फुटली. तक्रार कुणाचीच नव्हती. लगेच मामीने माझे हात पाय धुतले. कपडे बदलले. सायकलच्या नळीवर गुंडाळावा टाॅवेल दिला.
मामांनी सायकलवर मला पुढे बसवले होते. आम्ही दोघे सायकलवरून बाजारला गेलो. दुकानात गेल्यावर मामांनी आईसाठी जांभळ्या रंगाची साडी व चांदसूर्व्याच्या मुखवट्याचा चोळखण पसंत केला. माझ्या मापाचे कपडे दाखवायला सांगितले.
दुकानदाराने माझ्याकडे बघत बघत दोन-तीन बॉक्स बाहेर काढून दाखवायला सुरुवात केली. एका रंगाचे, रेषारेषांचे, चौकड्याचे असे बरेच नमुने दुकानदाराने दाखवले आणि म्हणाला, "करा पसंत, सगळे फिट्ट मापाचे आहेत."
मामा कपड्यांचा रंग, शिलाई, कपड्याचा प्रकार पाहत होते. किंमत विचारत होते. दुकानदार म्हणाला,
"तुम्ही नग पसंत करा. नेहमीची माणसं तुम्ही. बरोबर योग्य दर लावतो. काही काळजी करू नका.'' मी अस्वस्थ झालो. कारण मला रंगीत कपडे नको होते. म्हणून मामांच्या कानात हळूच पुटपुटलो, "मामा,
मला पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी पाहिजे."
दुकानदाराने विचारले, "शाळेला जातोस का बाळ?"
मी म्हणालो, "नाही. जाणार आहे औंदा."
"मग कशाला बाळा पांढरा कपडा. यातलं बघ. एखादं."
मी नापसंती दाखवून पुन्हा मामाकडे पांढरा शर्ट व खाकी चड्डी बद्दल आग्रह धरला. मामांनी न बोलताच एक रंगीत चौकड्याचा ड्रेस पसंत केला आणि दुकानदाराला म्हणाले, "दाखवा पांढरा सदरा
आणि खाकी पँट."
दुकानदार म्हणाला, ''हे सगळे ठेवू ?''
मामा पसंत केलेला ड्रेस दाखवत म्हणाले, "हा एक ड्रेस असू दे. आणखी एक पांढरा शर्ट, खाकी पँट दाखवा."
दुकानदाराने मग दुसरा बॉक्स काढून उघडून कपडे दाखवले. त्यातील एक ड्रेस मामांनी पसंत केला. दुकानदाराने बील केले. मामांनी पैसे दिले.
आम्ही सायकलवरून गावी परतलो. दोन ड्रेस मिळाल्याचा आनंद झाला होताच. मनात वाटत होते, 'सोबत आलो ते बरं झालं. मामा रंगीत कपडे घेऊन आले असते तर माझं शाळेचा ड्रेस घालायचं आणि
शाळेत जायचं स्वप्न पूर्ण नसतं झालं.'
त्यानंतर चार-पाच दिवसांनी मी व आई आमच्या गावी यायला निघालो. आईने नवी साडी नेसली होती. मला नवा रंगीत ड्रेस घातला होता. परत येत असताना आपण आपल्या गावी कधी पोहचतो, कधी तो शाळेचा ड्रेस घालतो आणि शाळेत जातो. असं वाटत होतं. मामांनी फराळाचा डबा,
कपड्यांची पिशवी सायकलला अडकवली. मला पुढं बसवलं. आईनं सर्वांचा निरोप घेतला. आजी, मामी, काकू यांची गळाभेट घेतली. आम्ही घराबाहेर पडलो.
मामांच्या गावीही तेव्हा बस येत नव्हती. गावापासून चार किलोमीटर दूर नदीपलीकडील गावी चालत यावं लागायचं त्यासाठी. पाणवठ्याच्या रस्त्यानं जायला-यायला लागायचं. त्यावेळी नदीवर पाणी आणायला गेलेल्या अनेकजणी रस्त्यात भेटायच्या. प्रत्येकीचा प्रश्न,
'चाललीस आक्का?'
'चाललासा व्हंजी?'
'आता कवा येणार?'
असं म्हणून त्या डोक्यावरची घागर सांभाळत, काखेतल्या घागरीत हात घालून कुडचाभर पाणी भरून घेत अन् आईच्या हातावर देत. आई पाण्याचा घोट घेई आणि म्हणे, 'चाललो. येतो पाडवा झाल्यावर. शेतातली कामं आटोपल्यावर.'
आमच्या गावीही बस नव्हती. शेजारच्या गावापर्यंत बसने आलो. पुढे चालत जात असताना माझ्या मनात पुन्हा शाळेचा नवा ड्रेस घातल्याचं, आपण शाळेत चालल्याचं दिवास्वप्न. कधी गाव येईल,
कधी पाडवा येईल, असं वाटून राहिलेलं.
आणि एकदाचा पाडवा आला. आईने छान आंघोळ घातली. शाळेचा ड्रेस घातला. दुकानातून आणलेल्या नव्या पाटीवर शेजारच्या मुलाकडून नव्या पेन्सिलने सरस्वतीचे चित्र काढून घेतले. आजीने मूठभर आटा, डाळ, गूळ यांच्या पुड्या बांधून घेतल्या. सर्व साहित्य एका कापडी पिशवीत घातलं. आजीचा हात धरून निघाली स्वारी शाळेला. आमच्या सोबत पाचवीत शिकणारा शेजारचा सागर होता.
शाळेत जाणाऱ्या सर्व जुन्या मुलांनी हातातच पाटी घेतली होती. त्या पाटीवरच आटा, डाळ, गूळ ठेवलेला. एका बाजूला सरस्वतीचे चित्र काढून हळदी कुंकवाचे टिळे लावलेले होते.
शाळेत नव्याने दाखल होण्यासाठी बरीच मुले आलेली होती. त्यातील बहुतेक रडवेला चेहरा करून उभी होती. काही चेहरे ओळखीचे होते. सागर आम्हांला सरळ हेडगुरूजींच्या खोलीत सोडून आपल्या वर्गाकडे पळाला. जाड काचांचा चष्मा घातलेले हेड गुरुजी नवीन मुलांची नावे नोंदवून घेत होते. आम्ही ओळीत उभे राहिलो. थोड्या वेळानं आमचा नंबर आला.
आजीने सांगितल्याप्रमाणे मी पिशवीतील साहित्य टेबलवर ठेवले. हेडगुरुजींना नमस्कार केला.
हेड गुरुजींनी माझ्याकडे बघत आजीला माझे नाव विचारले. आजी म्हणाली,
''पाळण्यातलं नाव रमेस हाय. खरं चौथ्या म्हैन्यात लय रडाय लागला. तवा शेजारची रकमाक्का म्हटली, 'हौसाक्का मामाजी पोटाला आल्यात सुनंच्या. तवा तेंचं नाव ठेवा. त्याबिगर शांत व्हायचं नाही प्वार.' म्हणून तवा पस्न त्याच नावानं बलीवतोय आम्ही.'
माझे एक काका मला रमेश म्हणून बोलवायचे. ते का तसे बोलवायचे हे कोडं त्या दिवशी उलगडलं आणि चंद्राप्या या नावाच्या दुसऱ्या बारशाची हकीकत मला कळली.
हेड गुरुजींनी विचारलं, "बरं, काय नाव याच्या आजोबांचं?"
आजी म्हणाली, "चंद्राप्पा."
"आजी हे नाव आता फार जुनं वाटतंय. आता याला चंदर म्हणा. झक्कास आहे नाव." आणि हेड गुरुजींनी तिसरं बारसं घालून चंद्रप्पाचा चंदर केला.
हेड गुरुजींनी पुन्हा विचारलं, ''बरं, वडिलांचं नाव काय याच्या?"
आजीचे डोळे पाणावले. माझ्या जन्माच्या चार महिने अगोदर वार्धक्याने आजोबांचं निधन झालं होतं. आणि जन्मानंतर दीड वर्षाने वडील टीबीच्या आजाराने गेले होते. पदराने डोळे पुसत पुसत आजी म्हणाली,
"कासबा."
हेड गुरुजी म्हणाले, "म्हणजे हा काशिनाथचा मुलगा. फार कलावंत माणूस. काय गोड गळा होता बिचाऱ्याचा. पेटी वाजवायला तर या पंचक्रोशीत त्याचा हात धरणारा कुणी नव्हता. आणि नाटकात स्त्री पार्ट तर काशिनाथनेच करावा. ठीक आहे. याची जन्मतारीख माहीत आहे का?"
आजीने मानेनेच नाही म्हटलं. हेड गुरुजी म्हणाले, ''सहा वर्षे पूर्ण आहेत ना! मग लिहितो एक जून एकोणीशसे चौसष्ट.''
त्यानंतर जन्मगाव विचारलं. ते आजीनं
सांगितलं. जन्मगावचा तालुका गुरुजींना माहीत असावा. तो विचारला नाही. रजिस्टरवर आजीला सही करायला सांगितली. सही येत नाही म्हटल्यावर हेड गुरजींनी शाईच्या पॅडवर आजीच्या डाव्या हाताच्या अंगठा घासून त्याचा ठसा रजिस्टरवर उमटवला आणि म्हणाले,
"आज नाव नोंदणी झाली. नवीन पहिलीचा वर्ग जून महिन्यात सुरू होईल. तोवर इच्छा असेल तर येऊन बसू दे पहिलीच्या वर्गात.''
"दक्षिणा?'' म्हणत आजी चोळीच्या दंडात घडी करून ठेवलेले पैसे काढू लागली. हेड गुरुजी 'नको.. नको..' म्हणत असतानाही तिने सव्वा रुपया माझ्या हातात दिला. मी ती दक्षिणा गुरुजींच्या हातात देऊन पुन्हा नमस्कार केला. पाटी पिशवीत भरून मी आजीबरोबर घरी परतलो.
(_क्रमश:_)
No comments:
Post a Comment