Wednesday, 22 April 2020

प्राजक्ताची फुले : भाग दुसरा

.          

         जून महिना उजाडला. तशी मृगाच्या पावसानं सुरवात केली. मे महिन्यात दोन-तीनदा वळीवानं झोडपलं होतं. त्यामुळं बऱ्यापैकी शेतांची मशागत झाली होती. बांबरातले पवार आमचे पैरेकरी होते. आपल्या शेतांच्या मशागतीबरोबर आमच्या शेताची मशागत पूर्ण करत. कधी सांगावं लागत नव्हतं. आमच्या घरातली तीन माणसं. आई, आजी आणि एक चुलत भाऊ. त्याला मी दादा म्हणायचो. पवारांच्या टोकणीला-पेरणीला, भांगलण-कोळपणीला नेहमी मदत करायचे. दोघांच्याही शेतातील भाताची पेरणी कुरीनं झाली होती. पावसानं
जोर धरला होता. पण आमचं एक रान डोंगराच्या बाजूला होतं. तिथली माती तांबूळ होती. त्यामुळं कितीही पाऊस पडला तरी घटकाभरात घात यायची. त्या रानात ज्वारीची टोकणणी करायची होती. दादा
सकाळपासून माझ्या मागं लागला होता. मीही पेरणीला यावं असं त्याचं मत होतं.
         शाळेचा पहिला दिवस असल्यामुळं मी सकाळी लवकर उठून नटून-थटून शाळेला जायला तयार झालो होतो. शेजारच्या सागरला शाळेला जाताना 'मला बोलव' म्हणून अगोदरच सांगितलं होतं. दादा मात्र सारखा तंबी देत होता. "बाळ्या, आज पेरणीला यायला पाहिजेस. पयला दिवस आहे शाळेचा. कोण येतंय तिथला कचरा काढायला. गप गुमान शेताकडं चल, डागंची पेरणी आज संपतीया. मग जा उद्यापासून शाळेला आम्ही नाही आडवत तुला. ऐकलास का?"
         मी जिन्याच्या पायरीवर बसून मुसमुसत होतो. पहिला दिवस. ज्याची गेले सहा महिने मी आतुरतेनं वाट बघत होतो. शाळा चुकवूच नये असं वाटत होतं. माझ्या डोळ्यांतले अश्रूचे थेंब मांडीवर घेतलेल्या
पाटीवरच्या सरस्वतीवर ओघळत होते. आई स्वयंपाक करत होती. आजी आमटीसाठी भिजवलेल्या वाळल्या वरण्याची बियांची टोपणं सोलत होती.
         दादाची दादागिरी आजीलाही खूपत होती. ती दादाकडे बघत म्हणाली, "का लागलायस पोराच्या मागं, काम काय? त्याचं वय काय? जरा विचार करून बोलत जा. जाऊ दे त्याला शाळला."
         तरीही दादा काही नमतं घेत नव्हता. "निदान 'रेघाटणं' तरी मारायला, नाहीतर फेसाटी फिरवायला तरी मदत होईल. एक दिवस शाळा बुडली तर आभाळ नाही पडायचं खाली. खायाला पाहिजे मग काम
करायला नको का?"
         आतापर्यंत स्वयंपाकाच्या कामात असलेली आईही बाहेर आली. तिनं दादाचं बोलणं ऐकलं होतं. दादाला ती म्हणाली, 
         "ये हे रे वाघा! वाटणी त्या
पोरासंगं कशाला लावतोस कामाची. मी मस्त
बहाद्दरीन हाय, जाऊ दे त्याला शाळला. आज पहिला दिवस हाय, तू का आडवा पडायला लागलायास."
         आईचा रुद्रावतार बघून दादा चूप झाला. कुराड, तिकाटणं, छत्री घेऊन बाहेर पडला गुपचूप. आईनं मला जेवायला दिलं. जेवण आटोपलं, तोवर पावसाची भुरभुर सुरू झाली. उंबऱ्यावर येऊन मी एकदा
पावसाकडं, एकदा आईकडं बघितलं. आई म्हणाली,
         "थांब, पावसात भिजत जाऊ नको." 
         तिनं कपाटातलं एक जुनं प्लास्टिकचं युरियाचं रिकामं पोत काढलं. त्याची खोळ केली. माझ्या डोक्यावर ठेवली. पिशवी
खांद्याला अडकवली आणि म्हणाली, 
         "घराकडं येताना पाऊस नसला तरी आठवणीनं पोतं घेऊन ये." 
         मी 'हं' म्हणून बाहेर पडलो. त्याच वेळी सागर दारातआला होता. त्यानं छोटी काळी छत्री घेतली होती. माझ्याजवळ येत म्हणाला, 
         "चल, ये जरा चिकटून चिकटून चाल. मग तुलाबी पाऊस लागणार नाही."
         शाळेच्या रस्त्यावर बरीच मुलं आपापल्या छत्र्या घेऊन दप्तर सावरीत चालली होती. काही जण मुद्दाम पावसात भिजत होते. शाळेजवळच्या गल्लीत
माझ्याबरोबर नेहमी खेळायला असणारा सरदार आपल्या घरातून शाळेत जाणाऱ्या मुलांना न्याहाळत होता. मी त्याला विचारलं, 
         "सरदार, येत नाहीस
शाळेला? चल की." 
          तो म्हणाला, "न्हाई बा. अजून
मला दप्तर, पाटी, छत्री, ड्रेस आणायचाय. आई म्हंतीया, 'आईतवारी बाजारला गेल्यावर सगळं साहित्य
आणूया. सोमवारपास्नं जा साळंला.' आणि बूट पण आणणार हाय."
         सरदारनं बुटाचं नाव घेतल्यावर मी माझ्या चिखलात माखलेल्या पायांकडे पाहिलं. सागरकडं पाहिलं. त्यानंही सँडल घातलं होतं. बहुतेक सर्व मुलांनी पायात स्लिपर, बूट किंवा सँडल घातली होती.
         शाळेत गेल्याबरोबर सागरने पहिलीचा वर्ग दाखवला. आत चार-पाच मुलं आणि तीन मुली नवीन ड्रेस घालून आल्या होत्या. मी व्हरांड्यातल्या पावळणीच्या पाण्याखाली पाय धरून धुतले. डोक्यावरची पोत्याची खोळ काढली. सागर म्हणाला,
         "या खिडकीच्या गजाला अडकव." 
         सागर आपल्या वर्गाकडे गेला. मी खोळ तशीच अडकवली. वर्गात गेलो. दोन मुले ओळखीची होती. शिवा आणि गणपा
बाकी अनोळखी. आम्ही सगळे एकमेकांकडे बघत होतो. गणपा पुढं आला. माझ्याकडं बघत म्हणाला,
         "चंद्या, आलास होय तू पण. शिवापण आलाय. ह्यो रंगा आणि विलास." मुली जराशा बाजूला उभ्या होत्या. त्यांची ओळख नव्हती. त्यांनाही आमची नावं माहीत नव्हती. इतक्यात पांढरी शुभ्र विजार
आणि तसलाच चकोट सदरा घातलेले गुरुजी वर्गात आले. त्यांच्या हातात खडू, फळा पुसायचे कापड आणि खाकी रंगाचा नवा कोरा पुठ्ठा घातलेली हजेरी होती.
         ते हसतच वर्गात आले. आपलं साहित्य टेबलवर ठेवलं आणि आमच्याकडे बघत म्हणाले, "छोकऱ्यांनो,
समोर बाक आहेत, त्यावर आपापलं दप्तर घेऊन बसा, या डाव्या बाजूला मुलं आणि उजव्या बाजूला मुली. एका बाकावर तिघे-तिघे बसा. म्हणजे सर्वांना
बसायला जागा मिळेल."
         गणपा पुढं झाला. त्यानं आम्हाला तू इथं, तो तिथं, असं म्हणत जागा दाखवून बसायला सांगितलं.
         बाक म्हणजे आम्ही घरात जेवताना बसायला घेतो तसले पाटच होते. थोडे लांब होते आणि उंचीला वीतभर. मी पाटावर बसल्याबरोबर दप्तराची पिशवी सहज बाकाखाली ढकलली. तसा सर्वांनाच नवा
शोध लागला. दप्तर ठेवण्याची जागा सापडल्याचा. सर्वांनी तसेच केले. पलीकडं बसलेल्या मुलीनीही..
         गुरुजी टेबलवर बसले. ती नवी हजेरी घेतली. नावे वाचू लागले आणि म्हणाले, "मी नाव घेतलं की ज्याचं नाव असेल त्याने उभे राहा. पुन्हा आपलं नाव सांगा आणि खाली बसा."
         सर्वांची नावे झाली. वीस-पंचवीस असतील. हजर होत्या त्या मुलांनी आणि मुलींनी गुरूजींनी आपलं नाव पुकारताच उभं राहून पुन्हा आपलं नाव सांगितलं, मी
एकटाच राहिलो. आपलं नाव अजून कसं आलं नाही या भीतीनं, थोडा घाबरलोच होतो. इतक्यात गुरुजी म्हणाले, 
         "आणि हा चंदर, पंचवीस नंबर."
         माझं नाव घेतल्याबरोबर मी उभा राह्यलो. माझं हजेरीतलं नाव ऐकून गणपा आणि शिवाला हसू आलं. ते नेहमी मला 'चंद्या' म्हणूनच बोलवत होते. गुरुजींचे
त्यांच्याकडे लक्ष गेले, 
         "का हसता बाळांनो?" 
         गणपा धीट होता. तो म्हणाला, "अहो गुरुजी, आम्ही याला चंद्याच म्हणतो कायम."
         ''हो.. हो.. तुम्ही आजपर्यंत म्हणत होता. पण आजपासून चंदर म्हणा. तसंच त्याचं नाव आहे हजेरीत बरं का. आणि आपण नेहमी एकमेकाला चांगल्या नावानेच बोलवावं, समजलं." 
         आम्ही माना डोलावल्या. तोवर घंटा घणघणली. गुरुजी म्हणाले, 
         "चला व्हरांड्यात. प्रार्थना आहे आता. नंतर वर्गात येऊ." आम्ही गुरुजींच्या पाठोपाठ बाहेर आलो. आपापल्या वर्गाच्या ओळीत मुलं उभी होती. गुरुजींनी आमचीही एक नवी ओळ तयार केली. मग समोर उभ्या
असलेल्या हेड गुरुजींनी 'सावधान' म्हटले. मी बावचळलो. तशी आमच्या ओळीतली सर्वचजण बावचळली. शेजारच्या ओळीतील मुलांना एका दमात 'एक' म्हणत आपले पाय जुळवले आणि मुठी वळून हात बाजूला घेतले. आमच्याकडे बघत हेड गुरुजी
म्हणाले, 
         "हे पहा मुलांनो. तुम्ही शेजारच्या मुलांकडे बघून ते करतील तसे करा. दोन दिवसांत समजेल तुम्हांलाही. विश्राम." 
         पुन्हा सर्व मुलांनी आपापला डावा पाय बाजूला घेतला. दोन्ही हाताची पाठीमागे
मिठी घातली. आम्हीही तसेच केले.
         'देवा तुझे किती सुंदर आकाश.
         सुंदर प्रकाश सूर्य देतो....."
         सर्वांनी बसून, हात जोडून प्रार्थना, राष्ट्रगीत म्हटले, भारत माझा देश प्रतिज्ञा म्हटली आणि ओळीनं वर्गात गेलो. गुरुजीही पाठोपाठ आले. त्यांनी आपल्याबरोबर आणलेली दोन पुस्तकं दाखवली व म्हणाले, 
         "एकाचे नाव बालभारती पुस्तक पहिले व दुसऱ्याचे गणित. ही दोन पुस्तके आणा प्रत्येकाने. पुढील आठवड्यात सर्व
मुले हजर होतील. आपण अभ्यास सुरू करू."
         शाळेला येताना छत्रीनं आणि बुटानं घर केलं होतं. तोवर गुरुजींनी सांगितलेल्या पुस्तकांविषयी. आईला काय काय सांगायचं? मला कोडंच पडलं होतं.
         सर्वांची ओळख झाली. दुपारपर्यंत गोष्टी-गप्पा चालू होत्या. दुपारनंतर गुरुजींनी खेळ घेतले आणि शेवटी चित्रकला. गुरुजी
म्हणाले, 
         "तुम्हाला आवडेल ते, जे येत असेल ते
चित्र काढा." 
         सर्वांनी आपापल्या पाटीवर चित्रे
काढायला सुरुवात केली. पाच मिनिटांत चित्र तयार. गणपाचा बैल बघून गुरुजी म्हणाले, 'छान!' शिवाचा पोपट सुंदर. रंगाचा कोंबडा सुंदर, विलासचं केळीचं झाड 'छान, सुंदर म्हणत गुरुजी माझ्याजवळ आले. पाटी
हातात घेतली आणि म्हणाले, 
         "अरे व्वा! चंदूचा मोर सर्वांत सुंदर."
          सर्वांना गुरुजींनी पाटी दाखवली. सर्व जण आश्चर्याने बघू लागले. मुली तर उभे राहून मोर बघत होत्या. गुरुजी म्हणाले,     
         "चला, या सुंदर मोरासाठी टाळ्या." 
         क्षणात सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
मला कसंसंच झालं. बक्षीस म्हणून गुरुजींनी मला खडू दिला. तोवर शाळा सुटायची घंटा वाजली. गुरुजी म्हणाले, 
         "सर्व जण उभे राहा. आता वंदे
मातरम् होईल. शाळेतील सर्व मुले एका सुरात म्हणतील तुम्ही ऐका. उद्यापासून
तुम्हालाही म्हणावं लागेल."
         वंदे मातरम् झाल्यानंतर गुरुजी आपलं
टेबलवरचं साहित्य घेऊन वर्गाबाहेर थांबले. मुलींना ओळीनं सोडलं. मुलांनाही सोडलं. सर्व जण आपापलं दप्तर घेऊन, छत्री, बूट घेऊन बाहेर पडले. मी पोत्याची खोळ डोक्यावर घेतली. सागरची वाट बघत दरवाजात थांबलो. कधी घरी जाऊन पाटीवरचा मोर आणि बक्षीस मिळालेला खडू आईस दाखवेन असं झालं होतं. सागर आल्याबरोबर दोघे मिळून जाऊ लागलो. शाळेच्या गेटजवळ आमच्या वर्गातील मुली थांबल्या होत्या. त्यातील एक मुलगी मला म्हणाली, "ए, दाखव बघू तुझी पाटी. मला मोर बघायचायं."
         मी पिशवीतील पाटी काढून तिच्याकडं दिली आणि सागरला बक्षीस मिळालेल्या खडूची हकीकत सांगितली. सर्वच मुली मोर बघण्यात दंगून गेल्या होत्या. 
         "किती छान. बघ. हुबेहूब मोर. पिसारा
फुलवलेला आणि डोक्यावर तुरासुद्धा.'' 
         ती मुलगी पाटी माझ्या हातात परत देत म्हणाली, 
         "ए, चंदू नाव ना तुझं? मला उद्या माझ्या पाटीवर असाच छान मोर काढून देशील?"
         मी मानेनेच हो म्हटलं. तिला खूप आनंद झाला. त्या तिघी घरी जाऊ लागल्या. आम्ही दोघेही. थोडं अंतर चालून गेलेली ती मुलगी परत आली, 
         "माझं नाव माहीत झालं तुला?" 
         मी 'नाही' म्हणताच ती म्हणाली,     
         "लक्षात ठेव प्राजक्ता."
         दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेत असतानाच मी आईला सांगितले, 
         ''आई, गुरुजींनी बालभारती आणि गणित अशी दोन पुस्तकं आणायला सांगितलीत. पायात घालायला बूट आणि छत्री पण पाहिजे.''
         आई नेहमीप्रमाणं म्हणाली, ''बघू, पुस्तकाचं काय तरी. छत्रीचं नाव काढू नगंस आणि बुटाचंबी.''
         मी हिरमुसला होऊन आजीकडं गेलो. आजीलाही तेच सांगितलं. आजी म्हणाली,    
         "काय बसतं पुस्तकाला?"
          मला काही कळलं नाही. म्हणून मी आजीकडं पाहतच राहिलो. आजी पुन्हा म्हणाली, 
         "न्हवं, पुस्तकास्नी किती पैसं लागतील आणि नवीच कशाला पायजेत. कुणाची जुनीफानी हैत का बघ. निम्म्या किमतीला मिळतील. दादा तसंच करायचा. जुनी
पुस्तकं निम्म्या किमतीला विकायचा आणि थोडं पैसं घालून म्होरल्या यत्तेची जुनीच पुस्तकं घ्यायचा. बघ कुणाकडं मिळत्यात का?''
         मी हो म्हटलं पण 'बूट आणि छत्रीचं काय?' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. इतक्यात दादा आला. आजीनं त्याला म्हटलं, 
         "परवा कोळप्याचं दिंड काढायला सागवानाचा व्हंडा आणलातास न्हवं?"
         दादा नुसताच 'हं' म्हटला.
         "दिंड काढून उरला असंल थोडासा."आजी.
दादा पुन्हा ''हं."
         "आरं हंऽ हंऽऽ काय करतोस? मी काय मोट हाकाय सांगतोय का? कुठाय त्यो?" आजीनं फटकारलं.
         "हाय. गोठ्यात ठेवलाय." दादा पुटपुटला.
         "व्हंडा घे. बाळूला ( आजोबांचं नाव चंद्राप्पा होतं ना ! म्हणून आजी मला नेहमी बाळू या नावानेच बोलवायची.) घे आणि सुताराकडं जाऊन दोघांच्या मापाची खडावं कातून घे." 
         आजीनं दादाला सांगितलं तसा चहा पिऊन दादा व मी सुताराकडे गेलो. पायाचं माप दिलं दोघांच्याही. व्हंडा ठेवून घेत सुतारमामांनी दुसऱ्या दिवशी सकाळी यायला सांगितलं. येता येता दादा नि मी धामाजींच्या मामाच्या गिरणीतून जुन्या
तुटलेल्या पट्ट्याचा तुकडा घेऊन आलो. दादाने विळ्याने कापून त्या पट्ट्यापासून चार पट्ट्या व अंगठे बनवले. दुसऱ्या दिवशी सुतारमामाकडून खडावाचे दोन जोड व दुकानातून चुके मोळे घेऊन आला. घरातच त्याने त्या लाकडी खडावांना मोळे ठोकून
अंगठे व पट्ट्या लावल्या. मी खडावा पायात घालून बघितल्या. 'चला नसेना का बूट, खडावा तर मिळाल्या.'
         पावसानं थोडी उसंत दिली होती. मी जेवण करून दप्तर व पोत्याची खोळ घेऊन शाळेकडे गेलो. वर्गात पोहचलो तर प्राजक्ता पाटी हातात घेऊनच समोर आली आणि म्हणाली, "दे बघू माझ्या पाटीवर मोर काढून, मी दप्तर ठेवून जागेवर बसलो आणि तिच्या पाटीवर कालच्यासारखाच मोर काढला. प्राजक्ता माझ्या हाताकडे आणि पाटी-पेनसिलकडेच बघत राहिली. तिचा चेहरा आनंदून गेला होता. पण लगेच ती म्हणाली, 
         "या मोराजवळ एक लांडोरपण
काढ ना."
         मी म्हटलं, "मला लांडोर येत नाही."
         "अरे त्यात काय. बिन पिसाऱ्याचा मोर म्हणजे लांडोर, काढ.. काढ.." 
         प्राजक्तानं आग्रह केला. मी मोराच्या शेजारी दुसरं एक बिन पिसाऱ्याच्या मोराचं
चित्र काढलं. तेही तिला खूपच आवडलं. ती पाटी घेऊन पळाली आपल्या मैत्रिणींना दाखवण्यासाठी.
         प्रार्थना झाली. आम्ही सर्व जण वर्गात आलो. गुरुजीही आले. त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला,
         "बरं मला सांगा. नवीन पुस्तकं आणण्यासाठी कोणी कोणी घरी सांगितलं?"
         सर्वच मुलांनी हात वर केले. मी हात वर करावा, की न करावा. याचा विचार करत होतो इतक्यात गुरुजींनी मलाच विचारलं, 
         "चंदू, तू नाही सांगितलंस?"
         मी म्हणालो, "हो सांगितलं आईला नि आजीला. आजी म्हणाली, "जुनी पुस्तकं कुणाकडं वरच्या वर्गातल्या मुलांकडं मिळतात का बघ. निम्म्या किंमतीत मिळतील. आमचा दादा अशी जुनी पुस्तकं
घ्यायचा. चालतील गुरुजी जुनी पुस्तकं?"
         "हो, चांगली न फाटलेली, कोपरे न मुरगळलेली असतील तर चालतील आणि हो, त्या पुस्तकातल्या चित्रांना मिशाही काढलेल्या नसाव्यात." 
         गुरुजींनी असं म्हणताच सर्व जण हसायला लागले. 'चालतील' म्हटल्यामुळं मला नुसतं बरं वाटलं नाही खूप आनंदही झाला. दुपारच्या सुट्टीत मी दुसरीच्या वर्गात जाऊन मुलांकडे चौकशी केली. आमच्या घराशेजारचा एकनाथ म्हणाला, 
         "हैत माझी पुस्तकं नवी कोरी. पण पाऊण किंमतीला दयायचीअसं बापू म्हणत्यात."
         अर्धा जास्त की पाऊण जास्त. मला काहीच कळलं नाही. संध्याकाळी घरी आल्यावर आजीला एकनाथने सांगितलेली माहिती दिली. आजीनं आईला विचारलं,
         "अगं भुईमूग पेरून झाला न्हवं? दाणं शिल्लक हैत का?"
         "हं. झाला." आईनं उत्तर दिलं. "हैत थोडं शिल्लक."
         "कुठं हैत ते काढून दे. शिंद्यांच्या गिरजाक्काला पाहिजेत शेरभर. तिला देऊन एकनाथाची पुस्तक बघून येतो." आजीनं असं म्हटल्याबरोबर आई हातातलं काम टाकून आली. तिनं शिल्लक शेंगदाण्याची पिशवी आजीकडं दिली. मी आजीला म्हटलं, "मी येऊ संगट." आजी चल म्हटल्याबरोबर
तिच्या हातातली पिशवी मी घेतली. शिंदयांच्या घरात गेलो. आजीनं मापट्यानं मोजून दाणे दिले. गिरजाक्कानं दिलेले पैसे घेऊन मग एकनाथच्या घरी गेलो. एकनाथचे वडील --बापू-- व तो दोघे सोप्यातच
बसले होते. आम्ही गेल्याबरोबर बापू म्हणाले, 
         "या हौसाक्का.या बरी सवड काढली! अगं ए, चहा कर जरा काकूला."
         "आरं आता जेवायचा वकूत झालाय च्या कशाला?"
         "होऊ दे. कवा येतीस सारखी-सारखी. घे थोडा आणि जेवून ही जा." बापू आग्रहाने म्हणाले. आजी म्हणाली, "ते राहू दे. मला आधी सांग एकनाथ दुसरीला गेला न्हवं. मग त्याची पहिलीची पुस्तकं दाखव आमच्या बाळूला."
         एकनाथ लगेच उठला. त्यानं कपाटातून बालभारती व गणित ही पुस्तकं काढून दिली. आजीनं ती पुस्तकं हातात घेऊन खालवर पाहिली नि म्हणाली,
         "बेस हैत. बघ रं बाळा." म्हणून माझ्या हातात दिली. मी ती पुस्तकं हातात घेऊन उघडून बघितली. पुस्तकं छान होती. चित्रांना मिशा काढलेल्या नव्हत्या.
         "किती पैसं हुत्यात रं याचं बापू?'
          बापू दुचमाटला "काकू, कशाचं पैसं नि काय? जा घेऊन तशीच. माझा पोरगा नि तुझा नातू बाळू काय दोन हैत व्हय !"
         "तसं कसं बाबा, येवार हाय त्यो. माणसांनी एका ताटात बसून जेवावं, पर येवार पाळावा. हे घे आत्ताच शिंदयांच्या गिरजाक्काला ब्याला शेंगदाणं घाटल्यावर तिनं दिल्यात." असं म्हणून आजीनं
बळबळंच पैसं बापूच्या हातात दिलं. बापून त्यातली एक नोट आजीला परत दिली. चहा घेऊन आम्ही घरी परतलो. जेवण उरकल्यानंतर बराच वेळ चिमणीच्या (राॅकेलचा दिला) उजेडात मी पुस्तकातली चित्रं बघत होतो, पुन्हा पुन्हा. शेवटी आई म्हणाली, "बाळा झोप आता. बघ सकाळी."
         मी त्या दिवशी पुस्तकं छातीशी कवटाळूनच झोपलो. नंतर कधी तर आईनं पुस्तकं काढून उशाला ठेवली होती. मी माझी पुस्तकं वर्गातल्या मुलांना दाखवतोय. सर्व मुलं उत्सुकतेनं बघत आहेत, अशी स्वप्नं मला रात्रभर पडत होती. .
         जागरणामुळं सकाळी उठायला वेळ झाला. तरी गडबडीनं अंघोळ, पाणी, जेवण आटोपून पुस्तकं पिशवीत भरून लवकरच शाळेकडे गेलो. पायात खडावा घातलेल्या. सुरुवातीला सराव नसल्यामुळं चालताच येत नव्हतं. एका खडावाची पट्टी घट्ट झाल्यामुळं रुतत होती. चालताना पाऊल टाकल्यावर
'टॉक टॉक' असा आवाज येत होता. मोठी गंमत वाटत होती.
         __________ (क्रमश:)

No comments:

Post a Comment