. *पहिलं सत्र*
खडावा घालून मी शाळेत पोहचलो. सर्व मुलं माझ्या अगोदर हजर. नव्या पुस्तकांचा घमघमाट सुटला होता. एकमेकांची पुस्तकं आणि त्यातील चित्रं बघण्यात सगळे रमले होते. माझ्या पायातील खडावाचा आवाज ऐकून सर्व जण दचकले. मी दरवाजाजवळ खडावा ठेवल्या, गुरुजींनी सर्वांना आपापल्या चपला, बूट तिथंच ठेवायला सांगितले होते.
सर्वांनी माझ्याकडं मोर्चा वळवला. 'तुझी पुस्तकं दाखव म्हणून आग्रह धरला.' 'नाही नाही' म्हणत शेवटी मला पुस्तकं दाखवणं भागच पडलं. 'पुस्तकं जुनी आहेत' म्हणून एक दोघांनी 'नापसंती' दाखवली. प्राजक्तानं पुस्तकं पाहिली अन् सर्वांना
उद्देशून म्हणाली, "पुस्तकं जुनी असली तरी छान आहेत. चित्रांना अजिबात मिशा काढलेल्या नाहीत आणि आपली सर्वांची पुस्तकं उद्या परवा जुनीच होणार आहेत."
मला बरं वाटलं. ती माझ्याजवळ येऊन
म्हणाली, "चंदू, तुझ्या पुस्तकांचा कागद नव्या पुस्तकापेक्षा घट्ट आहे. चित्रांचे रंग पण ठळक आहेत. सर्वांची नवी पुस्तकं फिक्कट रंगाची आहेत."
तो दिवस आपलंच पुस्तक किती चांगलं आहे हे पटवून देण्यात सर्वांनी घालवला. गुरुजी रजेवर होते. हेड सरांनी वर्गात येऊन आज सेक्रेटरीची निवड घेणार म्हणून सांगितलं. सेक्रेटरी कोणाला करायचा याची चर्चा सुरू झाली. सर्वांनी एकमतानं
प्राजक्ताचं नाव सुचवलं. हेड गुरुजींनी प्राजक्ताला उभं केलं. मुलांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. हेड गुरुजींसोबत आलेल्या चौथीतल्या दोन मुलांना त्यांनी वर्ग सांभाळायला सांगितला आणि ते ऑफिसकडे गेले. दिवसभर गप्पा, गाणी, गोष्टी.
मी 'कालवाऱ्याची गोष्ट सांगितली. ती आजीनं मला सांगितली होती. ती एका भामट्याची गोष्ट होती.तो वेगवेगळ्या गंमतीदार नावाने लोकांना फसवत
असे. एक प्रसंग असा-तो नदीकाठी फिरत होता. अनेक स्त्रिया पाणी भरण्यासाठी, कपडे धुण्यासाठी घाटावर आल्या होत्या. एका स्त्रीकडे पाण्याची घागर व भलं मोठं कपड्याचं गाठोडं होतं. तो भामटा तिला
म्हणाला,
"वहिनी, किती मोठं ओझं आहे. मी मदत करू का? गावाकडेच चाललोय, घरी देतो."
त्या अनोळखी माणसानं मदतीसाठी विचारताच तिला बरं वाटलं. तिनं विचारलं,
"बाबा, तुझं नाव काय?"
"काल वारा." असे म्हणून त्याने गाठोडं घेतलं व झपझप पावले टाकत पुढे गेला. ती स्त्री घरी आली, चौकशी केली. गाठोडं घरात पोहोचलं नव्हतं. तेव्हा ती रडू लागली. अनेकांनी विचारलं, "का रडतेस बाई?"
ती म्हणाली, "काय सांगू. काल वाऱ्याने कपडे नेले."
लोक म्हणत, ''मग आज का रडतेस?''
पुन्हा ती म्हणे, "न्हवं, काल वाऱ्यानं कपडे नेले."
एक आजी आपल्या नातीला घेऊन भर उन्हात शेताकडून घरी चालली होती. तेव्हा सायकल घेऊन हा बायका आला नि म्हणाला, "मावशी, पोरीचं पाय चटाटा भाजाय लागल्यात. कशाला आलीस उन्हाचीच. मी चाललोय गावाकडं. सायकलवरनं सोडू का घरात ?"
"लई बेस हुईल रं बाबा, पर कोण तू ? नाव काय तुझं ?"
तेव्हा त्यानं आपलं नाव नातजावई सांगितलं होतं. मग म्हातारीचा आक्रोश आणि " नातजावयानं नातीला नेली."
"ज्याची होती त्यानं नेली. तू का उगाच रडतीस ?"
असे अनेक प्रसंग. प्रत्येक वेळी मुलं पोट धरून हसत होती. शेवटी शाळा सुटण्याची घंटा झाली. मी गोष्ट संपवली. दप्तर, पोत्याची खोळ व 'टॉक टॉक खडावा' सोबत घरी यायला निघालो. प्राजक्ता माझ्या
खडावाकडे नवलाईने पाहत होती. ती म्हणालीही,
"चंदू तुझी खडावा खूपच छान हाईत. ही लाकडाची चप्पलच आहे. भिजत नाही. फाटत नाही आणि आमच्या चप्पलाप्रमाणं अंगावर चिखलाचे शिंतोडेही उडवत नाही. मी घालून बघू का?"
मला नाही म्हणता आले नाही. तिने त्या खडावा पायात घातल्या, मी तिच्या चपला घातल्या. तिच्या घरापर्यंत. असे दररोजच प्रत्येक जण खडावा घालण्याचा अनुभव घेऊ लागले. मुले आणि मुलीही.
सर्व जण चालताना पाय आपटून मोठा
आवाज करत. कधी सवय नसल्यानं
एखाद्याचा पाय घसरे. तरीही तो 'छान
आहे खडावा.' असे म्हणत असे. ही आळी पाळी महिनाभर चालली होती. मलाही सँडल, चपला, बूट, स्लीपर असे नवे नवे प्रकार पायात घालून चालायला मिळत होते. हौस भागवता येत होती.
खडावा घातल्यावर सुरुवातीला त्या जड वाटतात. पट्टी रुतते. पाय अडखळतो,
तरी कुणी तक्रार नव्हती केली.
दुसऱ्या आठवड्यात गुरुजींनी
अभ्यासाला सुरुवात केली. 'कमल नमन
कर, आई घर बघ.' आम्ही सर्व जण
अभ्यासात रमून गेलो होतो. पहिल्या सहा महिन्यात सर्वजण बालभारती पुस्तक वाचू लागलो. एक ते शंभर अंक वाचन लेखन करू लागलो. बेरीज-वजाबाकी या क्रियाही हळूहळू सर्वांना जमू लागल्या.
गुरुजी वर्गात नसत तेव्हा म्हणजे,
रजा असल्यावर, प्रशिक्षणासाठी गेल्यावर किंवा इतर शिक्षक रजेवर गेल्यानंतर, त्यांचा वर्ग बघायला गेल्यावर आमचा वर्ग सेक्रेटरींना सांभाळावा लागे. प्राजक्ता खूप छान वाचन, लेखन, पाढे घेई. गाणी म्हणत असे. गोष्टीही सांगत असे. पण काही वात्रट मुले दंगा करत असतं. त्यांना थोपवण्याचे काम मी करावे असे न बोलताच ठरून गेले.
दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाली, पण मला शाळेत जाता येत नव्हतं. कारण सुट्टी संपायला दोन दिवसांचा अवकाश होता, तेव्हा मी शेतावर गेलो होतो. शेताच्या वाटेवर शेताजवळ पाटलांची वस्ती होती. मोठी खोप बांधलेली होती. चार-पाच म्हशी, दोन बैल, दोन गाई, चार शेळ्या असा मोठा पसारा होता. त्यांच्याकडं 'राजा' नाव ठेवलेला एक झिपरा कुत्रा होता. येता जाता पाणी प्यायला आम्ही थांबत असू. त्यामुळं कुत्र्याचीही चांगलीच ओळख झाली होती. त्या दिवशी आई अन् मी पाणी प्यायला म्हणून थांबलो. पाटलाचे गंगाराम आजोबा नेहमी गाणं गुणगुणतं कामात असत. ते अंबाडीच्या वाखापासून दोरी वळत होते.
खोपीच्या एका मेढीला राजाला साखळीनं बांधला होता. त्याला गंगाराम आजोबांनी दूध-भाकरी खायला घातली होती. आई सावलीला विसावली.
खोप माळरानात होती. तिथं एक प्रकारचे किडे मातीत गोलाकार घरे तयार करून मातीत घराच्या तळाशी लपून बसत. त्यांना आम्ही 'चांदोबाचे किडे' असं नाव दिलं होतं. एखादी मुंगी, कीटक त्या गुळगुळीत मातीच्या घराजवळून जाताना हमखास पाय घसरून पडत असे. लपून बसलेले चांदोबा पटकन त्या मुंगीला, कीटकाला पकडून गट्टम करून टाकत. मी मुद्दामच एखादया मुंगीला त्या घराकडे जायला भाग पाडत असे. मग चांदोबाची आणि मुंगीची झटापट बघण्यात मजा वाटत असे. मुंग्या नसतील तर चांदोबाची फजिती करायची म्हणून
घाणेरीच्या छोट्या कांगुण्या किंवा शर्टाच्या बाहीतल्या एखादया धाग्याची लहानशी गोळी करून त्याच्या घरात टाकत असू.
सुरुवातीला तो चांदोबा टाकलेली
वस्तू पटकन पकडत असे. ती वस्तू खायची नाही हे लक्षात आल्यानंतर चटकन घराबाहेर फेकत असे.
असा खेळ खेळत असताना माझा पाय राजाच्या अंगाला लागला. त्याच क्षणी दूध भाकरी खाणाऱ्या राजाने माझ्या उजव्या पायाच्या टाचेचा चावा घेतला. वरून दोन आणि खालून दोन असे चार टोकदार सुळे टाचेत घुसले. मी मोठ्यानं "आईगंऽऽ' म्हणून
विव्हळलो. तशी आईची झोपमोड झाली. गंगाराम आजोबाही हातातलं काम सोडून आले. मी रडत होतो. पायाच्या टाचेतून रक्त वाहत होतं, राजा आपली चूक झाली हे लक्षात आल्यावर शेपूट हलवून 'कुई
कुई' करून क्षमा मागत असावा.
"अरे पोरा. काय केलंस. कुत्रं भाकरी खात असतानं त्याच्याजवळ जायचं नाही." असं म्हणत आजोबा खोपीत गेले. चुन्याचं मडकं घेऊन आले. आईनं खोपीबाहेरच्या बांधावरून दगडी पाला आणला. आजोबांनी चुना व तो पाला एकत्र कुस्करून त्याचा
लेप जखमेवर लावून बांधलं. थोड्याच वेळात रक्त यायचं थांबलं. पण जखम दुखत होती. मला नीट चालता येत नव्हतं. शेतात न जाता आईनं मला कडेवर घेतलं आणि घरी आलो..
हकीकत समजल्यावर आजी म्हणाली, "द्वाडा,कशाला त्या कुत्र्याची कळ काढायला गेलास आणि काय करून घेटलंस."
'कुत्रं चावलंय' म्हटल्यावर शेजापाजारचे लोक बघायला आले. कोणी काय सांगितलं, कोणी आणखी काय सांगितलं. घरातले सगळे जण घाबरले. मी
एकुलता एक असल्यामुळे आई-आजी खूप जपत असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी दादानं सागरच्या वडिलांची सायकल मागून आणली. तिच्या नळीला मोठा टॉवेल गुंडाळला आणि कोल्हापूरला सीपीआर
दवाखान्यात घेऊन चालला. सायकलवर डबलशीट घेऊन.
कोल्हापूरचा रस्ता शेताजवळूनच जात होता. पाटलांच्या खोपीजवळ गेलो. तेव्हा गंगाराम आजोबा खोपीसमोरच्या बांधाला खड्डा खणत होते. दादानं विचारलं, "आज्जा, काय करताय?"
"आरं, कुत्रं मेलं न्हवं सकाळी. पुरतो त्याला खड्डा काढून." आजोबांनी सांगितलं तेवढं ऐकलं आणि आम्ही गेलो पुढे.
दवाखान्यात केस पेपर काढला. कुत्रं चावलेल्या लोकांच्या वार्डात गेलो. तिथं वीस-पंचवीस लोक पाळीत उभे होते. तासाभरानं आमचा नंबर आला. तिथल्या कंपाऊंडरनं टाचेचं कापड सोडलं. औषध
टाकून जखम स्वच्छ केली. मलम लावून ड्रेसिंग केलं. डॉक्टरही शेजारीच खुर्चीत बसले होते. त्यांनी विचारलं,
"कुत्रं साधं होतं की पिसाळलेलं?"
दादा म्हणाला, "काही माहीत नाही."
"मग त्या कुत्र्यावर लक्ष ठेवा. ते पिसाळलेलं असेल तर दोन चार दिवसांत मरून जाईल."
असं डॉक्टरनी सांगताच दादा पटकन म्हणाला,
"ते कुत्रं
मेलं आज सकाळीच. आम्ही येत होतो, तवा त्याला शेताच्या बांधावर खड्डा काढून त्याच्या मालकांनी पुरून टाकलं."
हे ऐकताच डॉक्टर ताडकन् उठले आणि म्हणाले, "म्हणजे नक्कीच पिसाळलेलं. चौदा इंजेक्शनं घ्यावी
लागतील. एक दिवसाआड. आज पहिलं घ्याच."
त्यांनी लगेच औषध इंजेक्शनमध्ये भरलं. मला पुढं बोलावलं. मी अगोदरच इंजेक्शनला घाबरत होतो. शाळेत एकदा लस टोचायला डॉक्टर आले होते. तेव्हा मित्रांबरोबर खिडकीतून दप्तर बाहेर टाकून
लघवीचं निमित्त करून सर्व जण घराकडे धूऽऽम पळालो होतो.
डॉक्टर पुन्हा म्हणाले, "ये बाळा, चौदा इंजेक्शनं घ्यावीच लागणार."
दादाही म्हणाला, "इंजेक्शन नाही घेतली पिसाळलेला कुत्रा चावल्यावर तर, माणसाच्या पोटात कुत्र्याची पिलं होतात. तोही पिसाळतो. कुत्र्यासारखाभुंकतो आणि शेवटी... ... ..."
मी घाबरत घाबरत पुढे जाऊन शर्टाची बाही वर केली. ते बघून डॉक्टर म्हणाले,
"बेटा हे इंजेक्शन दंडात नाही घ्यायचं. बेंबीजवळ घ्यायचं असतं पोटावर. चल या बाकड्यावर झोप. मी मुकाट्यानं बाकड्यावर
झोपलो. दादानं शर्ट वर करून माझे हात धरले. डॉक्टरनी कापसाचा बोळा पोटावरून फिरवला. हळूच सुई टोचली. मी "आई गं' म्हणून किंचाळलो. इंजेक्शनचा दट्ट्या दाबून डॉक्टरनी औषध आत सोडलं. कापसाचा बोळा सुई टोचलेल्या ठिकाणी
ठेवून हळूच इंजेक्शन काढून घेतलं. कळा येत होत्या, पण इलाज नव्हता. दादाला सांगितल्याप्रमाणं त्यानं तो बोळा थोडा वेळ इंजेक्शन केलेल्या ठिकाणी फिरवला. पुन्हा सायकलवरून घराकडे रवाना.
घरी पोहोचायला बारा वाजले. खूप भूक लागली होती.जेवायला बसलो. तेवढ्यात शिंदयांची गिरजाक्का, एकनाथचे वडील बापू मला बघायला आले. गिरजाक्का
म्हणाली, "पोराला भात वाढू नगं, जखम बरी
हुईस्तोर; नाहीतर पू हुतो त्यात. जखम चिघळती. आणि शेंगदाणं खाऊ नको बाबा. आठ-धा दिवस."
बापू आजीला म्हणाला, "काकू साधू पावण्याचा म्हातारा कुत्रं चावल्यावर देशी औषध देतोय. उद्या बुधवार हाय. घेऊन जा याला सकाळी."
दादाला म्हणाला, "आज सांजच्याला साधू पावण्याच्या घरात सांगून ये 'उदया सकाळी कुत्रं चावल्यावरचं औषध
घ्यायला येणार म्हणून. मजी औषध आणून ठेवत्यात पोरं. इथं कुठं घावत नाही औषध. जोतिबाच्या वाटला गायमुख तलावाजवळनं आणावं लागतं. काकू, जाताना नारळ घेऊन जा. दुसरं काय पैस-बियसं घेत नाहीत."
भूक लागलेली. दादा जेवला. मी भाकरी आणि आमटी खाऊन उठलो. भात नसल्यामुळं पोट भरल्यासारखं वाटत नव्हतं. तोवर ताण पडल्यामुळे पोटावर बेंबीजवळ टोचलेलं इंजेक्शन दुखू लागलं. तिथं गाठ आल्यासारखं वाटत होतं. मी पुन्हा रडायला लागलो. लोक बघायला येत होते. कुणीतरी सांगितलं,
"पोराच्या पोटावर बर्फ फिरवा. लगेच कळ मरतीया."
"त्यो आणि कुठनं आणायचा?" आजीला प्रश्न पडला. दादा म्हणाला,
''आणतो मी गवळ्यांच्यातनं. संध्याकाळचं जमा केलेलं दूध नासू
नये म्हणून त्यात घालायला आणत्यात त्यांच्यात रोज कोल्हापुरास्नं."
संध्याकाळी दादा बर्फ आणायला गेला. तिथं कुत्रं चावल्याची बातमी शिवाजीला कळली. शिवा बर्फ घेऊन दादासंगं सरळ घराकडं. पोटावर बर्फ फिरवल्यावर जरा बरं वाटलं. बर्फ वितळून पाणी होईपर्यंत आई तो खडा पोटावर फिरवत राहिली.
शिवानं ड्रेसिंग केलेला पाय बघितला. जवळ येऊन त्यानं विचारलं, "उद्या शाळेला येणार?"
मी काही बोललो नाही. दादा म्हणला, "आता चौदा इंजेक्शन घ्यावी लागत्यात. एक दिवस आडानं कोल्हापूरला जाऊन."
"आजी, मी साधू पावण्याच्या
घरात सांगून येतो गं." म्हणून तो गेला.
मी महिनाभर शाळेत येणार नाही म्हणून शिवा नाराज होऊन परत गेला. रात्री इंजेक्शनची जागा थोडी थोडी दुखत
होती. फार उशिरा झोप लागली.
सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी औषध घ्यायला जायचं होतं. आजीनं उठवलं. झोपायचं मनात असताना उठावं लागलं. हात, पाय, तोंड धुऊन मी व आजी साधुपावण्याच्या घरी गेलो. जाताना दुकानातून नारळ घेतला.
साधुपावण्याचा म्हातारा बाहेरच्या सोप्यातच खलबत्यात कसला तरी हिरवा पाला कुटता बसला होता. पाला कुटता-कुटता म्हणाला,
"ये हौशाक्का." तिथं आणखी एक बाई बसली होती. तिच्या हातालाही कुत्रा चावला असावा. म्हाताऱ्याने कुटलेल्या पाल्यात थोडं पाणी घातलं. वस्त्रगाळ करून दोन कप भरले. मला व त्या बाईला एक-एक कप
दिला. आजीनं व त्या बाईनं दिलेले नारळ, खलबत्ता बाजूला ठेवत म्हणाला, "घ्या घुटका एका दमात."
त्या बाईनं कप तोंडाला लावून तोंड वाकडं करत घुटका घेतला. मी बराच वेळ त्या हिरवट रंगाच्या औषधाकडं बघतच राहिलो. शेवटी आजीनं कप उचलून माझ्या तोंडाला लावला. डोळे झाकून कसातरी
एक घुटका घेतला. उलटी आल्यासारखं वाटत होतं. पण ते औषध संपवणं भाग होतं. उरलेलं औषध एका दमात संपवलं. म्हातारा म्हणाला,
"हौशाक्का, घरात जाऊन चार कांदाभजी तळून दे पोराला. येसाबाई, तू तेल कांदा खाल्लास तरी चालंल. त्याबिगार उतारा पडत नाही आणि एका रविवारी नि बुधवारी असं तीन वेळा येऊन औषध
घेऊन जावा."
घरी आलो. आईनं कांदाभजी तयार केली होती. बशी भरून माझ्यापुढं ठेवली. मी म्हटलं, "आई, तुला कुणी सांगितलं?"
आई म्हणाली, "एकनाथाच्या बापूनच सांगितलं हुतं काल."
मी ती कुरकुरीत भजी खाल्ली आणि दप्तर घेऊन सोप्यात बसलो.
संध्याकाळी प्राजक्ता, तिच्या मैत्रिणी, वर्गातील चार मुलं आणि गुरुजी आले. दादानं पटकन शेजारच्या घरातून खुर्ची आणली, गुरुजींना बसायला. पण ते माझ्याजवळ बसले. कोणाचा कुत्रा चावला? कसा
चावला? पिसाळलेला होता का? सर्व चौकशी केली. आईनं सर्वांना चहा दिला. चहा घेऊन जाता-जाता गुरुजी म्हणाले,
"आता विश्रांती घे महिनाभर.
शाळेच्या अभ्यासाची काही काळजी करू नकोस. तुझी इंजेक्शनं संपली की ये शाळेला. आपण सर्व
अभ्यास भरून काढू राहिलेला."
सर्व जण बाहेर गेले. प्राजक्ता पुन्हा आत आली. तिनं आपल्या दप्तरातून बिस्किटचा एक पुडा काढला माझ्या हातात
देत म्हणाली, "घे, आईनं दिलाय आमच्या, दुपारी. तुला कुत्रा चावलायं हे सकाळीच शाळेत शिवानं सांगितलं सर्वांना. आम्ही संध्याकाळी भेटायला जाणार म्हटल्यावर आई म्हणाली, 'आजारी माणसाला
बघायला जाताना रिकाम्या हातानं जाऊ नये.' घे. आणि दररोज संध्याकाळी मी येत जाईन, आपण मिळून अभ्यास पूर्ण करू."
त्या बिस्किटांच्या पुड्यावर हसऱ्या बाळाचं चित्र छापलेलं होतं. तशीच हसत ती निघून गेली.
गुरुवारी सकाळी दादा सायकल घेऊन आला सायकलच्या नळीला टॉवेल गुंडाळून मला चल म्हणाला. त्याबरोबर मला रडू आलं. इंजेक्शनची भीती होतीच. पण परवा खाचखळग्यांच्या रस्त्यावरून येता-जाता हादरे बसून ढुंगण सालटलं होतं. मला
न सांगता येणारं दुःख. तरी आजीनं विचारल्यावर सांगणं भाग पडलं. आई म्हणाली,
"राहू दे सायकलनं
जायचं. बसस्टॉपपर्यंत कसंतरी चालत जाऊ. तिथून बसनं जाऊ. मी येते तुझ्याबरोबर."
उरलेली तेरा इंजेक्शन चार किलोमीटर चालत जाऊन पुढं बसने जाऊन पूर्ण केली. दोनदा साधू पावण्याच्या घरी जाऊन औषध घेतलं. औषध घेतल्यानंतर कांदा भजी खायला मिळत होती, ही एकच आनंदाची गोष्ट. इंजेक्शनच्या दिवशी थोडासा ताप यायचा. दादानं गवळ्यांच्या घरातून आणलेला बर्फाचा तुकडा आई पोटावर फिरवायची. मी बेंबी भोवती टोचलेल्या सुयांचे व्रण मोजीत असायचो. दोन झाली, बारा राहिली. तीन झाली, अकरा राहिली....
प्राजक्ता दररोज शाळा सुटल्यावर घरी यायची मैत्रिणींसह. अभ्यास पूर्ण झाला की जायची. दिवसभर शाळेत घडलेल्या गमती-जमती सांगायची. मी इंजेक्शनचं दुखणं विसरून किती दिवसांनी शाळेत
जायला मिळेल, याचं गणित मनातल्या मनात
मांडायचो, एक एक दिवस कमी होत जायचा.
चौदाव्या इंजेक्शनच्या दिवशी मी व आई चालत निघालो होतो. पाटलांच्या खोपीजवळ आलो. गंगाराम आजोबा ओढ्यावरून जनावरांना पाणी पाजवून येत
होते. त्यांनी विचारलं,
"येरवाळी काय करायला चाललासा?" आईनं इंजेक्शनबद्दल सांगितलं. आजोबा म्हणाले,
"लेकी, खुळी का शहाणी. कशाला
लाग हुती चौदा इंजेक्शनं घ्यायला. ते काय पिसाळलेलं कुत्रं होतं व्हय! पिसाळलेलं कुत्रं चावलं तर चौदा इंजेक्शनं घ्यावी लागत्यात."
आईनं विचारलं, "मग कुत्रं मेलं कसं? कुत्रं मेलं म्हणून डॉक्टरनी इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करायला सांगितला. आज शेवटचं इंजेक्शन हाय."
आजोबा हसत म्हणाले, "अगं, कुत्रं चावलं त्यावर दोन दिवसानं आमचा कारभारी ऊसाची खेप गुऱ्हाळावर घेऊन चाललाता. कुत्रं सोडलं हुतं ते गाडीखाली गेलं. गड्यानं 'हाड.. हाड..' म्हणून हाकललं. एक-दोनदा ते बाजूला गेलं बी. आणि पुन्हा कवा कसं गाडीखाली गेलं काय कळलंच नाही. गाडी परततानं गाडीचं चाक गेलं त्येच्या पोटावरनं. जाग्यालाच खलास."
आईनं कपाळावर हात मारून घेतला,
"आवं, मामंजी तवाच सांगायचं नाहीसा का? मग कशाला घेटली असती चौदा इंजेक्शनं. आता असू दे शेवटचं
हाय घेऊन येतो."
आजोबा म्हणाले, "मला कवा, कुणी ईचारलंय कुत्रं कशानं मेलं म्हणून! ईचारलं असतं तर सांगिटलं असतं." मी कुत्रं पुरलं होतं तिथं बांधावर पाहिलं. एक छोटंसं रोपटं तिथं डोलत होतं. आंब्याचं किंवा फणसाचं असावं. मला वाटलं ते रोपटं माझ्याकडं
बघत म्हणत असावं, 'दोस्ता माफ कर, माझ्यामुळं तुला एवढा त्रास झाला.'
चौदा इंजेक्शनं झाली. मी पुन्हा शाळेला जाऊ लागलो. आठमाही परीक्षा झाल्या. माझा दुसरा नंबर. प्राजक्ताचा पहिला आला होता.
Thursday, 23 April 2020
प्राजक्ताची फुले : भाग तिसरा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment