Friday, 24 April 2020

प्राजक्ताची फुले : भाग चौथा

.                   *दुसरी*

         मे महिन्याची सुट्टी सुरू झाली होती. शेतात फारसं काम नसायचं. असलं तरी माझ्याच्यानं होणारं नसायचं. सकाळी उठल्यावर चहापान आटोपलं की 'खेळायला म्हणून बाहेर पडायचो, थेट मिसाळांच्या घरात. मिसाळ जमीनदार होते. पेरणीसाठी त्यांना दोन चार पोती शेंगदाणे लागायचे. माझ्यापेक्षा मोठी पाच सहा मुलं शेंगा फोडून शेंगदाणे काढायला तिथं यायची. चार आणे म्हणजे पंचवीस पैसे मिळायचे. एक मापटं शेंगदाणे काढल्यावर. मी मनापासून कंटाळा न करता दोन अडीच तास शेंगा फोडायचं काम करत असे. चार मापटी पूर्ण झाली की रुपाया मिळायचा. बाकीची मुलं गारेगार, बर्फाचा गोळा; लेमनच्या, पेपरमिंटच्या गोळ्या खाण्यात, शेंगदाणे काढून मिळवलेले पैसे उधळत. मी आजीला सांगून पैसे साठवून ठेवू लागलो. महिन्याभरात तीस रुपये साठले; ते आजीकडे दिले, दुसरीची पुस्तकं घेण्यासाठी. मलाही काही पैशांचा थोडा खाऊ घ्यावा असं वाटायचं, पण मन घट्ट करून मी ते टाळत असे. 
         शेंगा फोडत असताना चांगल्या टपोऱ्या शेंगाचेच बी काढून घेण्यावर मिसाळअण्णांचा भर असायचा. उरलेल्या बारीक शेंगा, घाटे ते पोत्यात भरून ठेवत, घाण्यावर तेल काढण्यासाठी. 
         शेंगा फोडत असताना फेरीवाल्याची घंटा व नंतर आरोळी ऐकायला येई. तेव्हा मुलं चुळबूळ करत. तयार झालेलं दोन-तीन मापटी शेंगदाणे मोजून देत व अण्णांकडून पैसे घेऊन खाऊ घ्यायला जात. माझं काम चालूच असायचं. रोज चार मापटी तरी झालीच पाहिजेत असा माझा प्रयत्न असायचा, मग अण्णाच कधीतरी बारीक शेंगा व घाट्यांची ओंजळ माझ्या शर्टाच्या ओच्यात घालून खाऊ घेण्यासाठी पाठवत. तेव्हा फेरीवाले पैशाबरोबर मका, ज्वारी, शेंगा या वस्तू घेऊन त्या बदल्यात खाऊ देत असत.
         सुटी संपत आली तसे शाळेचे वेध लागले. जुना ड्रेस थिटा होत होता. एकच शाळेचा ड्रेस धुवून-धुवून घातल्यामुळं जीर्ण झाला होता. तरी मी जपून-जपून वापरत होतो. शाळेला येताना घातलेला ड्रेस घरी गेल्याबरोबर काढून ठेवत होतो. एरव्ही बनियन व पट्ट्यापट्ट्यांची नाडीची चड्डी हाच पोशाख असायचा.
_____ नवीन ड्रेस, नवीन पुस्तकं, छत्री आणि बुटाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं होतं. पुस्तकांच्या पैशांची सोय झाली होती. आजीकडं ठेवायला दिलेले पैसे रोज संध्याकाळी तिची छोटी कापडी पिशवी घेऊन मोजत होतो. ते काही वाढत नव्हते. एक दिवस आजीकडं विषय काढलाच. तिला ड्रेस, छत्री व बुटाबद्दल सांगितलं. ती म्हणाली,
         "मोठ्या शेळीला दोन करडं झाल्यात. त्यातली पाट असू दे. पालवं मिरूग झाला की बाजार करूया तेचा. लय वांड बी व्हाय लागलंय. मग तुला काय काय पाहिजे ते सांग; आणू या."
         मी एकटा एकनाथच्या घरी गेलो. त्याची जुनी पुस्तकं मागितली. बालभारती, गणित आणि एक पुस्तक वाढलं होतं. गोष्टीरूप इतिहासाचं. तेही घेतलं. पैसे दिले.
         एकनाथनं जुनी अंकलिपी आणि अर्धवट लिहिलेली सुलेखन पुस्तिका तशीच दिली. त्याच्या जुन्या वह्या अर्धवट लिहिलेल्या होत्या. रद्दीतच टाकणार होता. मी त्याही मागून घेतल्या. घरी आल्यावर त्यातली कोरी पानं काढून घेतली. सागरकडे जाऊन त्याच्याही जुन्या वह्या मागून आणल्या. त्यातील कोरी पानं बाजूला काढून घेतली. दादानं त्या पानांच्या तीन वह्या बायडींग करून दिल्या. बायडींग कसलं, पान जुळवून मोळ्यानं भोकं पाडून वाकळंच्या दोऱ्यानं शिवल्या होत्या. जुन्याच वह्यांचे पुठ्ठे भाताच्या शितांनी चिकटवले.
         रविवारी सकाळी लवकर उठून आजी व दादा पालवं घेऊन बाजारला गेले. येताना ड्रेस, रंगीत कापडाची छोटी छत्री व एक काळ्या रंगाचा टणक बुटाचा जोड आणला. मी आनंदून गेलो. तरी आजी म्हणाली, 
         "फकस्त साळला जाताना बूट घालून जात जा. एरव्ही खडावाच घालायच्या." 
         मी "हो" म्हटलं. दुसऱ्या दिवशी सोमवार. शाळा सुरू होणार होती. सकाळी उठून केस कापायला न्हाव्याकडं गेलो. बरीच गर्दी होती. केस कापायचं काम तेव्हा बलुत्यावर चालायचं. गुंडामामा म्हणून आमच्या आजोबांचे मित्र होते. ते बाहेर गावचे भुयेवाडीचे होते, पण सकाळी लवकर येत. आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर काटकर मामांच्या गोठ्याबाहेर एक कट्टा बांधलेला होता. तिथंच त्यांचे हजामतीचं दुकान चालायचं. दहा वाजेपर्यंत केस कापायचे, म्हणजे काय? त्यांची ठरलेली स्टाईल होती. मुलांचं डोकं दोन गुडघ्यात गच्च दाबून धरायचे. डोक्याला पाणी लावून थोडा साबण लावायचे. वस्तरा पाहिल्यांदा निसण्यावर घासायचे. नंतर जुन्या कातडी पालटाणावर चटाक-पटाक दोन चार वेळा उलट-सुलट फिरवायचे. शेवटी आपल्याच पायाच्या उजव्या पिंडरीवर उलट-सुलट फिरवून वस्तऱ्याला चिकटलेले निसण्याचे कण साफ करून धार चांगली आल्याची खात्री करायचे. तोवर आमचं मानगूट त्यांच्या गुडघ्यात तसंच गच्च पकडलेलं असायचं. एका बाजूने वस्तरा लावला की ती संपेपर्यंत सुटका नसायची. मान दुखायची तरी सोडत नसत. मग क्षणभर विश्रांती बाजू फिरवून बसायला सांगायचे. ती ही बाजू सपाचट, डोक्यावर मध्यभागी रुपायाएवढा गोल तसाच राखायचे. त्यावर कात्रीनेच काट-छाट करायचे. मग सुटका. त्या दिवशी मी म्हटलं,   
         "गुंडामामा माझा चमन गोटा करू नका. कट मारा. साळंत पोरं टपल्या मारून चिडवत्यात."
         गुंडामामा म्हणाले, "पोरा मला कट मारायला येत नाही. पुढच्या टायमाला आमचा बाबू येईल, त्याच्याकडून कट मारून घे. आताच्या पूर्ता चमनगोटाच करू या."   
         एवढं बोलून माझ्या उत्तराची वाट न बघताच त्यांनी मानगूट पकडून गुडघ्यात धरलंही.
         त्यांना कट मारता येत नव्हता, असं नाही; पण कट मारताना केसांची लेव्हल करण्यात फार वेळ जाई, म्हणून ते चमनगोटा करणं पसंत करत. दहापर्यंत सात-आठ डोकी, दहा-पंधरा दाढ्या उरकून त्यांना गावी जायचं असायचं. कारण शेजारी असणाऱ्या भुयेवाडी या गावी जाऊन जेवून पुन्हा ते कुळांच्या म्हशी भादरायला दुपारी परत येत असत. म्हशी भादरायचं काम गाव विहिरीजवळच्या ओढ्यावर करंजीच्या सावलीत चालायचं. गाव विहिरीवर पाणी आणायला गेल्यावर अनेक वेळा मी त्यांना तिथं पाहिलं होतं.
         गुळगुळीत चमन गोटा करताना कधी कळ आली, मान हालली; तर वस्तरा कापायचा. गुंडामामा कावायचे. लगेच पिशवीतला बर्फासारखा तुरटीचा खडा वाटीतल्या पाण्यात भिजवून कापल्या जागी घासायचे. खूप चुरचुरून कापलेल्या जागी वेदना व्हायच्या, पण इलाज नव्हता. ते टाळण्यासाठी कळ सोसून गप्प राहणंच अधिक फायद्याचं असायचं, कितीही काळजी घेतली तरी एक वेळ का होईना वस्तरा कापायचाच.
         डोक्यावर हात फिरवत शेंडी चाचपत दारात उभा राहून मी आजीला हाक दिली. आजी पाण्याचा तांब्या घेऊन आली पाण्याचे चार शिंतोडं अंगावर टाकले, मग मला आत घेऊन आंघोळ घातली. आजी तसं का करायची कुणास ठाऊक, पण दादा किंवा मी केस कापून आलो की पाण्याचे शिंतोडे
टाकल्याशिवाय घरात घ्यायची नाही.
         जून महिना असूनही दर वर्षीसारखं पावसाचं वातावरण अजिबात नव्हतं. वळिवाचा पाऊसही पडला नव्हता. त्यामुळं शेतांची मशागत झाली नव्हती. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत होता. जनावरांना पाण्यासाठी शेजारच्या कुशिरे गावात असलेल्या इरिगेशनच्या पाटावर घेऊन जावं लागायचं. शेजारच्या मुलांबरोबर ते काम दररोज सकाळी मलाच करावं लागायचं. जुलै महिन्याच्या शेवटी एक -दोनदा पाऊस आला, पण मशागती आणि पेरण्या होऊ शकल्या नाहीत.
         ज्यांनी घाई केली पेरणीला, त्याचं बी वाया गेलं. उगवलेल्या पिकांचे अंकुर करपून गेले. भुईमूगाचे पेरलेले दाणे मुंग्यांनी खाऊन टाकले. कोरड्या रानातील ज्वारी, भात यांचे बी पाखरांनी खाऊन टाकले. मजुरांना काम मिळत नव्हते. शेतकरीही काळजीत होते. ते वर्ष ७२ च्या दुष्काळाचे. पुढे सरकारने बंधारा (पाझर तलाव) घालण्याचे काम सुरू केले. लोकांना काम मिळाले. दादाही कामावर जायचा तिथं. गव्हाचा कोंडा आणि गुळापासून बनविलेली सुखडी मजुरांना दुपारी वाटली जायची. कधीतर दादा डब्यातून सुखडी घेऊन यायचा. छान लागायची. रेशनवर तांदूळ आणि 'मिलो' नावाची लाल रंगाची ज्वारी मिळायची. लोकांनी कसं तरी वर्ष ढकललं. गत वर्षी आमच्या घरी ज्वारी, भुईमूग, मिरची, तूर, उडीद, अंबाडी, चवळी भरपूर पिकली होती. आजीनं लिंबाचा, करंजीचा, निगडीचा पाला ज्वारीत मिसळून टोपली लिंपून ठेवली हाती. तूर, चवळी, उडीद राख मिसळून कुडिक्यात लिंपून ठेवली होती. भुईमुगाच्या शेंगा विकून तांदळाचे चार गोण आणले होते. तेच पुरवून पुरवून खाणं चालू होतं. 
         शाळेतही मुलांना दुपारी दुधाची पावडर मिळायची. त्यासाठी प्रत्येकजण आपापला पेला घेऊन शाळेत येत असे. पावडरमध्ये पाणी घातलं की दूध तयार व्हायचं. काही मुलं घरून येताना साखर घेऊन येत. साखर घातली की पावडरचं दूध गोड लागायचं.
         मी एक दिवस शाळेला जाताना आजीकडे साखर मागितली; आजी काही बोलली नाही. आम्ही सगळेजण घरी गुळाचा चहा पित असू. दादा निगव्याला फरांड्यांच्या मळ्यात घाण्यावर (गुऱ्हाळघर) फडकरी म्हणू‌न कामाला जायचा. गुऱ्हाळ संपल्यावर मजुरीबरोबर सहा-सात गुळाच्या ढेपा (रवे) मिळायचे. फक्त आजीला साखरेचा चहा असायचा. रेशनवर मिळालेली साखर ती पुरवून-पुरवून घ्यायची. मग आईने गुळाचा खडा दिला. तो पेल्यात ठेवूनच मी शाळेत गेलो. दुपारी दूध पावडर घेतल्यानंतर लक्षात आलं साखर जशी भरभर विरघळते तसा गूळ विरघळत नाही. बराच वेळ चमच्याने हलवावे लागते. तसे आईला मी सांगितल्यानंतर आईने खुरप्याने गुळाची पावडर करून डब्यात ठेवली. मी ती पावडर कागदाची पुडी बांधून नेऊ लागलो. गुळाची पावडर गुळापेक्षा लवकर विरघळायची.
         एक दिवस प्राजक्ताने माझा गूळ-दूध-पावडरचा पेला घेऊन आपला साखर-दूध-पावडरचा पेला मला दिला. दुधाचा एक घोट घेतल्याबरोबर ती मोठ्याने म्हणाली, 
         "किती गोड. ए, चंदू उदया पण मला देशील तुझा दुधाचा पेला?"
         तिने असे म्हटल्याबरोबर वर्गातील सर्वच मुलं माझ्याजवळ आली. प्रत्येक जण 'उदया मला तुझा पेला हवा.' म्हणून गलका करू लागली. इतक्यात गुरुजी वर्गात आले. त्यांनी विचारलं,    
         "बाळांनो! का गलका चाललाय?" असं विचारल्यावर सारे चिडीचूप. सेक्रेटरी म्हणून त्यांनी प्राजक्ताला विचारलं,
         "प्राजक्ता, काय म्हणताहेत मुलं?"
         प्राजक्तानं एकवार सर्व मुलांकडे पाहून सहमती घेतली आणि म्हणाली, "गुरुजी, आज मी चंदूच्या पेल्यातील दूध प्यायले. ते खूपच गोड होतं. तसं मी म्हंटल्याबरोबर सर्व जण दूध हवंय म्हणून..."
         "अस्सं होय. पण एकाच दिवशी सर्वांना पिता येणार नाही. आपण असं करू. उद्या एक तारीख आहे. जी तारीख असेल त्या नंबरच्या मुलाला चंदूचा पेला देऊ."
         "हो तसंच करू या." सर्व जणांनी होकार दिला. 
         "पण एखाद्या तारखेला सुटी आली, रविवार आला तर काय करायचं?" 
         प्राजक्तानं शंका व्यक्त केली.
         "तर मग त्या मुलांना शेवटी संधी देऊ. चालेल ना?" 
         गुरुजींच्या या सूचनेनंतर सर्वांनी 'हो' म्हटलं. प्राजक्ता आपल्या मैत्रिणींना सांगत होती, 
         "मला दोनदा मिळणार गोड दुधाचा पेला."
         "ते कसं काय?" साऊनं शंका व्यक्त केली.
         "अगं आज ती प्यायलीय. पुन्हा तिच्या हजेरी नंबरच्या दिवशी मिळणार ना!" 
         कल्पनाने परस्पर खुलास केला. ठरल्याप्रमाणे तारीख आणि हजेरी नंबरचा मेळ घालून सर्वांनी मला आपला पेला देऊन माझा दुधाचा पेला घेतला. खरंतर साखरेपेक्षा गुळाच्या दुधाची चव अधिक वेळ जिभेवर रेंगाळत राहायची. मला पुन्हा पुन्हा जाणवायचं. पण सर्वांच्या इच्छेखातर मी महिनाभर साखर-दूध पित राहिलो. त्यानंतर एक दिवस मी म्हटलं, 
         "आपण असं करू या का?"
         "काय करू या?" शिवानं उत्सुकतेनं विचारलं.
         "आपल्या वर्गासाठी मिळणारी पावडर पातेल्यात घेऊन आपण सर्वांकडील साखर व गूळ त्यात टाकू. ते विरघळवू, मग सर्वांनाच मिळेल गोड दूध." 
         "हो... हो... आणि तुलाही." प्राजक्ता म्हणाली.
         मला 'पेरूची फोड' हा पाठ आठवला.
         ''पेरू घ्या पेरू. लाल लाल पेरू. गोड गोड पेरू." 
         अशी पेरूवाल्याची आरोळी कानात घुमू लागली. त्या पाठात तीन मुले आणि आई असे चौघे जण होते. आईने पैसे देऊन पेरूवाल्याकडून तीन पेरू घेतले व त्याच्या फोडी करून मुलांना दिल्या. प्रत्येकाजवळ पेरूच्या चार चार फोडी होत्या. पण आईला एकही पेरूची फोड नव्हती, हे लक्षात येताच प्रत्येक मुलाने आपला अर्धा पेरू आईला दिला. तेव्हा आईजवळ बऱ्याच फोडी झाल्या. मग आईने प्रत्येकाला एक-एक फोड परत दिली. प्रत्येकाजवळ तीन तीन फोडी होत्या. आईजवळही.
         पेरू खाताना मुले म्हणत होती. 
         "पेरूची फोड लागते गोड, आईची फोड तर फारच गोड.''
               ______ _क्रमश:_
            © चंद्रकांत निकाडे

No comments:

Post a Comment