. (मासिक ऋग्वेदचे संपादक सुभाषदादा विभुते यांच्या आग्रहास्तव मी माझं बालपण मांडलं. त्यांनी ते आठ भागांत क्रमश: प्रकाशित केलं. त्यानंतर ते लेखन *प्राजक्ताची फुले* या नावाने हृदय प्रकाशन मार्फत बालकादंबरीच्या रूपात प्रकाशित झालं. आता या लाॅकडाऊनच्या काळात दीपकदादा जगदाळे यांच्या आवाहनानुसार ते आपल्यासाठी क्रमश: देत आहे.)
. *भाग नववा : सहावी*
दुपारच्या सुटीत खिडकीबाहेरच्या कुंपणावर जमलेल्या चिमण्यांचा खेळ पाहण्याचा छंद मला लागला होता. त्या सत्तावीस चिमण्यांना मी वेगवेगळं ओळखू शकत होतो. तसा प्रत्येक चिमणीपक्ष्याचा आकार, रंग, रूप दिसायला सारखेच असले तरी त्यांच्या हालचालीतील वेग, आवाज, लकब यावरून मी स्वतःसाठीच त्यांना काही नावेही दिली होती. शांती, लाजाळू, डोकऱ्या, विदूषक, बडबड्या, विमान्या, नटवी अशी काही नावे होती. ती त्यांच्या स्वभावावरून दिलेली होती. नर मादीतला फरक तर गडद रंगाच्या दाट पिसांवरून व गळ्याखालील गडद काळ्या छटेवरून सहज ओळखता येत होता.
कुंपणाच्या फांदीवर एक छोटंसं पिलू नेहमी चोच पसरून बसलेलं असायचं. अधूनमधून चिमणी येऊन आपली चोच त्याच्या चोचीत घालुन काही भरवत असायची. बरेच दिवस असं चाललेलं होतं. म्हणून मी त्याचं 'आळशा' असं नाव ठेवलं होतं.
दररोज दुपारच्या सुटीत माझा हा छंद चाललेला असायचा. एक दिवस मी खूपच रमून गेलो होतो. पाठीमागून येऊन कुणीतरी माझे डोळे हातांनी गच्च धरले. मी दचकलो. कोण असेल याचा अंदाज बांधता येत नव्हता. बराच वेळ असाच गेला. हाताचा गारवा रखरखत्या डोळ्यांना थंडावा देत होता. शेवटी डोळ्यांवरचे पंजे सैल झाले. मी मागे वळून पाहिलं. प्राजक्ता उभी होती.
प्राजक्तानं आपल्या खिशातून पेपरमिंटच्या चार गोळ्या काढून माझ्या हातावर ठेवल्या. मी मूठ झाकली. तिनं तोंड उघडून एक विरघळलेली चकतीसारखी झालेली पांढरी पेपरमिंटची गोळी दाखवली. पुन्हा तोंड मिटून ओठांचा चंबू करून फुंकर दिली. पेपरमिंटचा गार वारा जाणवला.
"जेवून आलास?"
"नाही."
"का नाही गेलास?"
"भूक नाही लागत दुपारी."
ती काहीच बोलली नाही. पण तेव्हापासून दररोज काहीतरी खाऊ घेऊन यायची. कधी लेमनच्या गोळ्या, कधी बत्तासे, कधी खारीक, केळं, कधी लाडू मी नको म्हटलं तरी बळेबळेच माझ्या हातावर ठेवायची.
एक दिवस सोमवारी शाळेत जाताना मी चड्डीच्या खिशातून गाले आणि खरपुड्या घेऊन गेलो. रविवारी म्हैस चारायला डोंगरात गेलो होतो, तेव्हा जमा केल्या होत्या. दुपारी तो भाजलेला रानमेवा प्राजक्ताला दिला. तिनं काहीही न विचारता पटकन खाल्ला. थोडी तुरट कडवट चव जाणवली असेल. पण ती न जाणवू देता विचारू लागली.
"किती छान! नाव रे काय याचं?"
मी म्हणालो,
''गाले आणि खरपुड्या."
"झाड आहे तुमच्या परड्यात याचं?"
"नाही."
"मग कुठून आणलास हे?"
"काल म्हैस घेऊन डोंगरात गेलो होतो तिथून."
"डोंगरात झाडं आहेत याची?"
"नाही वेडाबाई. झाडं नसतात याची काही, वेल असतात छोटे छोटे."
"आणि हे कुठं लागतात वेलीला?"
"या वेली डोंगरकपारीत जाळवंडात असतात. जाळी बाजूला सारून खुरप्यानं वेलीची मुळं उघडी करायची. भुईमुगाच्या वेलीला शेंगा लागतात, तशा खरपुड्या मुळाला लागलेल्या असतात. त्या तोडून घ्यायच्या. गालेही तसेच असतात. ते काढल्यावर धुऊन, भाजून घ्यायचे. सूर्याचे किरण पडू दयायचे नाही त्यावर.
"का?"
"सूर्यकिरण पडले त्यावर तर ते कडू होतात."
"हं. तुझ्या तोंडावर आणि हातावर जाळीचे ओरखडे त्यामुळेच उठलेत?"
मी काही बोललो नाही. तीच म्हणाली,
"छान आहे हं, हा रानमेवा. पण एवढा त्रास होत असेल तर नको काढूस ना?" एवढ्यात मुलं यायला लागली. घंटा वाजली. वर्ग भरला. गुरुजी आले. अभ्यासही सुरू झाला.
ऑगस्ट महिन्यात एक दिवस गुरुजींनी
सांगितल्याप्रमाणं सर्व मुलं दुपारची भाकरी डब्यातून, फडक्यातून घेऊन आली. वन भोजनाला गेल्यावर तिथं भाजी, उसळ व आमटी तयार करण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या, कडधान्ये, चटणी-मीठ घेऊन आली. मीही सकाळी भूक नाही म्हणून भाकरी फडक्यात बांधून घेऊन आलो होतो. भाकरीवर ओल्या मिरचीचा ठेचा घातला होता. त्याला खर्डा म्हणतात.
प्राजक्ता वर्गात आली. सर्वांसमोरच ती मला म्हणाली, "ए पोरा! जरा डोळे उघडून चालत जा की रस्त्यानं. तुझ्या पिशवीतून या कागदाच्या पुड्या पडल्या तरी लक्ष नाही तुझं. हे घे." असं म्हणून दोन कागदाच्या पुड्या माझ्या हातात दिल्या. मी अचंबित झालो. कसल्या पुड्या पडल्या माझ्या पिशवीतून. मी तर ठेवल्याच नव्हत्या. आणि पिशवी फाटलेली नसताना त्या पडल्या कशा? हा प्रश्न मला पडला.
"घे. तुझ्याच आहेत."
ती पुन्हा म्हणाली. मी पुड्या सोडल्या. एका मोठ्या पुडीत दोन बटाटे होते. दुसरी पुडीत चटणी व मीठ बांधलेल्या दोन छोट्या छोट्या पुड्या होत्या. माझे डोळे भरून आले. मदत करायची, पण ती मदत आहे हे कोणालाही कळू द्यायचं नाही अशी माझी बहिणाबाई. तोंडातून आवाज येत नव्हता. मला आदल्या दिवसाची दुपार आठवली.
नेहमीप्रमाणं मी खिडकीजवळ उभा होतो पाखरांचा खेळ बघत. तेव्हा प्राजक्ता वर्गात येऊन म्हणाली,
"बरं का रे! उदया वनभोजनाला जायचं आहे. लेण्याच्या खडीला. आपण सर्वांनी भाकरी घेऊन यायचं आहे सोबत. कच्च्या भाज्या, कडधान्ये, चटणी मीठ आणायचंय. सातवीची मुलं भांडी घेणार आहेत. मी कोशिंबिरीसाठी काकडी आणणार. लहू कांदे आणणार. गवळ्यांचा शिवा दही आणणार. कमल टोमॅटो आणणार, मस्तच मजा येणार वनभोजनाला. तू यायचं हं नक्की."
"मी नाही येणार वनभोजनाला."
"का?"
"माझ्याकडं काहीच नाही तसलं सोबत आणायला."
"मग घरात काय खातोस?"
"खर्डा-भाकरी, तेल-चटणी-भाकरी."
"मग तेच घेऊन ये माझ्यासाठी. बाकीचं काही सांगू नको. पण वनभोजनाला यायचं. माझी शपथ आहे तुला."
मला वनभोजनाला येता यावं, सोबत भाजीसाठी काहीतरी असावं म्हणून तिनंच आपल्या घरातून या बटाटे व चटणी मिठाच्या पुड्या आणल्या होत्या. माझ्या पिशवीतून पडल्या असं खोटंच सांगितलं होतं.
वनभोजनाला अख्खी शाळा चालली. जाताना गुरुजी पक्षी, वनस्पती, वेली यांची माहिती देत होते. वेगवेगळे खडक, माती याची माहिती देत होते. आम्हीही माहिती असलेल्या वनस्पतींच्या माहितीत भर घालत होतो.
दुपारी लेण्यांच्या आसपास भाजी, उसळ, आमटी बनवली. फक्कड बेत झाला. प्राजक्ताने माझ्याकडील खर्डा मागून घेतला. आवडीने खाल्ला भाकरीबरोबर, कोशिंबीर छान झाली होती. हे वनभोजन बरेच दिवस आठवणीत राहिलं....
वार्षिक परीक्षा जवळ आली. तीन रुपये परीक्षा फी घरात कोणाकडे मागावी? याचा विचार करत होतो. आई कपडे धुवायला ओढ्यावर चालली होती. साबण नसतोच कधी. तिनं खुंटीला अडकवलेल्या एका पिशवीतले मूठभर रिठे घेतलेले मी पाहिले होते.
साबणाला पैसे नाहीत हे मला कुणी सांगायची गरज नव्हती. मग परीक्षा फी कशी मागायची? याची काळजी मनात होती. मनात म्हटलं, परीक्षा फीबद्दल गुरुजी आज पुन्हा विचारणार. जवळ जवळ सर्वांची फी जमा होत आली होती. पाच-सहा मुलांचीच द्यायची राहिली होती. गुरुजींनी विचारल्यावर काय सांगायचं? फी नाही दिली तर परीक्षेला बसायला मिळणार का? निकाल म्हणणार का? असे प्रश्न घोळत असतानाच सांगू काहीतरी म्हणून मी पिशवी उचलली आणि शाळेकडे धूम ठोकली.
प्रार्थना झाली. सर्व मुलं वर्गात आली. प्राजक्ता कुठं दिसत नव्हती. मी बेचैन झालो. गुरुजी वर्गात आले. पाठोपाठ प्राजक्ताही आली. हजेरी घेताना परीक्षा फी न दिलेल्या मुलांना गुरुजी उभे करतील. तेव्हा आज विसरले उद्या आणतो असं सांगायचं ठरवलं. आई गावाला गेलीय असंही सांगायचं मनात पक्कं केलं. हजेरी झाली.
"तीन-सतरा-बावीस नंबर उभे राहा."
गुरुजी म्हणाले.
माझा नंबर सत्तावीस गुरुजींनी उच्चारला की नाही कुणास ठाऊक. उच्चारला असेल, पण माझं लक्ष नसेल, मी ऐकला नसेल; म्हणून हळूच उभा राहिलो. गुरूजी माझ्याकडे बघत म्हणाले,
"चंदू, तू का उभा राहतोस. काही शंका आहे का? तुझी परीक्षा फी जमा झालीय बस खाली."
मला काहीच कळेना. कधी जमा केली? कुणी जमा केली? मला न सांगताच! मनात प्रश्नच प्रश्न, मग प्राजक्ताची तिची उशिरा येण्याची आठवण झाली. तिच्याकडं पाहिलं. तिनं आपल्याला काहीच ठावं नाही अशी मुद्रा केली होती. दुपारच्या सुटीत तिला विचारायचं ठरवून खाली बसलो.
दुपारी प्राजक्ता कधी येते याची वाटच पाहत होतो. ती आल्याबरोबर, "तू पैसे दिलेस माझ्या परीक्षा फीचे गुरुजींना असे विचारले. ती नुसतीच हसली. तिच्या गालावरच्या खळीत उत्तर लपलेलं असायचं.
"मला नाही सांगितलंस? आणि फी देताना गुरुजींना काय सांगितलंस? तुझ्याकडे एवढे पैसे कुठले? का दिलेस?"
"काल माझा मामा आला होतो मिलिट्रीतला. त्यानं परत जाताना मला खाऊसाठी दहा रुपये दिले होते. त्यातले तीन रुपये आज सकाळी गुरुजींना दिले. मुद्दामच उशिरा आले होते शाळेला. ऑफिसमध्ये गुरुजींना भेटून सांगितलं, येताना रस्त्यात चंदूची आई भेटली. तिनं ही चंदूची परीक्षा फी दिली म्हणून."
माझ्या गरिबीच्या छिद्रावर आपला हात झाकून ती इतरांना न दिसण्याचा प्रयत्न कित्येकदा करत होती, ती तसं का करीत होती? माझ्या मागे पुढे नंबर असणारी मुलं परीक्षेच्या काळात एखादी अवघड शंका समजवावी म्हणून बळेबळेच काहीतरी हमखास खायला दयायची. नको म्हटलं तरी ऐकायची नाहीत. माझ्या खिशात कोंबायचीच. मग नाईलाज व्हायचा, खाल्ल्या खाऊला जागण्यासाठी मी त्यांच्या शंका समजावयाचो.
पण प्राजक्ता तर मुळातच हुशार मुलगी. वर्गात सर्वांत अगोदर तिचा पेपर सोडवून पूर्ण व्हायचा. मग ती अशी मदत का करत असेल? कितीही विचार केला तरी या प्रश्नाचं उत्तर सापडायचं नाही. मग मीच तो प्रश्न विसरून जायचो; सख्खी बहीण नसली तरी तिच्यापेक्षा अधिक माया करणारी बहीण प्राजक्ताच्या रूपानं मिळाली अशी समजूत घालून.
(क्रमश:)...
_*निवडक-समिक्षणात्मक प्रतिक्रियांना पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत प्रसिद्धी द्यायचा विचार आहे.*_
*चंद्रकांत निकाडे*
No comments:
Post a Comment