Monday, 4 May 2020

प्राजक्ताची फुले : भाग दहावा

  *दहावा*
.         (मासिक ऋग्वेदचे संपादक सुभाषदादा विभुते यांच्या आग्रहास्तव मी माझं बालपण मांडलं. त्यांनी ते आठ भागांत क्रमश: प्रकाशित केलं. त्यानंतर ते लेखन *प्राजक्ताची फुले* या नावाने हृदय प्रकाशन मार्फत बालकादंबरीच्या रूपात प्रकाशित झालं. आता या लाॅकडाऊनच्या काळात दीपकदादा जगदाळे यांच्या आवाहनानुसार ते आपल्यासाठी क्रमश: देत आहे.)
.             *भाग दहावा : सातवी*

          सातवीचं वर्ष भरभर सरत होतं. दादा कामाला जातो. तो मिळवता झाला, हे लक्षात येताच त्याच्या वडिलांनी म्हणजे माझ्या काकांनी त्याला आपल्याकडे नेलं. 'तो मोठा झालाय. वळख-पाळख वाढायला पाहिजे. वर्षा दोन वर्षांत लग्नाचं काही तरी बघायला पाहिजे.' असं सांगितलं.
          दादा गावी गेल्यामुळं आई-आजीची जबाबदारी वाढली, आई घरचं शेतीचे काम आटोपून बाहेर मजुरीला जाऊ लागली. आजी रविवारी कधी भाजीपाला, कधी शेण्या घेऊन बाजारला जाऊ लागली. मला दोघींनी पूर्ण मोकळीक दिली. 'तू भला आणि तुझा अभ्यास भला' असं सांगून टाकलं.
          शिष्यवृत्तीचे पैसे लवकर मिळाले. जेमतेम खर्च भागला, वार्षिक केंद्र परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा झाल्या. निकालाच्या दिवशी सर्व मुलं नटून थटून शाळेकडे चालली होती. मलाही निकालाची उत्सुकता होती. पण निकाल घेऊन करायचं काय ? आठवीचा वर्ग गावात नव्हता. गावापासून चार-पाच किलोमीटर दूर हायस्कूलला जायला हवं होतं. दादा आपल्या वडिलांकडे गेल्यामुळं घराकडंही बघायला हवं होतं.
           हायस्कूलला चालत गेलं पाहिजे. सायकल नव्हती. शिवाय तिथला नवा गणवेश. गावात कसंही चालायचं. हायस्कूलची शिस्त कडक आहे असं ऐकलं होतं. शाळा चालू राहावी म्हणून मी नेहमी आईला पांढरा सदरा व खाकी चड्डी घ्यायला सांगायचो. हायस्कूलमध्ये लाल चौकड्याचा सदरा व तपकिरी रंगाची फूल पँट असा गणवेश होता.
          या हायस्कूलच्या रस्त्यात दोन ओढे होते. पावसाळ्यात त्यांना पूर आला की इकडची मुले माणसे इकडे, तिकडची तिकडे. तास दोन तास वाट पाहावी लागायची पाणी उतरण्यासाठी.. दोघे-तिघे जण सायकलने जाणार असे म्हणत होते. दोघे जण चालत. नववी दहावीचेही काही विदयार्थी होते. मुली मात्र कुणीही जात नव्हत्या.
         माझ्यासमोर अनंत अडचणी. पुस्तके, वह्या, रेनकोट, पाठीवरचं दप्तर, बूट, कमरेचा पट्टा आणि महत्त्वाचं म्हणजे दुपारचा डबा. तिथं फडक्यातून भाकरी बांधून नेता येणार नव्हती. डबाही घेतला असता. पण दररोजची भाजी कुठली आणायची ? म्हणून निकाल घ्यायला जायचं नाही असं की ठरवलं.
         घरात जाऊन विळा, दोरी घेतली आणि शेळीला पाला आणायला म्हणून बाहेर पडलो. दारात येताच लहू धापा टाकतच आला. मला बघितल्याबरोबर म्हणाला,
          "चंदू, मी पास झालो. पाचवा नंबर आलाय माझा. गुरुजींनी तुला बोलवलंय निकाल आणि बक्षीस न्यायला. चल लवकर. समदी वाट बघत बसल्यात."
         मला काही उमजेना.
         "निकालाचं ठीक आहे. पण बक्षीस कसलं?"
         मी लहूला विचारलं. लहू म्हणाला,
         "ते मला पण काय ठावं न्हाई. गुरुजींनी आताच्या आता बोलावलंय."
          तोवर आई आमचा आवाज ऐकून बाहेर आली. लहूने तिला पुन्हा सर्व हकिकत सांगितली.
          आई म्हणाली,
          "एवढ्या मिनत्या करतंय प्वार. गुरुजींनी धाडलंय. धापा टाकत आलंय. तर जाऊन ये जा साळंत. काय म्हंत्यात ते तरी बघ जा. शेरड्यांचा चारा काय रानातनं पळून जातोय व्हय! साळतनं आल्यावर ये घेऊन चारा."
          असं म्हणून आईनं माझ्या हातातली दोरी आणि विळा काढून घेतला.
          "जा बिगी बिगी."
          माझा नाईलाज झाला. मी लहूबरोबर शाळेकडे चाललो. अनेक विचार-अविचार मनात घेऊन, आम्ही दोघे वर्गाच्या दरवाजात गेलो आणि त्याच वेळी गुरुजींचा आवाज कानावर आला.
          "दुसरा नंबर प्राजक्ता."
           आम्ही दारातच उभे होतो. निकालपत्र देताना गुरुजी प्राजक्ताला म्हणाले, "बाळे, या वेळी तुझा अभ्यास कमी पडला. नेहमी पहिला नंबर मिळवणारी तू. असं कसं झालं? तुझे सर्व विषयाचे पेपर आम्ही दोनदा तपासले. पण काहीच फरक पडला नाही."
          "प्रत्येक पेपरमध्ये एक-दोन प्रश्नांची तू उत्तरेच लिहिली नाहीस, अगं वर्गात तोंडी प्रश्नोत्तरे घेताना कुणीही न सांगितलेली उत्तरं तू पटापट सांगायचीस अनेकदा, मग परीक्षेत का लिहिलं नाहीस?"
          काही न बोलता निकाल घेऊन ती पाठमोरी वळली. आम्हांला दारात बघितल्याबरोबर तिला आनंद झाला. ती पहिल्या ओळीतील आपल्या जागेवर जाऊन बसली.
          "आणि पहिला नंबर..."
          असं गुरुजी म्हणताच सर्व मुलांनी जोरात ओरडा केला. 'चंदूऽऽऽ'' पत्र्याच्या घरावर वळिवाच्या पावसात गारांचा सडा पडताना जसा टपटप आवाज घुमायचा तसा टाळ्यांचा आवाज करून मुलांनी माझं स्वागतच केलं. अभिनंदन केलं. सर्वांच्या टाळ्या थांबल्यानंतरही एक-दोन टाळ्या वाजत होत्या त्या प्राजक्ताच्याच.
          "ये चंदू, आत ये. अरे आज निकालाचा दिवस पण विसरलास कसा? हे घे तुझं निकालपत्रक आणि हे बक्षिसाचं पाकीट. सव्वीस जानेवारीला जाहीर केल्याप्रमाणं मेजर मोरे काकांनी कालच आणून दिलं मुख्याध्यापकांच्याकडे. घे."
         मला वार्षिक परीक्षेचे दिवस आठवले. प्राजक्ता मुळातच हुशार मुलगी. तिचं वहीतलं फौटेन पेनचं अक्षर तर दृष्ट लागावं असं होतं. गुरुजींनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी वर्गात सर्व प्रथम तिचा हात वर असायचा. मग असं कसं झालं. प्राजक्ताचा नंबर कसा गेला. गेला की....तिनं मुद्दाम घालवला.
          परीक्षेच्या काळात प्राजक्ता पेपरला येतानाच उशिरा यायची.
         "आज पाहुणे आले होते."
         "घरात थोडं काम होतं."
         "दाढ दुखत होती. पेन सापडत नव्हतं.'
          अशी दररोज काहीतरी कारण सांगायची. परीक्षेच्या काळात पाहुणेच काय प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तरी ती घरात थांबली नसती. काम लागलं म्हणावं तर घरात मोठी दोन भावंडं, आई-वडील, काका-काकी आणि गडी-माणसं असताना तिच्या वाट्याला असं कोणतं काम आलं होतं ? आणि तिच्या पांढऱ्या शुभ्र दातांना बघून दात दुखवणारे जंतू स्वतःला हरवून बसले असते.
         नाही, कुणी पाहुणे आले नव्हते. घरी काम नव्हते, दात दुखत नव्हते किंवा पेनही हरवलं नव्हतं. केवळ माझा पहिला नंबर यावा आणि मेजर मोरे साहेबांनी जाहीर केलेलं बक्षीस मला मिळावं. माझं कौतुक व्हावं. मलाही आनंद वाटावा आणि मुख्य म्हणजे त्या बक्षिसाच्या आधारानं माझं शिक्षण पुढं चालू राहावं म्हणून मुद्दाम उशिरा येऊन, उत्तर पत्रिकेत काही प्रश्नांची उत्तरं येत असूनही लिहायची बाकी ठेवून तिनं आपली बुद्धिमत्ता, आपला आनंद, आपलं कौतुक माझ्या रूपानं बघायचं ठरवलं होतं नक्कीच!
         आणि आठवला प्रजासत्ताक दिन : २६ जानेवारीचा कार्यक्रम
         'मुला-मुलींना शाळेला पाठवा'
         'घरे-दारे स्वच्छ ठेवा.'
         अशा घोषणा देत राष्ट्रीय नेत्यांचा जयजयकार करत आमची प्रभातफेरी शाळेत आली. त्या वर्षी नुकतेच सेवानिवृत्त झालेले मेजर मोरेसाहेब समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. डोक्यावर रंगीत तुऱ्याची टोपी, कडक इस्त्रीचा हिरवा सैनिकी गणवेश, छातीवर रंगीबेरंगी अनेक पदके, आरशासारखा लख्ख चमकणारा पट्टा आणि तसेच पायातले काळे बूट. अशा मन मोहणाऱ्या पोशाखात मोरेसाहेब ऐटीत उभे होते. त्यांच्या उजव्या हाताला शाळेचे मुख्याध्यापक, डाव्या हाताला सरपंच साहेब.
          झेंडावंदनानंतर सर्व मुले आपापल्या वर्गाच्या रांगा करून उभी होती. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांना ध्वजपूजनाची विनंती केली, आमच्या गुरुजींनी पाण्याच्या तांब्यातील पाणी फुलपात्रात भरून दिले. अष्टगंध लावून, फुले वाहून ध्वजपूजन झाले. उदबत्त्या पेटवल्या. निरंजनांनी ओवाळले. गुरुजींनी ध्वजाची एक दोरी त्यांच्या हातात दिली. त्यांनी ती खेचल्याबरोबर तिरंगा डौलाने फडफडू लागला.
          मेजरसाहेबांनी आपला डावा पाय जोरात आपटून सावधानमध्ये ध्वजाला सलामी दिली. आम्ही सर्वांनी त्यांचं अनुकरण केले. माथ्यावर उजव्या हाताची सलामी असतानाच प्राजक्तासह तिच्या मैत्रिणींनी 'झंडा उंचा रहे हमारा हे ध्वजगीत व जण-गण मन' हे राष्ट्रगीत गायले.
          मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मुली ओळीत परतल्या. सुरेल आवाजातील गीते ऐकून मेजर साहेब भारावून गेले. त्यानंतर ते सर्व जण मान्यवर व्हरांड्यात मांडलेल्या खुर्चीमध्ये बसले.
          आम्हा सर्व विदयार्थ्यांना सावधान-विश्रामच्या ऑर्डर देऊन 'बैठ जाव' म्हटल्यावर आम्ही आपापल्या जागेवर बसलो. मांडी घालून मान ताठ करून हाताच्या मुठी गुडघ्यावर ठेवून पुढील कार्यक्रमाच्या उत्सुकतेने शांत बसलो.
          पाचवीच्या मुलांनी सुंदर मनोरे केले. सहावीच्या मुलांनी लाठी कवायत सादर केली. आम्ही कडे कवायत सादर केली. तो सुंदर सोहळा बघून जमलेले पालक व ग्रामस्थ टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होते. मुलांचे कौतुक करत होते.
          त्यानंतर भाषणासाठी सरपंचसाहेब पुढे आले. त्यांनी आपल्या भाषणात मुलांच्या कार्यक्रमाची उत्तम तयारी केल्याबद्दल गुरुजींचे अभिनंदन केले. आणखी दोन प्रतिष्ठितांनी भाषणे केली. मुलांची भाषणे सुरू झाली. राष्ट्रीय नेते, क्रांतिकारक, समाजसेवक यांच्याबद्दल जमा केलेली, गुरुजींनी, पालकांनी लिहून दिलेली एकापेक्षा एक सरस भाषणे झाली.
         माझं नाव पुकारताच मी घाबरत घाबरत पुढे गेलो. माझ्या भाषणाचा विषय होता, 'मूर्ती लहान, कीर्ती महान' लालबहादूर शास्त्री यांची जीवन कहाणी.
          मी सुरुवात केली, 'अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजी, प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि माझ्या बालमित्रांनो... गंगेच्या काठी मोगलसराय नावाचे गाव होते. तेथे शारदाप्रसाद आणि रामदुलारी देवी यांचे पोटी एका नररत्नाने जन्म घेतला. त्याचे नाव लाल बहादूर, नदीतून पोहत जाऊन पैल तीरावर असणाऱ्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. अत्यंत गरीब परिस्थिती...

          ... दुपारी मुले लाल बहादूरला खाऊ देत. तो मुलांना सांगत असे. मला खाऊ नको, मी घरातून भरपूर जेवून आला आहे.'
          हा प्रसंग सांगताना माझे डोळे भरून आले. कंठ दाटला. पुढं बरंच काही सांगायचं विसरून गेलो. तोंडातून शब्द उमटत नव्हते. मी पुरता घाबरलो, गोंधळलो. शेवटी हुंदके देत कसेबसे 'जयहिंद!' म्हणून भाषण संपवले. डोळे पुसत पुसत जागेवर जाऊ लागलो. मुलींची ओळ ओलांडताना माझं लक्ष प्राजक्ताकडे गेले. तिचेही गोरे गाल लाल झाले होते. डोळे डबडबले होते. जागेवर बसलो तेव्हा समोर कुजबुज चालली होती. आमचे गुरुजी मोरे साहेबांच्या कानात काहीतरी सांगत होते. शेवटी कार्यक्रमाचे पाहुणे मेजर साहेबांचे भाषण झाले. त्यांनी बाल क्रांतिकारकांच्या कथा सांगितल्या. आम्हीही कथा ऐकून भारावून गेलो.
          शेवटी मेजर साहेब म्हणाले, 'या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या गावातून असे समाजसेवक देशभक्त तयार व्हावे, चांगले हुशार अधिकारी तयार व्हावे अशी आशा करतो. आणि या शाळेतून सातवीच्या वर्गात ज्याचा पहिला नंबर येईल त्याच्यासाठी एकशे एक्कावन्न रुपयांचे बक्षीस जाहीर करतो.
         मुख्याध्यापकांनी आभार मानले. खाऊचे वाटप झाले. मुले आपापल्या घरी गेली. त्या रात्री मला अनेकदा स्वप्न पडले. निकालाचा दिवस आहे. मोरेसाहेब आले आहेत. पहिला नंबर आलेल्या प्राजक्ताचा सत्कार चालला आहे. प्रत्यक्षात वेगळंच घडलं.
          मी सातवीचा निकाल व बक्षीस घेतले आणि...
                                      (समाप्त)***
         इथे प्राजक्ताची फुले नावाने प्रकाशित झालेले प्राथमिक शाळेतील शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे.
       
         _*निवडक-समिक्षणात्मक प्रतिक्रियांना पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत प्रसिद्धी द्यायचा विचार आहे.*_
                          *चंद्रकांत निकाडे*
         (मागील सर्व भाग व इतर साहित्य आणि बरेच काही पाहण्यासाठी/वाचनासाठी
http://shikshanyatra.blogspot.com/?m=1
हा ब्लाॅग सर्च करावा.)


पुढे आई-आजीच्या मदतीने, नातेवाईकांच्या सहकार्याने दहावीपर्यंत, त्यानंतर शिक्षकांच्या आशीर्वादाने डी.एड्.पर्यंत शिक्षण पूर्ण झाले.
           एके दिवशी प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक झाल्याची ऑर्डर हातात घेऊन मी बसमधून गावातील स्टँडवर उतरलो. संध्याकाळची वेळ होती. माझे प्राथमिक शाळेतील काही मित्र भेटले. बहुतेक जणांनी शिक्षण अर्धवट सोडलं होतं. सर्वच वर्ग मैत्रिणींची लग्नं होऊन त्या सासरी गेल्याचंही कळलं. मुलांनी शाळा व शिक्षण अर्धवट सोडण्याची कारणं अनेक होती. महत्त्वाचं कारण होतं आर्थिक परिस्थिती.
         मला वाटलं माझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून धडपडणारी, वेळोवेळी मदत करणारी प्राजक्तासारखी एक एक बहिणाई त्यांच्या जीवनात आली असती तर सर्वच वर्ग मित्रांचं शिक्षण पूर्ण झालं असतं.
         प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध त्यांच्याही जीवनात दरवळला असता. आज तेही माझ्यासारखाच बिगर इस्त्रीचा का असेना पोशाख घालून हातात कोणत्या ना कोणत्या पदावरील नेमणुकीची पत्रे घेऊन बसमधून उतरले असते. गावात सातवीनंतरच्या शिक्षणाची सोय असती तर प्राजक्ता आणि तिच्या मैत्रिणींचंही शिक्षण पूर्ण झालं असतं. हसण्या-खेळण्याच्या शिकण्या-सवरण्याच्या बालवयात त्यांच्यावर अकाली संसाराची ओझी लादली नसती.
         प्राजक्ताच्या आठवणीने जड झालेल्या पावलांनी, दाटलेल्या कंठाने, भरून आलेल्या अंतःकरणाने घराची वाट चालत असताना मी आणखी एक स्वप्नं पाहत होतो. केवळ स्वप्नं नव्हतं तसा निश्चयच होता. काही झालं तरी गावात हायस्कूल सुरू करायचं. ज्यामुळं प्राजक्तासारख्या मुलींना आणि मुलांनाही पुढील शिक्षणाचा दरवाजा सहज उघडता येईल. सातवीनंतर बंद पडणारं त्यांचं शिक्षण किमान दहावीपर्यंत जाईल. जीवनाच्या जडण-घडणीत नवी पिढी नव्या वाटांचा शोध घेत बाहेर पडेल. चूल नि मूल या पारंपरिक चक्रव्यूहात अडकलेल्या मुली नव्या विचारांनी, नव्या उमेदीने यशाची शिखरे सर करण्यासाठी आपल्या बुद्धीचा आणि अंगभूत गुणांचा वापर करतील.
         ज्यांच्या मदतीने, सहकार्याने, आशीर्वादाने आपलं शिक्षण मार्गी लागलं, त्यांच्या ऋणाचा भार त्यामुळं थोडा हलका होईल. हेच भाव मनात दाटून आले होते. त्यासाठी सतत प्रेरणा देत राहिल, पहिल्या पावसानंतरचा मातीचा सुगंध आणि रोज सकाळी माझ्या मनाच्या अंगणभर पसरणारा प्राजक्ताच्या फुलांचा दरवळ...

No comments:

Post a Comment