Wednesday, 12 May 2021

आणखी काय-काय वाचायचं?

'पुस्तक घडवते मस्तक' 
'अपयशाला हमीं यशाची देते पुस्तक'
"ग्रंथ आपल्या हाती 
ग्रंथ आपले साथी 
ग्रंथ मिटवती अज्ञानाच्या 
अंधाराच्या राती
ग्रंथातून घडते क्रांती 
ग्रंथातून मिळते शांती."
      या सर्व काव्यपंक्ती सार्थच आहेत परंतु व्यक्तीच्या विकासात ग्रंथांबरोबरच गुरु, स्वानुभव आणि बुद्धी या गोष्टींचाही तितकाच वाटा असतो असे शास्त्र म्हणते.
       यातील स्वानुभवासाठी माणसं आणि निसर्ग या दोन गोष्टी वाचाव्या लागतात. माणसं वाचायची म्हणजे त्यांचे वर्तन व त्यामागील कार्यकारण भाव समजून घ्यायचा.                     
       डोपोमीन, सिरोटोनीन आणि अड्रिनलीन ही रसायने मानवी मेंदूत क्रमाने तयार होतात. त्यामुळे माणसाच्या मनात प्रथम विचार येतात विचारांचे रुपांतर भावनेमध्ये होते आणि तिसऱ्या टप्प्यावर कृती घडते. 
       अड्रिनलीनचे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह असे दोन प्रकार आहेत.  निगेटिव  अड्रिनलीन तयार झाले तर व्यक्ती पलायनवादी भूमिका स्वीकारून घटना प्रसंगातून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करते तर पॉझिटिव्ह अड्रिनलीन तयार झाले तर संघर्षाची भूमिका स्वीकारतो. हे दोन्ही मार्ग व्यक्तीचा बचाव करतात.
        मात्र यापैकी कोणताच निर्णय घेतला नाही तर घातक असतो; कारण विशिष्ट घटना प्रसंगानंतर पलायनही होत नाही आणि प्रत्यक्ष संघर्ष होत नाही. अशा द्विधास्थेत असताना संकटाची/समस्यांची तीव्रता अधिक होऊन धोका संभवतो.
        निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे कार्यकारणभाव असतो. तो समजून घेतला तर निसर्गाचे गणितही समजायला फार वेळ लागत नाही. विशिष्ट काळात होणारी वृक्षांची वाढ, येणारी पालवी, मोहर, फळे, वनस्पतीवर येणारी कीड, कीटकांची वाढ, पशुपक्षी व वनस्पतींचे सहसंबंध यासारख्या अनेक गोष्टी निसर्ग वाचनाशिवाय कळणार नाहीत.
         निसर्ग वाचनाने प्रत्येकाला कार्व्हर नाही होता आले तरी स्वतःच्या गरजेपुरते जरुरीपुरते ज्ञान नक्कीच मिळेल.
         

1 comment: