मैत्री का? कशी? कधी? जुळते याला तसे नियम किंवा निश्चित्तता नाही. मात्र काही कारणे जरूर आहेत. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजात राहायला आपलं कौतुक करून घ्यायला तसंच इतरांचं कौतुक करायला त्याला आवडतं. आपले प्रश्न किंवा समस्या सोडविण्यासाठी तो अनेकदा इतरांवर अवलंबून असतो.
सहवास ही मैत्रीसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. सहवासात एकमेकांचे विचार, आचार व वर्तन समजते. यातून समान विचारांची मने एकत्र येतात व जुळतात. स्वयंविकासाबरोबरच समाजहीतही त्यात जपले जाते. दोन मित्र एकमेकांची काळजी घेतात. विचारांचे अदान-प्रदान करतात. संकटकाळी धावून येतात.
मैत्रीचे बंध सहवासाने अधिक दृढ होतात. दोन व्यक्तींमधील मैत्रीचे रुपांतर दोन कुटुंबातील मैत्रीत होते. कधी-कधी अशी जोडलेली नाती रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक दृढ होतात.
एखाद्या व्यक्तीला मित्र म्हणून स्वीकारले तर त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारावे. त्याच्या जीवनातील चांगल्या घटना/प्रसंगावेळी जसे अभिनंदनाने प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे; त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे त्याच्या जीवनातील दुःखद घटनेवेळी सांत्वन करणे. त्यामुळे त्याच्या दुःखाचा भार हलका होऊन तो थोडासा मोकळा(Relax) होतो.
वर्गात, प्रवासात, खेळाच्या मैदानावर, गल्लीत, गावात, पारिवारिक कार्यक्रमात, कामाचे ठिकाण, सार्वजनिक कार्यक्रम अशा अनेक ठिकाणी मैत्री जुळल्याची उदाहरणे आहेत. इतकेच काय भांडणातून मैत्री जुळल्याची खुद्द माझ्याकडेच दोन उदाहरणे आहेत.
मैत्री जोडण्यासाठी विचार, वर्तन, स्वभाव, गरजा, समस्या, परिस्थिती, वय, लिंग यापैकी एक-दोन घटक आवश्यक असतील; मात्र जोडलेली मैत्री टिकविण्यासाठी एकमेकाचा विश्वास संपादन करणे हीच एकमेव कसोटी असते.
आजकाल सोशल मिडियाच्या माध्यमातून मैत्री जोडली आणि वाढवली जात आहे. परंतु या डोळे झाकून जोडलेल्या मैत्रीमध्ये अनेकदा फसवणूक झाल्याचीच उदाहरणे जास्त आहेत. फसगत झालेल्यांमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. विशेषत: भावनेच्या भरात किंवा भावनिक मुद्दे उपस्थित करून फसवणूक केली जाते. लग्नाच्या आमिषाने फसवणूक झालेले स्त्री-पुरुष संख्येने अधिक असतील.
तेव्हा अशी मैत्री जोडताना खूप सावध राहा.
No comments:
Post a Comment