Wednesday, 2 June 2021

Santosh Kuigade या विद्यार्थ्याची Facebook Post. #हाडाचा #शिक्षक - #श्री. #चंद्रकांत #निकाडे - #अभिष्टचिंतन


गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
गुरुः देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्हं
तस्मै श्री गुरुवे नमः

ज्यांचे स्मरण होताच आपसूकच तोंडातून वरील श्लोक उद्घोषला जातो आणि हात त्यांना नमन करण्यासाठी जोडले जातात असे शिक्षक आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मोलाची भूमिका पार पाडतात. माझ्याही आयुष्यात ज्यांच्याकडून मला लहान वयापासूनच पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान आत्मसात करता आलं, अशा माझ्या सर्व गुरुवर्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. माझ्या प्राथमिक शिक्षणाच्या कालावधीत मला तसेच माझ्याबरोबर शिकत असणाऱ्या माझ्या वर्गमित्रांना सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी ज्यांनी कटाक्षाने प्रयत्न केला त्या शिक्षकांपैकी एक म्हणजे #श्री. #चंद्रकांत #काशिनाथ #निकाडे सर. आज सरांचा जन्मदिवस, त्या निमित्ताने माझ्यासारख्या शिष्याकडून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व आरोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा!

मी तिसरीला असताना निकाडे सर आम्हाला शिकवायला होते. साधारण साडेपाच फूट उंची, भरगच्च दाढी, पाणीदार डोळे आणि समोरच्यावर छाप पाडावी असं व्यक्तिमत्त्व. ते एक अष्टपैलू आणि आदर्श शिक्षक आहेत. सध्या ते #नवनाथ #हायस्कूल, #पोहाळे ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते महाराष्ट्र राज्य बाल साहित्य परिषदेचे खजिनदार म्हणून देखील काम पाहत आहेत. एक उत्तम चित्रकार, लेखक, कवी, संघटक, क्रीडा मार्गदर्शक व अशा बऱ्याच भूमिका ते लीलया पार पाडत आलेले आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यावर त्यांचा भर असतो. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यावसायिक प्रशिक्षण देण्याकडे त्यांचा ओढा असतो. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सौरउर्जा संचलित सिंचनपंप प्रकल्प, गु-हाळघर, पोल्ट्री फार्म, पॉलीहाऊस, शेळीपालन केंद्र, फरसाण कारखाना अशा विविध ठिकाणी भेटींचे आयोजन करुन त्या-त्या प्रकल्पांची इत्यंभूत माहिती देणे यासाठी सर पुढाकार घेतात. विद्यार्थ्यांंची जीवन कौशल्ये विकसित करणे या ध्यासाने झपाटलेले निकाडे सर सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी कपडे इस्त्री करणे, दोरीने भारा बांधणे, शेतीच्या अवजारांना दोर बांधणे, जनावरांना दावे बांधणे, रद्दीपासून कागदी पिशव्या बनवणे, जुन्या साडीपासून पायपोस बनवणे, धान्य निवडणे-चाळणे-घोळणे-पाखडणे-वेचणे-आडसणे, पोळी-भाजी बनवणे, घरगुती गॕस सिलिंडर जोडणे, पुस्तक बांधणी, पत्रावळी बनवणे असे विभिन्न प्रशिक्षण वर्ग निःशुल्क घेतात. हस्ताक्षर, वक्तृत्व, क्रीडा, सामान्यज्ञान या गोष्टी विद्यार्थ्यांनी अवगत कराव्या यासाठी ते सदैव धडपडत असतात. शक्यतो मुलांना मार द्यायचं ते टाळतात. मी सरांच्या हाताखाली शिकत असताना सर सहसा रागवायचे नाहीत. विद्यार्थ्यांना समजावून सांगून त्यांच्या चुका सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. पण चुकून कधी भडकलेच तर त्यांचा दणदणीत आवाज समोरच्या विद्यार्थ्याला गप्पगार करायचा.

बालसाहित्य हा सरांचा आवडता विभाग. आतापर्यंत सरांनी शेकडो पुस्तके लिहिली आहेत जी प्रामुख्याने बालसाहित्य या प्रकारात मोडणारी. कविता करणे हा सरांचा आवडता छंद. जितके बालसाहित्य सरांच्या लेखणीतून निर्माण झाले आहे तितकेच किंबहुना त्याही पेक्षा जास्त काव्यसंग्रह सरांच्या नावावर आहेत. पुस्तके व काव्यसंग्रह यांचा आकडा नक्कीच हजारोच्या घरात. त्यांनी हातात खडू अथवा पेन्सिल घेतली की समजायचे की आता एक अद्भुत अशी कलाकृती बनली जाणार. हस्ताक्षर हा सरांचा जीव की प्राण! त्यांचे अक्षर बघितले की मोत्यांची सुंदरता काय असते याची प्रचिती येते. कोल्हापूर जिल्ह्यातील बालकुमार साहित्य सभा, मुख्याध्यापक संघाचे विविध कार्यक्रम, विविध बाल साहित्य संमेलनं ही निकाडे सरांंच्या योगदानाशिवाय व उपस्थितीशिवाय पूर्ण होत नाहीत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निकाडे सरांंना मिळालेल्या पुरस्कारांची यादी काढायला बसलं तर दोनशे पानी वही देखील कमी पडेल. विविध सरकारी व खाजगी संस्था, तालुका-जिल्हा-राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या कार्यासमोर त्यांना जितके पुरस्कार द्यावेत तितके ते कमीच आहेत. वैविध्यपूर्ण, योग्य, नेमकं आणि आदर्श असं त्यांचं कार्य आहे. करिअर मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास या व अशा अनेक विषयांवर त्यांची विविध ठिकाणी व्याख्यानं आयोजित केली जातात. सर स्वतःच्या फेसबुक पेजवर विविध संकल्पना राबवत असतात. जन्मदिनांकानुसार रोज एका शास्त्रज्ञाची ओळख, मराठी शुद्धलेखनाच्या चुकांची दुरुस्ती या त्यापैकी काही संकल्पना.

मराठी भाषेवर नितांत प्रेम, विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांच्यात विविध कौशल्ये विकसित करणे, निसर्गाशी मैत्री, माहिती तंत्रज्ञानाच्या वेगासोबत वाटचाल करणे, नव्या गोष्टी आत्मसात करणे या सरांच्या काही विशिष्ट बाबी. निकाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ हायस्कूल पोहाळे येथील विद्यार्थी शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, नाट्य या क्षेत्रात पारंगत झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, नाट्य, सायकलिंग, तलवारबाजी या व अशा विविध विभागात राष्ट्रीय पातळीपर्यंत बक्षीसं पटकावली आहेत. निकाडे सरांसारखी बहुआयामी व्यक्ती मी आजातगायत शिक्षण क्षेत्रात पाहिलेली नाही. पोहाळे गावचं व कोल्हापूरचं नाव देशभर पोहचवणाऱ्या या अष्टपैलू शिक्षकाला माझ्यासारख्या विद्यार्थ्याकडून वाढदिवसानिमित्त अगणित शुभेच्छा! त्यांनी घेतलेला सर्वगुणसंपन्न विद्यार्थी निर्मितीचा ध्यास फलद्रुप होत राहो, हीच त्यांच्या वाढदिनी प्रार्थना!

No comments:

Post a Comment